त्याला भेटण्याच्या ओढीने मी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडी आधीच येऊन कॉफी शॉपच्या समोरच्या झाडाखाली थांबले होते. तसाच असेल का तो? शाळेतल्यासारखा? किती वर्षांनी भेटतोय आम्ही आज. शाळेत अल्लडपणे पाहिलेली स्वप्नं आज परत सत्यात रूपांतरित होतील असं वाटतंय. अजूनही मात्र त्याचा भाव खाण्याचा स्वभाव काही बदलला नाही. इतके दिवस ‘भेटूया’ म्हणून मीच त्याच्या मागे लागले होते. शाळेत असताना माझं त्याच्यावर प्रेम होतं… आणि त्याचंही होतंच माझ्यावर. मला जाणवायचं ते, त्याच्या नजरेतून. तेव्हा सगळं बोलायचं राहून गेलं. आता मात्र मी व्यक्त होणार, मी ठरवूनच आले होते.
हा सगळा विचार मनात चालू असताना माझ्यासमोर एक कार येऊन थांबलेली मला कळलंच नाही.
“हॅलो मीनल!” काच उघडून आतल्या व्यक्तीने मला हाक मारली आणि मी त्या व्यक्तीकडे बघून क्षणभर अचंबितच झाले. ती व्यक्ती म्हणजे ‘तोच’ होता. चेहरा केवढा बदललाय याचा. डोक्यावरचे केस तिशीतच पांढरे आणि विरळ झालेत. काय हे?
“अरे तू? क्षणभर तर मी तुला…”मी.
“ओळखलच नाही ना. मला माहितीय.” तो.
“कशी ओळखणार? किती बदललायस तू. इतका बारीक झाला आहेस आणि आधीसारखा…”
“आधीसारखा हॅंडसम नाही राहिलो.” त्याला माझ्या मनातलं सगळं कळत होतं . त्याच्या या वाक्यावर मी मंद हसले. त्याची जशी आकृती मी मनात रेखाटली होती, तसा तो अजिबात राहिला नव्हता. त्याच्या फेसबुकवरच्या फोटोतही तो किती स्मार्ट दिसतो. हं … जुना फोटो असणार. शाळेनंतर इतक्या वर्षांनी मी फेसबुकवरच तर त्याला शोधलं आणि भेटण्याचा अट्टाहास केला. आता त्याला असं पाहून माझा निरस झाला, पण काही क्षणच. नंतर माझ्या मनानं त्याला आता आहे तसा कधी स्वीकारलं, हे माझ्या बुद्धीला कळलंच नाही. यालाच खरं प्रेम म्हणतात का?
“जायचं का कॉफीशॉपमध्ये?” तो.
“आं” मी भानावर आले. स्मितहास्य करत “हो” म्हणाले.
“काय रे, या वयात केस पांढरे झालेत, चेहऱ्यावर थकल्यासारखे भाव आहेत. हा काय ऑफिसमधल्या कामाच्या स्ट्रेसचा परिणाम आहे का?” कॉफीचा घोट घेत मी त्याला विचारले.
“कामाचा स्ट्रेस? आयुष्य इतकच नसतं गं.” त्याच्या या बोलण्याबरोबर त्याचा चेहराही गंभीर झाला. प्रेमभंगाची भानगड आहे कि काय? मी मनाशीच विचार केला.
“मग हा सगळा कशाचा परिणाम आहे ते तरी सांग.” मी.
“जाऊ दे ग…मला सांग, तू कशी आहेस, कसं चाललंय सगळं?’ तो.
“मी मस्त आहे रे.” औपचारिकपणे मी बोलून गेले. आता मला अजून वेळ घालवायचा नव्हता. मनातलं सगळं त्याच्यासमोर मांडायचं होतं, हो सगळंच. मी मनात सगळी तयारी केली, क्षण दोन क्षण त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, “मला अजूनही तू आवडतोस. शाळेतलं प्रेम तसंच राहून गेलं. चल, आता नव्याने आयुष्य सुरु करू… म्हणजे… प्रत्यक्षात इतक्या वर्षानंतर आपण भेटतोय तरी मी डिरेक्टली कसं विचारतेय, असं वाटेल तुला, पण आपल्याला एकमेकांच्या स्वभावाची ओळख आहे… आपण लग्नाचा विचार करूया?”
माझ्या या अनपेक्षित बोलण्याने तिथल वातावरणच बदललं. दोघेही काही वेळ स्तब्ध झालो.
“डायरेक्ट क्लीन बोल्डच केलंस… काय गं? तुला कोणी मिळालं नाही वाटतं इतक्या वर्षात, म्हणून आता परत माझी आठवण आली.” त्याचा सेन्स ऑफ ह्युमर अजूनही आधीसारखाच शाबुत होता.
“मिळाले ना पण कुठलंच टिकलं नाही. मधल्या काळात काही वाईट अनुभव आले.” मी.
