रात्रीचे ११.५० झाले होते… नितीन केबिन मध्ये बसून भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर कडे एकटक पाहत विचार करत होता.. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची भीती दिसत होती… संपूर्ण ऑफिस मध्ये फक्त तो एकटाच होता…
नितीन पेशाने civil engineer… महिन्याभरापूर्वीच त्याला कंपनीचं CEO हे पद मिळालं होतं तेही अपघातानेच… कारण मागील महिन्यातच त्याचे बॉस म्हणजेच आधीचे CEO यांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि आपसूकच त्याला हे पद मिळालं होतं… नितीन गेली ५ वर्ष या कंपनीत काम करत होता… त्यामुळे साहजिकच कंपनीच्या एकूण एक गोष्टी तो जाणून होता… तो CEO चा जणू काही तो Right Hand च बनून गेला होता. कंपनीचा CEO नितीनला न विचारता कंपनीशी संबंधित कुठलेही कॉन्ट्रॅक्ट अथवा निर्णय घेत नसे. त्यामुळे, अल्पावधीतच त्याने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती… पण त्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांना मात्र त्याची प्रगती झालेली पाहवली नाही आणि म्हणूनच नितीनच्या कंपनीला मिळालेल्या काँट्रॅक्टवर कुरघोडी करण्याचं काम त्यांनी सुरु केलं आणि नितीनच्या कंपनीला उतरती कळा लागली… वर्षभरातच खराब कामगिरीमुळे नितीनची कंपनी डबघाईला आली… कोणीही त्यांच्यासोबत काम करू इच्छित नव्हते… पण नितीन फारच महत्वाकांक्षी होता… तो खचून न जाता त्याच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी वाटेल ती मेहनत करू लागला… धडपडू लागला… त्याला त्याच्या कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचेच होते… कसेबसे त्याने एका रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळवून दिले आणि वेळेआधी ते काम पूर्ण देखील केले…
पण हाच रस्ता बनत असताना तिथे काम करणाऱ्या २ कामगारांचे अचानक अपघातात जीव गेले होते आणि त्यामुळेच नितीनच्या कंपनी विरोधात कोर्टात case उभी राहिली होती… पण कुठलेच पुरावे न सापडल्यामुळे नितीन व त्याचे इतर सहकारी निर्दोष मुक्त झाले होते…
तो रस्ता झाल्यापासून नितीनच्या कंपनीला जणू सुगीचे दिवस आले… कॉन्ट्रॅक्ट वर कॉन्ट्रॅक्ट मिळू लागले पण त्यापेक्षा जास्त त्यांना नुकसान भोगावे लागले… हे नुकसान आर्थिक नसून मानवी जीवांचे होते… हा रस्ता बनवून झाल्यावर एका महिन्याच्या आतच त्याला त्याच्या एका पोलीस मित्राचा जीव गमवावा लागला… त्यानंतर दुसऱ्या महिन्यातच त्याचा जुनिअर अपघातात ठार झाला होता आणि आता मागील महिन्यातच त्याचे CEO अपघातात मरण पावले होते आणि त्यांचं CEO पद हे नितीनला मिळालं होतं.
