आमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का…? तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे (ऐकून होतो) आणि ती व्यक्ती सोबत असणाऱ्या व्यक्तींना घाबरवतात…
असो तर गोष्ट अशी आहे…..
सन : २००४-२००५ कामगार कल्याण केंद्र, अंधेरी विभागातर्फे स्पर्धेच्या नाटकासाठी मी इथं कुणी कुणाला सावरायचं ह्या नाटकात काम करीत होतो.
रंगीत तालमीला दोन दिवस होते आणि नाटक कमी वेळेत संपणार आहे असे कळले, आता काय करायचे सगळे विचार करायला लागले आणि मला माझ्या ‘दोनाचे चार’ व्हायच्या अगोदरचा एक मजेशीर किस्सा आठवला, तर…
आमच्या मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे श्री. सत्यनारायणाची महापूजा होती, पूजा, प्रसाद, कार्यक्रम सगळे झाले आणि जागरणाची चाहूल सगळ्यांना लागली, मग सगळेच कुणी कॅरम, चेस, मेंडीकोट, गाण्याच्या भेंड्या असा खेळ खेळू लागले. गाण्याच्या भेंड्या आणि खेळ रंगत चालला होता आणि मध्येच घारे डोळे असलेला आमचा मित्र सोसायटीच्या बाहेर लघुशंका करण्यासाठी गेला आणि गेला तसाच मागे आला आणि शांत बसून राहिला.
मी : (त्याला न राहवून विचारलं) काय रे काय झालं,
तो: काही नाही, असंच…
मी: अरे मग खेळ ना, बघतोस काय तिथे, मागे मागे?
तो : (पुन्हा तेच) काही नाही… (आणि हळूच मागे पहाणे सुरुच, माझे संपूर्ण लक्ष खेळाकडे आणि त्याच्याकडे होते, पून्हा मी त्याला विचारले.)
मी : झोप येतेय कां…??
तो : नाही, मी आलोच! (आणि पून्हा लघुशंकेसाठी गेला… आणि पून्हा तेच परत माघारी आला आणि गप्प बसून राहीला) मग मात्र आम्ही त्याला थोडेसे रागावून विचारले काय चाललंय तुझं
तो : भिती वाटतेय, कुणीतरी आहे तिथं…!!!
आम्ही सावरलो, स्वतःला समजवू लागलो आणि म्हणालो चल आम्ही येतो दाखव आणि…
तो: मी नाही… मी नाही, करत राहीला, आम्ही त्याला जबरदस्ती उठवलं आणि सोसायटीच्या गेटवर आणले, आम्ही विचारले कसली भिती वाटतेय?
तो : (तर तो म्हणे) ते पहा, कुणीतरी आहे तिथं, (आम्ही पाहिले तर तिथं कुणीच दिसत नव्हतं.. आम्ही त्याला रागातच विचारले कोण आहे.) तर म्हणतो, ती पहा, ती बाई, माझ्याकडे बघतेय, आणि आतमध्ये पळून गेला,
आम्ही: डरपोक कुठला… आणि आम्ही सगळे लघुशंका करायला उभे राहीलो आणि अचानक माझ्या उजव्या बाजूला सावली हलल्या सारखे झाले….
आणि काळजाचा ठोकाच चुकला….
मी हळूच तिथून सटकलो आणि पुजेकडे येऊन बसलो, पाया पडलो, सत्यनारायणाचा प्रसाद घेतला, सगळे मित्र आले आणि म्हणतात कसे, *कोण आहे रे तिथं* आणि मी सहजपणे म्हणून गेलो, ” *केस मोकळे सोडलेली बाई* सगळे मित्र अजूनच *टरकले-हादरले* आणि म्हणाले चल दाखव, कुठे आहे ती, मी घाबरत घाबरत त्यांना बाहेर घेऊन आलो आणि आम्हा सगळ्यांनाच ती *केस मोकळे सोडलेली बाई* दिसली, मी लांबुनच त्यांना ती दाखवली आणि आता खरी मजा आली सगळ्यांची चांगलीच टरकली होती, माझ्या मागोमाग सगळेच येऊन बसले, आमच्यातले एक-दोघ बिनधास्त होते, डेरर (आणि मी सुद्धा, टपली मारण्यात एकदम तरबेजच होतो) आमच्या मित्रांमध्ये टोपण नावातला एक मित्र ओमप्रकाश, तो म्हणाला चला आपण आवाज देऊन त्या “केस सोडलेल्या बाईला”(जर ‘भूत’ नसेल तर तिला दम देऊया)
आम्ही: हो म्हणालो आणि सोसायटीच्या गेटवर आलो, बघतो तर “केस मोकळे सोडलेली बाई” तिथेच आणि तशीच रूक्षपणे उभी होती, आम्ही परत सोसायटीच्या आडोशाला आलो, प्लान केला, आडोशातून बाहेर आलो, आता बघतो तर काय… केस मोकळे सोडलेली बाई गायब, आता काय रात्रीचे अडीच-तीन वाजत आले होते. आम्ही थोडं म्हणजे घाबरलोच होतो इतक्यात दूरवर एका दुकानावर अंधुकसा लाल प्रकाश दिसला आणि त्या दुकानाच्या बोळातून एक पांढरे शुभ्र कपडे घातलेला गृहस्थ बाहेर पडला, त्याबरोबर लगेचच एक रिक्षा येऊन त्या गृहस्थाच्या समोर थांबली आणि तो रिक्षा ड्रायव्हर सुद्धा पांढ-या कपड्यातच होता, आता ती केस मोकळे सोडलेली बाई आमच्या सोसायटीच्या दिशेने येऊ लागली, आता आमची जास्तच टरकली.
आम्ही सगळे पुन्हा आडोशाला झालो.
आणि आम्ही आडोशातून पुन्हा बाहेर वाकून पाहणार तर ते तिघेही आडोशाला उभे! आमच्या सगळ्यांची बोबडीच वळली आणि आम्ही सगळेच चक्कर येऊन पडायच्या अगोदर त्या गृहस्थाने आपले तोंड उघडले आणि दम द्यायला सुरुवात केली, एकट्या मुलीला पाहून तिची मस्करी करता, लाजा नाही वाटतं तुम्हाला, ती बारबाला असली म्हणून काय झालं, ती एक मुलगी आहे…?
धन्यवाद……
(आम्ही हाच गमतीशीर किस्सा त्या २००४-०५ सालच्या इथं कुणी कुणाला सावरायचं या नाटकात थोड्या वेगळ्या पद्धतीने वापरला.)
अनिल कासकर
अभिनेता, रंगभूषाकार
विविध कलाकारांना रंगमंचावर जाण्याआधीच त्यांच्या व्यक्तिरेखेत शिरण्यासाठी मदत करणारा किमयागार!