रंगभूमी.com ने मला आठवणीत राहिलेले नाटक या सदरा अंतर्गत मला लेख लिहिण्यास सांगितले आणि क्षणार्धात माझ्यासमोर एक नाव आले वैशालीची खोली.
१९८९ सालची महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा. मला आठवतंय, पूवी सर्व वर्तमानपत्रात मुंबईतील विविध नाट्यगृहात सादर होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची यादी येत असे. त्यात नाटक सादर होण्याची तारीख-वेळ, संस्थेचे नाव, नाटकाचे नाव आणि लेखकाचे नाव इत्यादी तपशील असे. मग मी त्याची कात्रणे करून जी नाटके आवर्जून बघायची आहेत त्यावर टिक (√) करून ठेवायच्या.
या वर्षी एका नाटकाने माझे कुतूहल वाढवले. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे सादर होणारे निनाद संस्थेचे सुरेश जयराम लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित वैशालीची खोली. या नाटकाचा प्रयोग मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या स्मरणात राहील. यातील कलाकार विश्वास म्हात्रे, विद्या पटवर्धन, हेमंत भालेकर आणि वैशाली दांडेकर. विशेष उल्लेख नेपथ्यकार प्रदीप पाटील.
नाटकाचा पडदा उघडतो. एका साध्या मध्यमवर्गीय घरात एक म्हातारी बाई दिसते. दरवाज्यावर थाप पडते. एक म्हातारा माणूस येतो (त्या बाईला नवरा) येतो. त्याच्या बरोबर एक तरुण आणि एक तरुणी असते. ती म्हातारी बाई त्या तरुण मुलीकडे पाहाताच राहते. दोघांना चहा वगैरे दिल्यावर म्हातारा सांगतो की त्यांची एक मुलगी आहे. ती अंथरुणावर खिळून आहे. म्हातारा सांगतो त्यांची मुलगी वैशाली हिला एक धक्का बसला असून ती मनाने १९६०/६५ च्या काळात असल्यासारखेच वावरते आहे. तुमचा चेहेरा आमच्या वैशाली सारखाच आहे. म्हणून आज मी तुम्हाला दोघांना हॉटेलमध्ये पाहिलं. मला राहवलं नाही म्हणून मुद्दाम तुम्हाला आमच्या घरी घेऊन आलो. आम्हाला तुमची मदत हवी आहे. मुलगी विचारते कसली मदत ? ते सांगतात की तुम्ही साधारण १९६०/६५ च्या काळातील परकर पोलका घालून वैशालीची मैत्रीण म्हणून वैशालीला भेटा. आपण तिला बोलता बोलता या काळात घेऊन येऊ. तुम्ही दोन तासांसाठी तिची मैत्रीण बनून आम्हा म्हाताऱ्या हतबल आई- बापाची इच्छा पूर्ण करावी. ती मुलगी विचार करू लागते. तिच्या बरोबरचा तरुण तिला सांगतो की तू यात पडू नकोस आपण इथून निघुया. पण शेवटी ती हे करायला तयार होते.
ती वैशालीची मैत्रीण बनायला तयार आहे असे कळल्यावर म्हातारा आणि म्हातारा आनंदी होऊन तिचे आभार मानतात. हे त्या काळातच घडत आहे असे भासवण्यासाठी तिला त्या काळातील वेष परिधान करण्यास सांगतात. म्हातारी तिला जुन्या काळातील मुलींसारखा हिरव्या रंगाचा परकर-पोलका , बांगड्या देऊन तयार होऊन यायला सांगते. तेव्हा तरुण मुलगा तिला अजूनही विचार कर असे सुचवतो. ती त्याला दोन तासांचाच तर प्रश्न आहे असे सांगते आणि तयार होण्यासाठी निघून जाते. इथे म्हातारा आणि म्हातारी त्या काळातील माहोल तयार करण्यासाठी तरुण मुलाच्या मदतीने खोलीतील सजावट बदल करायला घेतात. आणि इथेच प्रदीप पाटील या नेपथ्यकाराची कलाकारी दिसते.
त्या खोलीत ते तिघे जस जसे बदल करत जातात, काही गोष्टी कापड टाकून झाकून ठेवलेल्या असतात. त्यावरील कापड काढले जाते. मग तिथे आपल्याला जुन्या काळातील ग्रामोफोन दिसतो. ती खोली पूर्णपणे बदलून १९६०/६५ च्या घरातील बैठकी सारखे दिसू लागते. नकळतच आपण नेपथ्यकाराच्या “दूरदृष्टीला” सलाम करतो.
म्हातारा त्या तरुण मुलाला सांगतो आता दोन तास आपण बाहेर जाऊन बसू. थोडं थोडं ड्रिंक घेऊ या. म्हातारा आणि तरुण मुलगा जातात. सर्व व्यवस्थित आहे हे पाहून म्हातारी सुद्धा बाहेर जाऊन दरवाजा लावून निघून जाते. ती मुलगी तयार होऊन येते. खोलीतिथे जुन्या काळातील ग्रामोफोन असतो. ती त्यावर गाणे लावते. “दोन घडीचा डाव.. याला जीवन ऐसे नाव” हे गाणे सुरु होताच ती त्या काळातील नृत्यशैलीप्रमाणे नृत्य करते. थोड्यावेळाने गाणे थांबवून ती खोलीतील विविध गोष्टींचे कुतूहलाने निरीक्षण करते. सर्व वस्तू जुन्या काळातील असतात.
