खळखळ आवाज करत निसर्गाच्या सौन्दर्यात भर टाकत वाहणाऱ्या मुळा नदीच्या काठावर हिरव्यागार झाडांनी नटलेलं बारशिंग नावाचं गाव होतं. अगदी नावाप्रमाणेच १२ वाड्यांचे मिळून ते एक गाव बनले होते. नुकताच शासनाचा निधी मंजूर झाल्याकारणाने गावात रस्ते बांधणीच काम सुरु होतं. ते रस्ते साहजिकच शहराच्या रस्त्यांना जोडले जाणार होते. रस्त्यांचं काम जोरदार चालू होतं. गावच्या तिठ्यावर कामाच्या शोधासाठी बसणाऱ्या आदिवासींसाठी ही चांगली संधी होती. बिचाऱ्यांचं हातावर पोट म्हणावं अशीच त्यांची अवस्था. जेव्हा काम करून हातात पैसे येतील तेव्हाच बिचाऱ्यांची भूक भागत असे. आणि रस्ते बांधणीसाठी त्या आदिवासी लोकांना बोलावण्यात आलं. चांगलं १५ दिवसांचं काम असल्याकारणाने तीही लोकं आपला बोरिया बिस्तर घेऊन गावात वस्तीला आली होती. तिथंच रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून त्यांनी आपला संसार मांडला.
सगुणा त्यातलीच एक काम करणारी मुलगी. वय वर्षे १६. आई-बाप, भाऊ-बहीण नसलेली, काहीही घेणं देणं नसणाऱ्या पण सोबत असणाऱ्या त्या माणसांसोबत राहूनच आपल्या हातावरच पोट भरत होती. इतरांना तीच सुंदर दिसणं हे कदाचित तिला लाभलेलं वरदान वाटत होत पण तिच्यासाठी ते शाप ठरलं होतं.
त्या रस्त्याचं काम करून घेणारा तो ठेकेदार एकदम चिडखोर, आणि कधीच कोणाशी नीट बोलत नसे. आणि अचानक एक दिवस,
“ए सगुणा इधर आ…” ठेकेदार थोडं ताठ पण खालच्या सुरात बोलला.
काम करत असणारी सगुणा हातातलं घमेलं टाकून ठेकेदार कडे गेली.
“जी मालिक… बुलाया आपने…” सगुणा म्हणाली.
” ये साहब,तेरा काम देखके खुश होयेला है… तेरेको अच्छे काम पे रखना चाहता है… खाना पिना रहना सोना सब उधरीचं होयेला है… देख… मंगती है तो बता दे अभीच…”ठेकेदार एका व्यक्तीकडे हात दाखवत सगुणाला म्हणाला.
“साहब… मेरेकु सोचना पडींगा… मै कल बतारेली हू आपको…”सगुणा खाली मान घालून म्हणाली.
सगळे जण तिला विचारू लागले.”क्या बात है ?”
तिने लागलीच सर्व सांगून टाकलं. आणि कामाला लागली.
ठेकेदारासोबत आलेला माणूस सगुणाला अगदी टक लावून न्याहाळत होता. तिची बोलण्यातली लकब, ऐन भरात आलेलं तिचे तारुण्य, त्यालाच चार चांद लावणारे तीच सौन्दर्य, या सर्वाचा त्याने फायदा उचलायचा ठरवलं.
सगुणा ही बाहेरचं पुरतं ज्ञान नसलेली, एकदम साधी सरळ मुलगी होती. चांगलं काय…? वाईट काय…? हे सांगणारं तीच कोणी नव्हतं. त्यामुळे तिने मालकाचं ऐकायचं ठरवलं.
सांगितल्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी कामाला तर आली पण ठेकेदाराला तिने त्या व्यक्ती सोबत जायचा होकार दर्शवला. त्याप्रमाणे ठेकेदाराने त्या व्यक्तीला फोन करून सगुणाला घेऊन जाण्यास सांगितले.
तो माणूस चारचाकी गाडीतून आला आणि सगुणाला घेऊन गेला. तिच्यासोबत घडणारे हे सगळे क्षण तिचे सोबती पाहत होते आणि ती नशीबवान आहे आणि आमचं नशीब फुटकं असं म्हणत स्वतः च्या नशिबाला दोष देत धुरळा उडवत जाणाऱ्या त्या गाडीकडे कुतूहलाने पाहत होते.
सगुणाला नेणारा माणूस हा दुसरा तिसरा कुणी नसून बार मालक अशोक होता. अशोक बाहेरून स्त्रियांना स्वतःच्या बार मध्ये धंदा करायला आणत होता. सगुणाला ही त्याने त्यासाठीच आणले होते.