खरं तर त्या तिघांनीही नितिनसोबत राहून दिवस-रात्र एक करून रस्त्याचे काम वेळेत पूर्ण केले होते… आश्चर्याची बाब हि होती कि त्या तिघांचे अपघाती मृत्यू त्याच रस्त्यावर दर एका महिन्याला पाठोपाठ झाले होते…
कदाचित यामुळेच नितीन टक लावून कॅलेंडर कडे पाहत बसला होता… कारण उद्या महिन्याची शेवटची तारीख आणि अजूनपर्यंत त्या रस्त्यावर कुठलाही अपघात झाला नव्हता… तितक्यात घड्याळात १२ चे टोले पडले… नितीन दचकूनच भानावर आला आणि घड्याळाकडे पाहू लागला… कपाळावर जमा झालेला घाम खिशातून रुमाल काढत पुसला… घाई घाईनेच सर्व आवरत केबिन मधल्या lights बंद केल्या आणि गाडीच्या किल्या घेऊन तो निघाला…
गाडी चालवत असताना तो सतत विचारात होता… त्याच्या चेहऱ्यावरील काळजी स्पष्ट दिसत होती… एक दोनदा तो समोरून येणाऱ्या गाड्यांना ठोकता ठोकता वाचला… त्याने कसेबसे स्वतःला सावरत गाडी एका पानपट्टीजवळ आणली… पानपट्टीवाल्याकडून सिगारेटचे पाकीट घेत त्यातील एक सिगारेट त्याने शिलगावली आणि झुरके घेऊ लागला… काही वेळानंतर निघायच्या बेतात असताना त्याला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला त्याचा मित्र विकास बस स्टॉपवर बसलेला दिसला… त्या बस स्टॉप वर त्याच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते… नितीनने ताबडतोब हातातील सिगारेट बाजूला टाकत धावतच विकासजवळ गेला…
“काय रे? इथे काय करत आहेस? तेही इतक्या रात्री” नितीनने काळजीपूर्वक विचारले
“तुझीच वाट पाहत होतो” चेहऱ्यावर कसलेही भाव न आणता विकास अगदी गूढ स्वरात म्हणाला
“म्हणजे?” नितीनने गोंधळून विचारले
“हा तुझा नेहमीचा रस्ता आहे ना… रोज पाहतो मी तुला…” विकासने पुन्हा शांतपणे उत्तर दिले
“मग कधी हाक नाही मारलीस ती…”
ते ऐकून विकास त्याच्याकडे पाहत गूढ हसला…
त्याचं ते विचित्र वागणं पाहून नितीनने पुढे काहीही विचारायची तसदी घेतली नाही…
“चल तुला घरी सोडतो..” नितीन गाडीकडे इशारा करत म्हणाला…
विकासदेखील काहीही न बोलता नितीनच्या मागोमाग गाडीच्या दिशेने चालू लागला…
गाडीजवळ येताच विकास काहीही न बोलता ड्राइवरच्या बाजूच्या सीट वर जाऊन बसला… नितीन आश्चर्यचकित होऊन ते सर्व पाहत होता…
विकास नितीनचा शाळेपासूनचा मित्र… पुढे गेल्यावर नितीन इंजिनीरिंग कडे वळला तर विकासने आपला मोर्चा वकिलीकडे वळवला…
गाडी सुरु झाल्यापासून नितीन त्याला काही ना काही विचारू लागला पण विकास मात्र त्याच्याकडे न पाहता समोर पाहत शांतपणे त्याची उत्तरं देत होता… त्याच्या अशा वागण्यामुळे नितीन जरा जास्तच विचारात पडला… नेहमी हसत खेळत असणारा आपला मित्र आज आपल्याशी इतका गूढ का वागतोय याचंच नितीनला नवल वाटत होतं… काही वेळ गेल्यानंतर विकासने नितीनला म्हटले “काम कसं चालू आहे?”
“चालू आहे देवाच्या कृपेने…”
“देवाच्या कृपेने कि पैश्याच्या?”
“What do you mean?”
“You know what I mean Nitin”
“हे बघ विकास… तुला पूर्वीच्या गोष्टी उकरून काढायच्या असतील तर मला त्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे…”
“का? लाज वाटतेय केलेल्या पापांची…” विकास मान वळवून नितीनच्या डोळ्यात पाहत म्हणाला
नितीन त्याच्यापासून नजर चोरत गाडी चालवत राहिला…
“ते दोन्हीही अपघात होते विकास आणि त्यात माझ्या कंपनीचा कसलाही हात नव्हता हे कोर्टात सिद्ध होऊन आता ४ महिने झालेत…”
“आजकाल पैशाच्या जोरावर काहीही सिद्ध करता येतं नितीन” विकास चेहऱ्यावर गूढ हसू आणत म्हणाला
“तुला नेमका त्रास कसला होतोय विकास? तू ती केस हरलास याचा की ती केस हरल्यानंतर तू कोर्टात जे आकांडतांडव केलंस त्यानंतर तुझी वकिली रद्द झाली याचा?”