बराच वेळ कुणीच न आल्यामुळे ती घाबरते. म्हातारा आणि म्हातारीला हाक मारायला लागते तिच्या मित्राला हाक मारते. ती बाहेर येऊन मुख्य दरवाज्यातुन बाहेर पडायला दरवाजा उघडायचा प्रयत्न करते. तिच्या लक्षात येते कि दरवाज्याला बाहेरून कडी घातली गेली आहे. ती खूप आरडाओरडा करते. दरवाज्यावर थापा मारीत राहते. अखेर थोड्या वेळाने दरवाजा उघडतो. आणि तिला धक्काच बसतो… मघाचची म्हातारी बाई आता तरुण होऊन १९६०-६५ च्या स्त्री च्या पेहरावात असते. ती बाई आत येऊन दरवाजा बंद करते आणि त्या मुलीला म्हणते, “वैशाली, काय झालं, काय होतंय तुला ? डॉक्टरांना बोलावू का ?” ती बाई डॉक्टरांना फोन करून वैशालीची तब्बेत बिघडली असून आपल्या घरी यायला सांगते
थोड्या वेळाने मघाचचा म्हातारा तरुण होऊन त्या बाईचा नवरा म्हणून येतो. दोघेही तिला समजवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि ती तरुणी त्यांना लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करीत राहते कि तिन्ही तिला हॉटेल मध्ये भेल्यावर घरी यायची विनंती केली. दोन तासांसाठी तिला वैशालीची मैत्रीण बनायला सांगितलंत. आणि हे साल १९८८ असल्याचे दाखले देण्यासाठी एक लांबलचक संवाद एका श्वासात म्हणते. प्रयोगाच्या आदल्या दिवशी झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये भारत जिंकला होता, त्याचा संदर्भ देऊन… कालची मॅच आपण जिंकलो असे हतबल होऊन तो लांबलचक संवाद संपवला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला होता. ती बाई नवऱ्याला डॉक्टरांना फोन करून बोलवायला सांगते… थोड्या वेळाने दरवाज्यावरील बेल वाजते. बाई दरवाजा उघडते. डॉक्टर आत येतात. आता ती तरुणी नखशिखान्त हादरते. तो डॉक्टर म्हणजे तिच्याबरोबर या घरात आलेला प्रियकर असतो.
इथे Actor Prepares या अंतरंगात एक आठवण. या नाटकातील तरुण आणि डॉक्टर या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते हेमंत भालेकर यांनी ठरवले होते कि तरुण साकारताना त्याला मिशी असेल आणि डॉक्टर साकारताना त्याला मिशी नसेल. मात्र हि गोष्ट त्यांनी तरुणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वैशाली दांडेकर यांना सांगितली नव्हती. अगदी रंगीत तालमीत सुद्धा तरुण आणि डॉक्टर उभा दोन्ही भूमिका मिशी ठेऊनच केल्या. मात्र राज्य नाट्य स्पर्धेतील प्रयोगात त्यांनी डॉक्टरच्या भूमिकेत प्रवेश करण्याआधी रंगभूषा करताना आपली मिशी काढून टाकली. त्यामुळे प्रवेश केल्यावर वैशाली दांडेकर यांच्या चेहेऱ्यावरील अचंबित भाव अपेक्षित परिणाम साधून गेला. एखादा कलाकार आपल्या सहकलाकाराची भूमिका अधिक समृद्ध होण्यासाठी एक अभिनेता कसे साहाय्य करतो याचे मूर्तिमंत उदाहरण.
पुढे या वैशालीचे काय होते ? ती पुन्हा या काळात सर्वांना आणण्यात यशस्वी होते का ? हे मी सांगणार नाही. कारण… हे नाटक अलीकडेच व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे. काही महिन्यापूर्वी राजाराम शिंदे यांच्या निर्मितीत वैशालीची खोली हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. मात्र १९८९ साली पाहिलेल्या या नाटकाचा प्रभाव अजूनही मनात ताजा असल्यामुळे मी हा नवीन प्रयोग अनुभवला नाही.
…तर असा हा सर्वांग सुंदर नाट्यानुभव दिल्याबद्दल लेखक सुरेश जयराम आणि दिग्दर्शक मंगेश कदम यांच्याबरोबरच या नाटकातील चारही कलाकार, विशेषकरून अभिनेत्री वैशाली दांडेकर या सर्वांचे मनःपुर्वक आभार !! तसेच या नाटकाचे नेपथ्यकार प्रदीप पाटील यांच्या कल्पकतेला सलाम. याची प्रकाशयोजना केली होती प्रकाश जाधव यांनी आणि ध्वनी संयोजन केले होते गौतम कोळी यांनी. एखाद्या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाला जेव्हा प्रभावी तंत्रज्ञांची साथ मिळाली की एक विलक्षण नाट्यानुभवाची अनुभूती मिळते. या नाटकाची निर्मिती करणाऱ्या निनाद संस्थेला मनाचा आणि मानाचा मुजरा.
वैशालीची खोली हे नाटक इरा मर्विन लेविन यांच्या Veronica’s Room या १९७३ सालच्या नाटकावर आधारित होते. सुरेश जयराम यांनी आपल्या अस्सल मातीत हे नाटक बांधून त्यास परीसस्पर्श दिला.
आज २०२० साली म्हणजे तीस वर्षानंतरही मला हे नाटक कालच अनुभवल्या सारखा वाटत आणि आजही हे नाटक मनात घर करून राहिले आहे… म्हणूनच “वैशालीची खोली” हे नाटक माझ्या मनातले नाटक !!
मनःपूर्वक आभार !!
उन्मेष वीरकर
असंख्य मोहक रंगछटांनी रंगमंच उजळणारा अनुभवी प्रकाशयोजनाकार
प्रकाशयोजनेतूनच ज्याच्या दिग्दर्शनाच्या कक्षाही रुंदावल्या असा हौशी रंगभूमीवरील यशस्वी दिग्दर्शक