गाडीतून उतरताच अशोक सगुणाला बार मध्ये घेऊन गेला.
आत शिरताच लाइटच्या उजेडाने दीपणारे डोळे, गाण्याचा गोंगाट, त्याच्या तालावर हातात दारूची बाटली घेऊन नाचणारे पुरुष, त्यांना डिवचणाऱ्या स्त्रिया, काही तिथेच सोफ्यावर पडून नशेत झुलत असणारे, आणि काहींना स्वतःची शुद्ध नसूनही पडत पडत नाचणारे असं काहीसे तिथलं वातावरण होतं. सगुणा काहीशी स्तब्ध झाली. इथे मी काय काम करणार…? या विचारात असतानाच अशोक तिला हाताला धरून आत रूम मध्ये घेऊन गेला.
रूम मध्ये एक बाई हातात काहीतरी फिरवत बेडवर पहुडली होती. अशोकने सगुणाला आत ढकलत,
“आजसे इसका भी क्लास लेना… इस्को भी नाचना सिखा दे… और हा… भागने की कोशिश भी मत करना, ये बार हे बार… इधर औरत आती मेरी मर्जीसे… और जाती भी मेरी मर्जीसे…””
ती स्त्री बेडवरुन उठून थोडं मुरडत सगुणाकडे गेली आणि तिच्या हातावरून एक हवशी स्पर्श करत म्हणाली, “क्या आयटम लायेला है साहब ..”
सगुणा थोडी घाबरलीच. नक्की काय होतंय तिच्यासोबत… कुठल्या दुनियेत ती आली तिला काहीच कळेना. तिला रडू यायला लागलं.,
” ए चूप… चूप एकदम… ऐसा खुश करेगी तू अपने कस्टमर लोग को… भाग जायेगा वो…”म्हणत तिने सगुणाच्या हाताला पकडत नाच गाणं चालू असलेल्या रूम मध्ये घेऊन गेली.
सगुणाला रडू थांबेना. इतक्यात दुसरी स्त्री,” अरे ये तो अपना दुकान बंद करेगी…”
तिथल्या बायका तिला नाचगाणी शिकवू लागल्या…काही नवीन मुली घाबरत शिकत होत्या पण सगुणा रडत होती. तिथल्याच एका बाईने रागात येऊन तिचा हात मागे घेऊन पिळवटला,
“ये जो मासूमीयत के आसू दिखा रही है ना इधर… उसको मालिक ने २०००० रु.मी खरीदा है. तो ज्यादा नाटक मत कर. चुपचाप से शुरु हो जा वरना अंजाम सही नही होगा…”
सगुणा जास्तच घाबरली. तिने आपले रडू आवरलं आणि तिथे शांत उभी राहिली.
सर्व बायका नाचगाण्यात दंग असताना, एक मुलगी सगुणा जवळ येत म्हणाली,
“इधर से अभी निकलना मुश्किल है… जो चल रहा है… चुपचाप उसमे शामिल हो जा… वरना ये औरत तुझे एक आदमी के साथ रूम मे बंद कर देगी…”
सगुणा भानावर आली. आता बाहेरचा मार्ग कायम बंद…
तिने तिथेच हळू हळू नाच गाणं शिकून कस्टमरना खुश करायचं काम चालू केलं.
काम मनाविरुद्ध होतं. पण करणं भागच होत. पळून जाण्याचा १-२ वेळा प्रयत्न ही केला पण तो असफल ठरला.
हळू हळू तिने आपल्या मनाला, शरीराला स्वतःच्या स्वाभिमानाला विकलंच होतं. आणि कमी शब्दात सांगायचं तर ती ही एक धंदेवाली बनली होती.
शरीरसुखाचा बदल्यात पैसे मिळत होते. जणू आतलं सर्व भावना वगैरे जे काही होतं ते मेलंच होतं. अश्यातच बघता बघता ६ महिने उलटून गेले.
आणि सगुणाला दिवस गेले होते. जेव्हा तिला हे समजलं तेव्हा तिच्यात जगण्याची एक उमेद निर्माण झाली. एक कारण मिळालं. का धंदेवाली एक आई असू शकत नाहीं का…? आई होण्याचा हक्क हा कोणी ठरवून नाहीं दिला. तो एक अनुभव आहे जो एका स्त्रीला पूर्णत्वास नेतो. तिचं स्त्रीपण सिद्ध करत. तसंच काहीस तिच्या बाबतीत झालं.