“म्हणून पुन्हा मीच आठवलो? शेवटचा पर्याय.” तो हसला.
“खरं सांग, तुलाही मी आवडत होते ना शाळेत खूप?” मी.
“आवडत होतीसच. कदाचित अजूनही आवडतेस. पण तसा काही विचार नाही केला. रादर करायचाच नाही.” तो.
“का? कुणी मिळालं का?” श्वास रोखून मी विचारले.
“तसं काही नाही, पण आता कसलाच विचार करायला वेळ नाही माझ्याकडं.” तो पुन्हा सिरीयस दिसत होता. “मला कोणाचंही नुकसान करायचं नाही.” तो पुढे म्हणाला.
“म्हणजे?… असं कोड्यात बोलू नको बाबा” मी.
“मी सशक्त माणूस नाही. माझ्या दोन्ही किडन्या जवळपास फेल झाल्या आहेत. आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस असते. शरीराने थकून जातो ग. दोन वर्षं होत आली आता, हाच दिनक्रम चालू आहे, हा त्रास लपवून मला कोणाशी लग्न करायचा नाही. माझ्याबरोबर अजून एकाला या खाईत लोटायचं नाही.” तो बोलून गेला आणि माझे कानच बधिर झाले. मी त्याच्याकडे बघत राहिले, माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि चेहऱ्याने थकलेला दिसत असलेला तो, मनाने आनंदी होता. विचारांनी समृद्ध भासत होता. त्याच्या बिघडलेल्या प्रकृतीचं,गळालेल्या आणि पिकलेल्या केसांचं गूढ मला उकललं. त्याला भेटण्यापूर्वी किती किती स्वप्नं रंगवली होती मी, आणि आता भेटल्यानंतरचं त्यांनं सांगितलेलं सत्यच भयाण स्वप्नवत वाटत होतं.
“कसं झालं हे? आणि हे डायलिसिस कधीपर्यंत?” मी भानावर येऊन विचारलं.
“किडनी फेल होण्याची तशी बरीच कारणं आहेत. डायबिटिस, हाय बी. पी., अँटिबायोटिक्सचे जादा डोस वगैरे, पण माझं किडनी फेल होण्याचं नेमकं कारण अजून कळालं नाही. हे डायलिसिस आयुष्यभरासाठी आता.” तो सहजपणे म्हणाला.
“आयुष्यभरासाठी? मग यावर दुसरा उपाय?” मी.
“किडनी ट्रान्सप्लांटेशन हा डायलिसिस थांबवण्यावरचा उपाय. पण इट हॅज् इट्स ओन कॉम्प्लिकेशन्स अँड इशूज. तरी ट्रासनप्लांटेशनबद्दलचा विचार चालू आहे.” तो.
माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू होते. नजर त्याच्यावर स्थिरावली होती. मन सुन्न झालं होतं. त्याला हे सर्व जाणवलं.
“अगं वेडी आहेस का तू? काही काळजी करू नको. होईल सगळं ठीक.” तोच मला धीर देत होता.
“तुझे आईबाबा कसे आहेत?” मी.
“काळजी करतात माझी, पण स्वीकारलंय त्यांनी सगळं.” तो.
“तू स्वतःला एकटं समजू नकोस. मी कायम तुझ्यासोबत असेन.” मी.
“तुझ्या डोळ्यातील अश्रूंनी ते सगळं सांगितलं, आता शब्दांनी वेगळं सांगायची काय गरज आहे… चल,निघू या आपण आता.” तो.
त्याला भेटायला जाताना मनातल्या मखमली कप्प्यातील प्रस्ताव मांडायचा विचार करणारी मी, त्याच्यासमोर तो विचार मांडूनही नियतीच्या विपरीत खेळाची एक शिकार बनून परतले. आणि तो? आयुष्याशी एकटाच संघर्ष करत होता. तरी त्याची काही तक्रार नव्हती. दुःखही आयुष्याचा एक भाग आहे, असं म्हणायचा. या दुःखाची कसली परिभाषा करावी?
आम्ही दर पंधरा दिवसांतून एकदा तरी ठरवून भेटायला लागलो. कधी सिनेमाला जायचो, कधी कॉफीसाठी भेटायचो. कधी कधी भेटून फक्त गप्पा मारायचो. त्याचा सामाजिक कार्यातही सहभाग असायचा. एका NGO तर्फे तो गरीब, मागासलेल्या मुलांना शिकवायला जायचा. मला भेटल्यावर त्याबद्दल इतकं भरभरून बोलायचा की मी त्याच्या आजारपणाबद्दल विसरून जायचे. त्याच्या बोलण्याने भारावून जायचे. कधी कधी मात्र तो महिनाभर भेटायचा नाही. अशक्त वाटायचं त्याला. डायलिसिसनंतर खूप थकून जायचा. त्याच्या फोनवरच्या बोलण्यावरून ते जाणवायचं. मग मी त्याच्या घरी कधी कधी जाऊ लागले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांशी माझी ओळख झाली.
