स्वरा मोकाशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “हरवलेल्या पत्त्यांचा बंगला” हे नाटक दीर्घकाळ स्मरणात राहील. मुले कितीही मोठी झाली तरी त्यांच्या पालकांकडून असलेल्या अपेक्षा कमी होत नाहीत, याचीच गोष्ट सांगणारं हे नाटक आहे.
तीन स्त्रियांच्या आयुष्यावरील भाष्य त्यामध्ये गुंफण्यात देखील लेखक-दिग्दर्शक द्वयी यशस्वी झालेले दिसले. या मधील ‘इंदिराबाई’ त्यागाला आदर्श मानणाऱ्या पिढीत जन्माला आलेल्यांच प्रतिनिधित्व करताना दिसतात. वंदना गुप्ते यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्यांनी साकारलेली आई, तीच्या वागणुकीतून आणि आलेल्या अनुभवातून एका निष्कर्षाप्रत येऊन प्रेक्षकांना मेसेजही देते ही बाब भावणारी आहे. वंदना गुप्ते यांनी दाखवलेली अभिनयातील सह्जता विशेष उल्लेखनीय तर आहेच , शिवाय त्यांनी साकारलेल्या इंदिराबाईने त्यांच्या रंगमंचावरील कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. दुसऱ्या पिढीतली, आईला गृहीत धरणारी ‘ईरा ‘ हि व्यक्तिरेखा प्रतीक्षा लोणकर यांनी तोडीसतोड साकारली आहे. भावनांचा स्तर योग्यरीतीने दाखवल्यामुळे ही ईरा आपल्या आसपास वावरत असलेल्यां पैकीच वाटते. तिसऱ्या पिढीतील ‘निधी’ साकारणारी दीप्ती लेले ज्येष्ठ अभिनेत्रीं समोर अभिनयाचा सामना असून देखील आपली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहील इतक्या समर्थपणे साकारण्यात यशस्वी झाली आहे.
तीन बायकांची वेगळ्या पध्दतीने गुंफलेली गोष्ट सांगणारे हे नाटक गुदगुदल्या आणि चिमटे काढत प्रेक्षकांना कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंधाच्या पलीकडील जीवनातील वास्तव्याचा प्रवास तर घडवतेच, शिवाय हरवलेले पत्ते गवसल्याचा आनंद देखील प्रेक्षकांना मिळतो.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
हौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.
3 Comments
सुंदर विवेचन!!
सुंदर लेखन शैली .
नाटकाचे सुंदर विसलेषण व लेखन शैली फारच छान आहे.