त्या बार मध्ये… त्या दूषित वातावरणामध्ये एका बाळाला जन्म देणं योग्य नव्हतं.पण सगुणाला ते बाळ हवं होतं. अनेकांनी तिला ते पाडून टाकायला सांगितलं पण सगुणाने कोणाचंही ऐकलं नाहीं.तिने त्या पोटात वाढणाऱ्या बाळासोबत त्या हैवानांना खुश करण्याचं चॅलेंज उचललं. पण त्या हैवानांना कधीच तिची दया आली नाहीं. वासनेने बरबटलेले डोळे… हवशी नियत तिच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा उचलत होते. बाळाचा बापच कोण माहित नसल्यामुळे आईपणाचा अनुभव बिचारी बोलणार तरी कोणाकडे…?
कोण तिचे डोहाळे पुरवणार…? वेळ मिळताच एकांतात स्वतःच्या पोटाला हात लावून त्याच्याशी गप्पा मारायची…, “सून मेरे लाल, अपुनको पता नही तू लडका है या लडकी… पर तू जो भी है तेरेको मै बहुत खुश रखेगी… मजबूरी है अपुनकी इसलिये अपुन ये काम करेला है… तेरेको ऐसा काम करनेकी जरुरत नही… तू बहुत सिखके बडा होने का…”
अश्यातच दिवस कसेबसे जात होते. सगुणाने बाळाला जन्म दिला आणि ते बाळ एक मुलगा होता. काळ्या किट्ट, नाउमेद आयुष्यात उमेदीचा एक किरण म्हणून तिने बाळाचं नाव किरण ठेवलं. अनेकांनी आश्रमात सोडायची युक्ती दिली पण तिने एक नाहीं ऐकली… तिथेच त्या वातावरणात बाळाला मोठं करत ती एक आई होण्याचं आणि एक बारबाला या दोघांचं कर्तव्य पार पाडत होती. बारमध्ये येणारे कित्येक पुरुष मजा घेऊन निघून जायचे पण त्या निष्पाप बाळाकडे पाहून स्वतःमधल्या उसळलेल्या मर्दानगीला कोणी रोकु शकत नव्हते.
बाळ वाढत होतं, त्याप्रमाणे सगुणाची चिंता दुपटीने वाढत होती. त्याचं शिक्षण, त्याचं भविष्य याने सगुणाच्या कित्येक रात्री जागून काढल्या होत्या. ममतेच्या छायेखाली किरण वाढत होता. चालायला लागल्यापासूनच तिने त्याला पाळणाघरात टाकले. त्याला आपल्या कामाबद्दल तिने कधी कळूच दिले नाही. थोडंफार समजायला लागल्यावरच न राहवून तिने त्याला हॉस्टेलला टाकले.
खर्च सर्व स्वतः उचलला. किरणच्या प्रत्येक गोष्टीत तिने कशाचीही कमी पडू नाहीं दिली. किरणकडे पाहून सगुणाचे दिवस ही आनंदात चालले होते. किरणही आईच्या गळ्याभोवती हाताचा गोल करून खांद्यावर डोकं ठेऊन, तर कधी आईच्या कुशीत शिरून रडणं… हसणं… होस्टेलमधल्या गमती जमती सांगणं… जणू मायलेकाचं नातंच होत दृष्ट लागण्यासारखं. महिन्यातून ३-४ वेळा सगुणाच त्याला भेटून यायची. त्याला भेटून आली म्हणजे समजून जायचं आज तीच पोट भरलेलं आहे… जेवायची गरज नाही.. तिच्या मैत्रीणीशीही बोलताना किरण बद्दलच बोलत राहायची.
एकदिवस असंच होस्टेलला भेट दिल्यानंतर तिला जे समजलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. किरण मुलगा असून मुलींमध्ये राहणं पसंद करतो… मुलींसारखं राहणं पसंद करतो. आणि त्याच्या हालचाली ह्या मुलींप्रमाणेच असल्याचं सगुणाला किरणच्या शिक्षकांकडून कळलं. सगुणावर दुःखाचा पहाड कोसळला. नक्की काय करावं सुचेना. पण स्वतःच बाळ हे स्वतःच असत. तेच तर तिच्या जगण्याचं कारण आणि त्याच्या पासून नातं तोडून तिला काय मिळणार होत…? अखेर तिने सत्य स्वीकारायचं ठरवलं.