त्याच्या तब्येतीत चढ-उतार होत रहायचे. मी भेटायला गेल्यावर कधी कधी तो उन्मळून पडलेला असायचा, त्यावेळी फारसं बोलायचा नाही. त्याला शारीरिक त्रास कमी होत असला की मात्र खूप गप्पा मारायचा, भरभरून बोलायचा. नोकरीवर सारख्या रजा पडत असल्यामुळे त्याला नोकरीही सोडावी लागली. त्याचे आई-वडीलही त्याच्या आजारपणामुळे त्रस्त असायचे. तो यातून लवकरात लवकर बरा व्हावा, एवढंच स्वप्न त्यांच्या डोळ्यात मला दिसायचं.
या सगळ्यात मी स्वतः त्याच्यात गुंतत गेले, अगदी मनाने, माझं मलाच कळलं नाही. नंतर मी मनाशी ठाम विचार केला, काही झालं तरी त्याला आपण एकटं पडू द्यायचं नाही. त्याची सोबत करायची. त्याच्याशी लग्नं करायचं. मी त्याचाशी लग्नं केलं म्हणून माझं नुकसान होईल, हे ठरवणारा तो कोण? मी त्याला पूर्ण बरी करेन.
एके दिवशी त्याच्या आई-वडिलांच्या संमतीनं त्याचं किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या तब्येतीत सुधारणाही होत होती. ट्रान्सप्लान्टनंतर त्याचं डायलिसिस बंद होणार याची मलाही माहिती होती, म्हणून या निर्णयाने मी खुश झाले. तो आता लवकरच डायलिसिस मधून सुटणार होता. कायमचा.
तो डायलिसिसमधून कायमचा सुटला… पण ऑपरेशन होण्याधीच. नियतीनं आपला खेळ खेळला होता. त्याच्या घरी जाण्याचं माझं धाडस होत नव्हतं, पण त्याच्या आई-वडिलांचा निराधार चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि मी त्याच्या घरी गेले. त्याच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर मला काहीच दिसत नव्हतं. दुःख,वेदना, त्रास काहीच नाही . म्हणूनच ते चेहरे मला जास्त वेदनादायी वाटत होते. ते भाव दुःखाच्याही पलीकडचे खोलवर होते.
“असा कसा अचानक निघून गेला? त्याच्या तब्येतीत सुधारणा होत होती. परवाच बोललो आम्ही. आता तर आपण ट्रान्सप्लान्टही करणार हॊतॊ.” त्याच्या वडिलांना विचारताना मला अश्रू अनावर झाले होते.
“परमेश्वराच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार?” ते एवढेच बोलले. यातच त्यांच्या कितीतरी भावना एकवटल्या होत्या.
थोड्या वेळाने शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत मी गेले. सगळं सुनं सुनं वाटत होतं. त्याचा रिकामा पलंग, त्याची औषधं, त्याची पुस्तकं सगळं मी माझ्या आसवांत सामावून घेतलं. जगणाऱ्यानं एक दिवस मरायचंच आहे, हे लक्षात ठेवलं की जगणं सोपं होतं. अचानक मला त्यानं परवा म्हटलेलं हे वाक्य आठवलं. म्हणजे त्याला आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती की काय? असावीच, कारण त्याने आपले मरणोत्तर डोळे दान कारण्याबद्दलही सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्याचे डोळेही दान करण्यात आले. बाकी अवयव चांगले असते तर त्याने तेही दान करण्यास सांगितलं असतं. त्याचा जन्मच इतरांसाठी होता. जेवढं जगला, भरभरून जगला. शाळेत प्रत्येक संकटांना हसत हसत सामोरं जायचा तो. आजही तो लढवैय्या ठरला. मृत्यूशी तो लढलाच, पण मृत्य जवळ आल्यावर त्यालाही लढवैय्येपणानं स्वीकारलं. तो म्हणायचा, प्रत्येक क्षण भरभरून जगलं की मृत्यू कधीही ओढवला, तरी त्याची खंत वाटत नाही. त्याच्या प्रेमानं मला शिकवलेलं जगणं मला आठवत होतं. मग आज मी का त्याच्या आठवणीत रडत बसू? त्याला ते आवडणारच नाही, तो स्वतः आनंदी असेल जिथे आहे तिथे. मग मीही त्याची प्रत्येक आठवण मनात साठवत त्याच्या खोलीतून बाहेर पडले. ती प्रत्येक आठवण मला समृद्ध करत होती.
राहुल हणमंत शिंदे
हौशी लेखक
राहुलच्या कथा माहेर, मेनका, लोकप्रभा अशा मासिक, साप्ताहिकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.