बुलढाण्याला मित्राचा वाढदिवस होता. मी खामगाव वरून स्कुटीने गेलो होतो. बुलढाणा जायला ज्ञानगंगा अभयारण्यातून बोथा घाट मार्गे जावं लागतं. या अभयारण्यात अस्वल,बिबट सारखे हिंस्त्र प्राणी आहेत तर बरेचसे पक्षी देखील.
प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी रात्री 8 नंतर रस्ता बंद करण्यात येतो. याची मला पूर्ण कल्पना होती. वाढदिवस अर्ध्यावर सोडून गेट बंद होण्यापूर्वी मी अभरण्याच्या गेटसमोर पोहोचलो. तिथे असणारे लोक, मला एकट जाऊ नको असे म्हटले पण मला घरी जायचं होतं. तसेच एक पर्यायी मार्ग देखील होता पण तो बराच लांब होता व मला पेट्रोल संपण्याची भीती होती. मी थोडा वेळ विचार केला एक बस त्या मार्गाने जाताना दिसली. मी हिम्मत करून त्या बस मागे निघालो. बाजूला हॉटेलवर एक बाबा जोरात ओरडले “रस्त्यात थांबू नको सपनी धरंल”. पहिलेच मी घाबरलो होतो आता अजून घाबरलो पण मला काहीही करून बस सोडायची नव्हती. शेवटची बस होती त्या समोर आणि मागे दुसरं कुठलं वाहन दिसत नव्हतं. मी वेगात निघालो.
रस्त्यावर कडेला जीप उभी होती त्यावर महाराष्ट्र शासन लिहिलेलं दिसलं. थोडा जीवात जीव आला. रस्त्याने खूप दूरवर लाईट ही दिसत होते. एका पाठोपाठ एक गाव निघून जात होतं. मी अजूनही बस मागे होतो. थोडं समोर गेल्यावर बसने उजव्या बाजूचा इंडिकेटर दिला आणि वळाली आता मला कळून चुकलं ती बस खामगाव जाणार नव्हती, तर बाजूला एखाद्या गावी जाणार होती.
काही वेळ वेग कमी केला बस बघत राहिलो आता रस्त्यावर काहीच नव्हतं. आकाशात काळ-कुट्ट आभाळ चंद्र कुठे दिसत नव्हता. चांदण्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. येताना दुतर्फा हिरवे दिसणारे झाडे आता खायला उठली होती. जणू अक्राळ विक्राळ आकार हात खोलून मला बोलवत आहे असं वाटू लागलं. मी जोरात हसलो आणि म्हटलं रिकामं डोकं भुताच घर. तोच “हु” असा आवाज आला आता डोळ्यात पाणी आलं,हाथ थरथरू लागले,स्कुटी वरील ग्रीप अधिक घट्ट झाली, त्यामुळे वेग वाढला आणि माझ्या बोटाने अचानक हॉर्न वाजवायला सुरुवात केली. मी काय करत आहे हे मलाच कळत नव्हतं.
आजूबाजूला शांतता त्यात माझ्या हॉर्न चा आवाज समोर पाटी वर हॉर्न वाजवू नये असं दिसलं. आज मला बुलेट ची आठवण झाली. बुलेट असती तर त्या आवाजाने जंगलातील आवाज ऐकू आले नसते आणि अजून जोरात बाहेर निघून जाऊ शकलो असतो. काही वेळाने पुन्हा दूरवर लाईट दिसु लागले, गावात जाऊ असं वाटलं. पण आता 8 कि.मी चा रस्ता बाकी राहिला होता. मी डोक्यात काहीच विचार आणला नाही आणि जोरात गाणे म्हणू लागलो. कानाजवळून हळुवार हवा गेली. कुणी शिट्टी वाजवावी असा कान वाजला. मी “तू ही मेरा” गाणं म्हणत होतो. आता इतका रस्ता पार केला होता म्हणून मी खुश होतो.मी वेग कमी केला मला माझी स्कुटी कुणी बाजूला ओढत आहे असं वाटू लागलं. मी पुन्हा वेग वाढवला. “का थांबला गाणं म्हण” अस माझ्या कानात कुणीतरी म्हटलं माझे हात अगदी सरळ झाले. मला काही कळत नव्हतं मी स्कुटी खाली पडण्याच्या पर्यन्त केला. पण काही होत नव्हतं. आता कुणीतरी खांद्यावर हात दिला आहे असं वाटलं मी आरशामध्ये बघितलं कुणी दिसत नव्हतं. पुन्हा आवाज आला “मरायचं का तुला?” मी काहीच बोललो नाही डोळे घट्ट मिटले. तरीही स्कुटी सुरूच होती. मला खांद्यावर हात जाणवत होते. माझा गळा कोरडा झाला,कंठ दाटून आला. मी काही बोलण्याचा पर्यन्त करत होतो पण मला बोलणे ही जमत नव्हतं. मी डोळे उघडले मी विरुद्ध दिशेने जात होतो.
आता मला पुन्हा बुलढाणा लिहिलेलं दिसलं. मी काही करत नव्हतो माझी स्कुटी सुरूच होती. “आता म्हणणार आहेस का नाही?” मी सेकंदाचाही विलंब न करता “तू ही मेरा” म्हटलं आणि माझा आवाज मला स्पष्ट ऐकू आला आणि पुन्हा खामगाव ची पाटी दिसली. मी गाणं पूर्ण केलं पुन्हा आवाज आला “मी सपना, माझं आवडीचं गाणं आहे हे आणि तू शांत दिसतो पुन्हा या रस्त्यने येऊ नको”. आणि अचानक मी भानावर आलो. खामगाव बायपास ला येऊन पोहोचलो होतो. रस्त्याच्या कडेला स्कुटी थांबवली आणि रडू लागलो खूप वेळ रडलो. स्कुटी सुरू करण्याचा पर्यन्त करू लागलो त्यामधल पेट्रोल कधीच झालं होतं मला सपना ने बाहेर आणून सोडलं होत. मी तिथेच चक्कर येऊन पडलो.
जाग आली तेव्हा माझ्या घरी होतो. मी स्वप्न समजून सगळं विसरून जायचं ठरवलं. तोच आई आली मला ग्लासभर दूध दिल आणि म्हटली झोप “बाहेर सपना लक्ष ठेवून आहे”.