बाहेरच्या स्त्री आणि पुरुष या जगात एक नंपुसकलिंगी हि असतं.. .हे ती सिद्ध करू शकत नव्हती… अनेकांनी किरण ला धंद्यात यायची तिला युक्ती दिली. पण तिने त्यांचं एक न ऐकता… त्याला दुसऱ्या हॉस्टेल ला टाकलं. अनेक संकटांशी सामना करत किरणचं शिक्षण चालू होतं. किरणच्या नपुसंक असण्याचा आता तिला फरक पडत नव्हता. तर या जगात माझं स्वतःच असं कोणीतरी आहे. ज्याने मला जगायची नवीन उमेद मिळते. हरल्यावर पुन्हा लढावं, रडल्यावर स्वतःलाच सावरावे, हसायला, बोलायला, स्वतःचा जीव ओवाळून टाकायला एक कारण मिळालं होतं. आणि ते कारण दुसरं तिसरं कोणी नसून फक्त किरण होता.
किरण कधी बाबांबद्दल सगुणाला विचारतच नसे. आईबाबांचे रोल जर आईनेच पूर्ण केले तर गरज आहे का बाबांची…?
किरणला सुट्टीच्या दिवशी कंटाळा येऊ नये म्हणून बार मधून थोडावेळ काढून त्याला फिरायला न्यायची. त्याच्या आवडत्या गोष्टी घेऊन देणं… नवीन कपडे घेणं… सर्व काही ती त्याच्यासाठी करत होती. जे आयुष्यात कधीच कोणी तिच्यासाठी केलं नव्हतं… ते आज ती किरणसाठी करत होती. छोट्याछोट्या गोष्टीतील सुख अनुभवत होती.
किरणला आता थोडंफार समजू लागलं होतं. आईची मेहनत… तिची काळजी हळू हळू समजू लागलं होतं.
किरण एका स्पर्धा परीक्षेत पहिला आला. ही बातमी आपणच आईला सरप्राईझ द्यावं म्हणून न सांगता तो आईच्या कामाच्या ठिकाणी गेला. धावत आईच्या रूममध्ये गेला आणि पडदा बाजूला करतो तर,
आई एका अनोळखी व्यक्ती सोबत…
किरणला शरम वाटली. लागलीच पडदा खेचून तो निघणार… इतक्यात सगुणाने त्याला पाहिलं. सगुणा त्या व्यक्तीला थांबवून किरणला पाहायला जाणार तोच माणसाने सगुणाला स्वतःजवळ खेचलं..
सगुणा निर्जीव होऊन तिथे पडली होती. तिच्यासोबत काय घडतंय याचं काहीच भान तिला नव्हतं… भावनाशून्य होऊन सगुणाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. जीव द्यायचा क्षणभर विचार तिच्या मनात आला पण किरणपायी तो विचार तिने आपसूकच गिळला.
ती रात्र सगुणासाठी वैरीण होती. सरता सरत नव्हती. झालेला प्रकार डोळ्यासमोरून जातच नव्हता.
सकाळी सगुणा लवकरच तिथून निघाली किरणला भेटायला. पण किरणने भेटण्यास नकार दिला. ही माझी कोणी नाही म्हणत तिच्या तोंडासमोर दार बंद करून निघून गेला. सगुणा तिथंच रडत खाली बसली. पण काही उपयोग झाला नाहीं. दुसऱ्यादिवशी होस्टेलला सगुणा गेली. पण पूर्ण दिवस गेला किरण होस्टेलला आलाच नाहीं. सगुणा तशीच रडत बार मध्ये गेली.
घडलेला प्रकार आठवून डोक्यात मुंग्याच भरल्या होत्या. काय करावं सुचेना. माझ्या मुलाने मला स्वतःची आई म्हणण्यापासून नकार द्यावा ह्या इतकं मोठं दुःख ते काय असेल…?
रोज कस्टमर यायचे पण सगुणा काहीच प्रतिसाद देत नव्हती. निर्जीव देहासारखी पडून राहत होती. केस विस्कटलेले. डोळे रडून सुजलेले, शरीर हि निपचित पडलेलं. १-२ कस्टमरनी तिच्याबद्दल तक्रार केली.
पण काहीच उपयोग झाला नाही.
सगुणा आजारी पडायला लागली. तरीही होस्टेलच्या घिरट्या कमी झाल्या नव्हत्या. लांबूनच कुठे किरण दिसतो का पाहत असायची. नाही दिसल्यास मित्रांकडे चौकशी करून रडत निघून जायची. किरणच्या चिंतेने सगुणा अंथरुणाला खिळली. जेवण पाणी कमी झालंच होतं. शरीर जे तिचं कधी नव्हतंच पण ते ही आता कमी प्रतिसाद देऊ लागलं.
