दर्जेदार नाटक आणि हमखास “हाऊसफुल्ल” बोर्ड यांच समीकरण निश्चितच आहे. डोंबिवलीतील ‘सावित्रीबाई फुले’ नाट्यगृहामध्ये मार्च २०१५ मधील तो ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड देखील नाटकाचा हाच दर्जा दर्शवित होता. निर्माता अभिजीत साटम आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव या द्वयीने ‘मिस्टर अँड मिसेस’ हे नाटक २१ डिसेंबर २०१३ ला रंगमंचावर आणले होते. चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर साटम यांच्या संयत अभिनयाने नटलेले हे नाटक आवर्जून पाहण्यासारखे होते. नवरा बायको यांचे आर्थिक ओढाताणीने हरवत चाललेले नाते आणि अचानक आलेले वळण असा खरं तर विषय. गुजराती लेखक अस्लम परवेज यांचे कथानक आणि प्रियदर्शन जाधव यांचे कल्पक दिग्दर्शन, यामुळे त्याकाळात नाट्यक्षेत्रात क्रांती घडली होती.
मीरा कुलकर्णी, बँकेत काम करणारी सर्वसामान्य स्त्री, आणि टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय असलेला नायक अमित जयंत यांचा विवाह आणि त्यानंतर सेलिब्रिटीचा संसार वैगरे… अशा एका जोडप्याची ही कथा. आतापर्यंत सेलिब्रिटींचा विवाह लोकांनी टीव्हीवर पाहिला होताच, पण करोडो लोकांच्या साक्षीने घेतलेला ‘सेलिब्रिटीचा घटस्फोट’ ही विलक्षण सुन्न करणारी कल्पना आता प्रत्यक्षात येणार होती. आपलं ‘सेलिब्रिटी’ म्हणून मिळालेल यश कॅश करू पाहणारा, भल्या मोठ्या रकमेच्या लालसेपोटी ‘लाईव्ह’ घटस्फोटाच्या कल्पनेला बळी पडलेला ‘तो’ ‘सेलिब्रिटी’ अमित जयंत आणि कुठल्यातरी भयंकर जाळ्यात आपण नकळत अडकत जात आहोत यांची कल्पना नसणारी ‘मीरा’ यांच आजच्या काळाच आणि दोन पावलं पुढे जाऊन विचार करायला लावणार हे नाटक म्हणजे, एक वेगळाच धाटणीचा प्रयोग म्हणायला हवा.
‘रिऍलिटी शो’ फिक्सिंगच्या जंजाळात गुरफटलेल्या चॅनेलनी प्रेक्षकांभोवती कमालीचे मायाजाल निर्माण केलेले आहे, यांची प्रचिती आपल्याला आजही येते. अलीकडच्या जोडप्यांची कल्पनेपलिकडची गोष्ट असलेल्या ‘मिस्टर अँड मिसेस’ या नाटकाने अशा रिऍलिटी शो चा पर्दाफाश केलेला दिसून आला होता. या नाटकात कथेची उकल करण्यासाठी तब्बल सहा छुपे कॅमेरे आणि स्क्रीनची योजना करण्यात आली होती आणि या छुप्या कॅमेऱ्याच्या वावराने नाटक देखील दमदार बनवलं होत. ही किमया मराठी रंगभूमीच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकणारी ठरली होती. कॅमेरा आणि रंगमंच ही दोन्ही वेगवेगळी माध्यमं, ही दोन्ही तंत्र एकत्र आणण्याचे काम ‘मिस्टर अँड मिसेस’ या नाटकाने केलं होत. मोठ्या ब्रेक नंतर मधुरा वेलणकर साटमचं पुनरागमन, रोमॅंटिक आणि थ्रीलर अनुभव, झकास नेपथ्य आणि संगीत यांच्या जोडीला प्रियदर्शन जाधव यांचे कल्पक दिग्दर्शन आणि त्यांनी रंगमंचावर कॅमेऱ्याचा खुबीने केलेल्या वापर, या सर्वच बाबतीत नाटक दमदार आणि नाविन्यपूर्ण ठरलं होत. यापुढील वीस-पंचवीस वर्षाच्या कालावधीत देखील ‘मिस्टर अँड मिसेस’ काळाशी संबंधित राहील. तेंव्हा ह्या नाटकाच्या रंगमंचावरील पुनरागमनाची रसिक नाट्यप्रेक्षक निश्चितच आतुरतेने वाट पाहत असतील.
[Photo via Facebook]
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
हौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.
1 Comment
अप्रतिम विश्लेषण!!