सूचना: अनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास हा लेख तुम्ही वाचला नसेल तर नक्की वाचा!
अभिनय करताना आलेला वाईट आणि चांगला अनुभव…
प्राथमिक शिक्षण पूर्ण करून विद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथेच अभिनयाची खरी सुरुवात झाली….!!
जेष्ठ आणि श्रेष्ठ लेखक बाळ कोल्हटकर यांच्या “सिमेवरुन परत जा” या नाटकाचा स्नेहसंमेलन साठी विद्यालयात प्रयोग करण्यात येणार होता, संपूर्ण पात्रनिवड झाल्यानंतर मला कळले म्हणून मी आमचे कला शिक्षक ह्यांना भेटलो आणि विनंती केली की मला काम करायचे आहे. अगोदर नाही म्हणाले पण मुख्याध्यापकांना भेटून त्या कला शिक्षकांवर आणि कलाकारांवर दबाव आणून नाटकात प्रवेश घेतला. परंतु पात्रनिवड झाली असल्यामुळे अभिनयास वाव मिळेल अशी भूमिका मला मिळाली नाही. असो… रंगमंचाचा अनुभव आणि अभिनय करायला मिळणार हा आनंद होता, तालीम सुरु झाली पण मला एक वाईट अनुभव आला.
राजा सिकंदर, राजा आंभी आणि राजा पौरस ह्या तीन राजांकडे आम्ही दोन शिपाई ( नाटकातले भालदार चोपदार ) काम करत होतो. मला त्यावेळेस ते कळत नव्हते असे नाही पण प्रत्येक राजाच्या प्रवेशाला आम्हाला मुख्यतः मला प्रवेश मिळत होता आणि मी आमच्या घरच्यांना आणि माझ्या शिक्षकांना-विद्यार्थ्यांना दिसत होतो… (मोठाच रोल मिळाला होता) कारण प्रत्येक प्रवेशाला मी रंगमंचावर होतो… त्यामुळे मीही खुश होतो. नाटकाचा तिसरा अंक सुरू होईपर्यंत सगळं छानच चाललं होतं.
नाटकाच्या तिस-या अंकात एका प्रवेशात नाटकातील पौरस राजाची राजकन्या माझ्यासोबत तटबंदीवर रक्षणार्थ असलेल्या शिपायाच्या कानाखाली जाळ काढते असा प्रसंग होता, अचानक तो शिपाई रंगमंच सोडून मागच्या मागे निघून गेला आणि ह्या राजकन्येने माझ्या कानाखाली जाळ काढला, जाळ काढला ह्याचे दु:ख मला नाही पण माझ्या नंतरच्या प्रत्येक प्रवेशाला प्रेक्षक हसत होते. मला हे कळत नव्हते की असे कां…? तर त्याचे उत्तर होते माझ्या कानाखाली जाळ काढल्याने माझा डावा गाल संपूर्ण मेकअप उतरल्यामुळे काळा पडला होता… ही होती एक आठवण!
काही वर्षांनी मी एका (हौशी) नाटकासाठी दाभोळ (एन्राॅन प्रकल्प) येथे अचानक आमंत्रण आलं म्हणून गेलो, नाटकाचे नाव आठवत नाही… मला चांगली की वाईट सवय होती म्हणा, मी कुठे बाहेर दौ-यावर गेलो की रंगभूषेचे सगळे नाही पण मोजके सामान आणि संगीताच्या रेकाॅर्डेरेड कॅसेट (पार्श्वसंगीत) घेऊन जायचो… तिथे पोहचल्यावर दोन दिवस तालीम पाहिली. माझ्या लक्षात आले की रंगभूषाकार आणि संगीतकार प्रयोगाच्या आधी पोहोचणारच नाहीत, आता काय करायचे…
माझ्या सोबत अश्विनी आठल्ये नावाची कलाकार जी माझ्यासोबत प्रवासात होती तिने त्या नाट्यसंस्थेला मला विचारायला सांगितले, तसे त्यांनी केले, दोन दिवस मी तालीम पाहिली होतीच आणि माझ्या पद्धतीने स्क्रिप्ट मार्किंग करायचे काम करत होतो, (सवय होती) मी त्यांना म्हणालो रात्री तालमीत पाहूया. फक्त मला कॅसियो आणून द्या, आहे आमच्याकडे असं ते म्हणाले, मग झाले काम! असं म्हणून मी त्यांना धीर दिला. इतक्यात ते म्हणाले, “रंगभूषा कशी कराल?” मी म्हणालो, “ते होऊन जाईल, त्याबाबती काळजी करू नका. फक्त त्यातील काही कलाकारांना रंगभूषेसाठी मला काही सुचना करावयाच्या आहेत त्यांना रात्री तालमीत भेटायला सांगा…”. झाले रात्री तालमीत सगळे भेटलो. तालीम झाली…
नाटकाच्या प्रयोगाचा दिवस उजाडला. नेपथ्य लावण्यापूर्वी सहज म्हणून रंगमंच पहायला गेलो, पहातो तर काय रंगमंच उभा करण्यासाठी अक्षरशः २५ फुट वासे खोल पाण्यात गाडले होते, त्यावर रंगमंच उभा होता आणि पाठीमागे एका कोप-यात खाली समुद्र. तिथे एक कोपरा उघडा, कुणीतरी पडायची भीती जास्तच दिसत होती…
मी संस्थेच्या व्यवस्थापकांना विनंती केली की त्या तीथे एखादी फळी लावा. ते म्हणाले काही काळजी करू नका आणि नाटक सुरु झाले. ज्या गोष्टीची मला भीती होती तेच झाले. तिथे ठेवलेली ट्रंक आणि हिरो धडपडून पाण्यात पडले. त्या मागोमाग चार पाच माणसं पाण्यात उतरली आणि त्यांनी “ट्रंक आणि हिरो” या दोघांनाही वाचवलं. “ट्रंक आणि हिरो” सही सलामत वर आले तेव्हा सगळे आनंदाने जल्लोष करत होते, धन्य, त्यानंतर त्यांनी तिथे फळी लावली… (बहुदा असं घडायला हवे असं नियम त्या रंगमंचाचा असावा) असो… “नाटक छान झाले” आणि माझे काम सुद्धा…
मला आजही हा किस्सा नाटकाच्या नावाने लक्षात नसला तरी “ट्रंक आणि हिरो” या नावाने नक्कीच लक्षात आहे.
अनिल कासकर
अभिनेता, रंगभूषाकार
विविध कलाकारांना रंगमंचावर जाण्याआधीच त्यांच्या व्यक्तिरेखेत शिरण्यासाठी मदत करणारा किमयागार!