सगुणा आता कस्टमरना खुश करत नाही तसंच तिच्याकडून आपल्याला कुठलाही फायदा होत नाही आणि दिवसेंदिवस कस्टमरच्या तक्रारी वाढायला लागल्याकारणाने बारमालकाने सगुणाला बाहेर हाकलून दिलं.
जाता जाता बारमालकाला हेच म्हणाली,’ साब… ये बार है बार. यहा औरत आती भी आपकी मर्जीसे और जाती भी आपकी मर्जीसे…”
तशीच धडपडत किरणच्या होस्टेलजवळ आली आणि होस्टेलच्या गेटजवळ बसून राहिली. किरण दिसतो का हे पाहत होती… पण किरण स्वतःच्या खोली मध्ये होता. बाहेर येणं त्याने जवळपास टाळलंच होत.
पोराच्या डोक्यात माझ्याबद्दल वाईट भरलेलं आहे. आता जगून काहीच उपयोग नाही.स्वतःला आणि स्वतःच्या कर्माला दोष देत बिचारी तोंडात पदर कोंबून रडत होती. मनातलं बोलू शकत नव्हती म्हणूनच अश्रूंना वाट मोकळी करून देत होती.
२-३ दिवस काही खाणंपिणं नाही, आणि अश्यातच भर उन्हात गेटजवळ बसून पोराला पाहणारी ती माय तिथंच कोसळली. आजूबाजूचा परिसर गोळा झाला. काहींनी तोंडावर पाणी मारलं, काहींनी कांदा फोडून लावला पण ती माय अजून बेशुद्धच होती. तोंडून अस्पष्ट शब्द निघत होते… ‘मेरा लाल… मेरा किरण…”
“पोराने सोडलं वाटतं आईला… इथं रस्त्यावर का सोडली…? वृद्धाश्रमात तरी सोडायचं…”काही लोक पुटपुटत होते.
सगुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. भानावर येताच तिने डॉक्टरांना हात जोडून सांगितले,
“मेरेकु मार डालो… नही जीना मेरेकु… मार डालो डॉक्टरसाब…”
डॉक्टरांनी तिला सावरलं. शांत केलं.
काही वेळ सगुणा एकाच ठिकाणी पाहत होती आणि झालेल्या घटना आठवत होती.
इतक्यात मागून एक ओळखीचा हात गळ्यात पडला.
सगुणा मागे वळून पाहते तर तो किरण होता.
किरणने दोन हात लांब करून मानेने होकारार्थी इशारा केला.
सगुणा त्याच्या इवल्याश्या मिठीमध्ये स्वतःला सामावत रडत होती… त्यातच त्याचे मुके घेत होती. “का अशी वागलीस आई…?” किरण म्हणाला.
सगुणा रडतच होती.त्याच्या प्रश्नाला उत्तर कदाचित नव्हतं तिच्याकडे.
“आई तुझ्या कामावर नाही ग मला राग आला… तू ती गोष्ट माझ्यापासून लपवलीस याचा मला राग आला. माझ्यावरून जीव ओवाळून टाकतेस न मग अशी का वागलीस… का लपवलंस माझ्यापासून…? आई ग तुझ्या कामामुळे माझ्या मनात वाईट विचार नाहीत ग… ना मी तुला दोष देत… तू माझी आई आहेस आणि तू सर्व माझ्याशी बोलावसं हेच मला वाटत… तू तुझं सुख दुःख माझ्याशी बोलावसं हीच इच्छा. मी सर्व सांगतो ना ग तुला…”
किरण तिचे डोळे पुसत होता.
सगुणा त्याच्या हाताला अडवत त्याच्या हाताचे मुके घेत होती.
“आई माझ्यासाठी तू नेहमीच माझी आई बाबा होतीस आणि नेहमीच राहणार आहेस… तू नको रडूस… मला खचल्यासारखं वाटत… माझा आधार आहेस न… मग….? तू कसं मजबूत राहायला हवंस… तुझ्याकडून प्रेरणा घेतो न मी… आणि तू अशी रडतेस… आई मला तुझी लाज नाहीं तर अभिमान वाटतो.”
काहीही न मागता आज सगुणाला खूप काही मिळालं होतं.
सगुणा शांत झाली.पोराच्या त्या मिठीने सगुणावर अशी कमाल केली की डॉक्टरांचं औषधदेखील फिकं पडलं होतं..
तृप्ती कदम
हौशी लेखिका, मराठी Vlogger
2 Comments
nice story
Khupach chan aahe ….heart touching …..aai aani mula madhil hrudysparshi gost..♥️♥️