विकास नितीन कडे पाहून हसला…
“तुझ्यासारखे गुन्हेगार जर पैश्याच्या जोरावर असे मोकाट सुटत असतील तर काय अर्थ आहे त्या वकिलीला…”
“मी गुन्हेगार नाही आहे आणि हे सिद्ध झालंय…” नितीनचा आवाज चढला
“गप्प बस..” इतका वेळ शांत असलेला विकास नितीनवर खेकसला…
“अरे तुझ्याच रस्त्याच्या कामासाठी ते दोघे बाप लेक राबत होते ना… आणि त्यांनाच ठार केलंस तेही तुझ्या साथीदारांसोबत मिळून… त्यांना मात्र त्यांच्या कर्माची फळं मिळालीत…” विकासचा चेहरा रागाने लाल झाला…
“मूर्खासारखं बडबडू नकोस…” नितीन विकासाकडे न पाहताच म्हणाला…
विकास जोरजोरात हसू लागला…
“अरे वर्षभरापूर्वीच बंद होणारी तुझी कंपनी आणि तिला वाचण्यासाठी तूम्ही चौघे जण मांत्रिकाकडे जाऊन काळी जादू करत होता म्हणे…”
“क…क…काहीही काय… खोटं आहे हे सगळं” नितीनच्या आवाजाला कंप सुटू लागला
“अच्छा? बरं मग तो रस्ता झाल्यानंतर तुझ्या कंपनीची इतकी भरभराट कशी झाली? त्या रस्त्यासाठी दिलेले २ निष्पाप बळी दिल्यानंतरच ना?”
नितीनने करकच्चून ब्रेक दाबत गाडी थांबवली..
“enough is enough विकास… काहीही बरळतोयस तू.. बाहेर ये आता या सगळ्यातून.. ते दोन्हीही अपघातच होते आणि त्यांच्या कुटुंबाला त्याची भरपाई देखील मिळाली आहे… For god sake थांबव हा विषय आता… अरे शिकला सवरलेला तू तरी असल्या अंधश्रद्धांना बळी पडतोस…” नितीनचा स्वर चढला..
विकास खिडकीतून बाहेर पाहत कुत्सित हसला…
नितीनने काही वेळ विकासकडे पहिले आणि पुन्हा गाडी सुरु केली..
काही वेळ दोघेही शांत होते… गाडीच्या डेस्कवर अलगद हात फिरवत विकास म्हणाला “माणसाला त्याच्या कर्माची फळे इथेच भोगावी लागतात…”
“काय म्हणायचंय तुला?” नितीन विकासकडे पाहत म्हणाला
“म्हणजे बघ ना… खोटे पुरावे जमा करून तुमचा गुन्हा लपवणारा तुझा पोलीस मित्र.. तुझा जुनिअर आणि तुझा बॉस ज्यांच्या साथीने घेतलेले ते २ बळी… या तिघांना मात्र त्यांच्या कर्माची फळं मिळाली आणि तीही तिथेच जिथे तुम्ही ते बळी दिलेत”
नितीनच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या… आवंढे गिळत… घाबरतच तो गाडी चालवू लागला…
विकास गूढपणे हसत त्याच्याकडे पाहत म्हणाला “तुला भीती नाही वाटत?”
“भ…भ…भीती कसली?” नितीन घाबरतच म्हणाला
“प्रत्येक महिन्याला तुझ्या साथीदारांचे बळी गेले… या महिन्यात कदाचित…” विकास नितीनच्या जवळ येत हळू आवाजात म्हणाला
“what nonsense… हा..हा… महिना संपला सुद्धा…” नितीनच्या चेहऱ्यावरील भीती वाढू लागली
“आज शेवटची तारीख आहे नितीन” विकास जोरजोरात हसू लागला
नितीन मात्र त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवत राहिला… अचानक विकास ओरडला “थांब…”
नितीनने ताबडतोब गाडी थांबवली…
“गाडी उजवीकडे वळव…” विकास म्हणाला
“अरे पण…” नितीन कपाळावर आठ्या आणत म्हणाला…
“का? भीती वाटतेय त्या रस्त्यावरून जायला… अरे तुम्हीच बनवलाय ना तो रस्ता… मग घाबरतोस कशाला…”
नितीन काही वेळ त्या रस्त्याकडे पाहत राहिला आणि त्याने गाडी उजवीकडील रस्त्याच्या दिशेने वळवली… त्या रस्त्यावरून जाताना त्याची छाती जोरजोरात धडधडू लागली… रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी असलेली झाडे आक्राळ विक्राळ वाटू लागली… शिवाय इतर कुठलेही वाहन त्या रस्त्यावरून ये जा करत नव्हते… रस्त्यावरील शांतता फारच जीवघेणी होती… तितक्यात अचानक त्याची गाडी बंद पडली… नितीनने २-३ वेळा किल्ली फिरवून पहिली, पण गाडी सुरु होईना… त्याने घड्याळात पहिले… रात्रीचे २ वाजले होते… विकास काहीही न बोलता गाडीतून खाली उतरला… नितीन देखील त्याच्या मागोमाग बाहेर आला… दोघेही त्या सामसूम रस्त्यावरून चालत निघाले… जबडा उघडून बसलेल्या सैतानासारखा तो रस्ता आता नितीनला दिसू लागला… त्याची घाबरी नजर चहू दिशांना फिरू लागली… रस्त्याच्या कडेला असलेला बुलडोझर पाहून तर तो आणखीनच घाबरला… त्या भयाण रात्री तो बुलडोझर त्याला एखाद्या भक्षकाची वाट पाहत बसलेल्या जनावरासारखा वाटला… विकास मात्र शांतपणे त्याच्यासोबत चालत होता इतक्यात नितीन ने मागे वळून पहिले त्यावेळी २ काळ्याकुट्ट सावल्या त्या दोघांच्या दिशेने चालून येत होत्या… नितीन भराभर पाऊलं टाकू लागला पण त्या सावल्यांचा वेग इतका होता कि क्षणातच त्या दोघांच्या मागे आल्या आणि त्यांनी लगेचच विकासवर झडप घातली…
विकास घाबरून ओरडू लागला “अरे सोडा मला… क…क… कोण आहात तुम्ही… नितीन… नितीन… वाचव मला…”
नितीनने खिशातून सिगारेटचं पाकीट काढले… त्यातून एक सिगारेट काढत ती तोंडाला लावत शिलगावली… सिगारेटचे झुरके घेत तो म्हणाला… “मला माफ कर विकास… मांत्रिकाला वचन दिल्याप्रमाणे दर महिन्याला या रस्त्याला एक बळी देणं मला भाग आहे… आज महिन्याची शेवटची तारीख… माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता… I am sorry”
” अरे… अरे ए काय बडबडतोयस… अरे सोडा मला… कोण आहेत हे… सोडा… नितीन… नितीन…” विकास गयावया करत होता
ते रस्त्याचे दोन मानकरी विकासला ओढतच रस्त्याच्या मधोमध घेऊन गेले… नितीन हातातील सिगारेट जमिनीवर टाकून ती पायाने विझवत गाडीच्या दिशेने चालू लागला… विकासचा आवाज मदतीसाठी चहू दिशा घुमू लागला… तो ऐकायला नितीनशिवाय तिथे कुणीच नव्हतं… रस्त्याच्या कडेला असलेला बुलडोझर आपोआप विकासच्या दिशेने चालू लागला… नितीनच्या मनात मात्र पुन्हा एक प्रश्न डोकावू लागला… “पुढच्या महिन्यात कोणाचा बळी द्यावा?”
संकेत सावंत
हौशी लेखक, मराठी Vlogger, Web Developer
IT क्षेत्रात Sr. Web Developer म्हणून काम करत असलेला आणि फावल्या वेळात मराठी लिखाण करणारा हौशी Vlogger!