“प्रयोग मालाड” निर्मित आणि प्रेमानंद गज्वी लिखित “घोटभर पाणी” या एकांकिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. सामाजिक आशय असलेल्या या एकांकिकेचे, एकांकिका स्पर्धा, पथ नाटय, टेरेस थिएटर असे सर्वत्र प्रयोग होत होते. “प्रयोग मालाड” ने या एकांकिकेद्वारे जनजागृती करण्याचा जणू वसा घेतला होता.
रामकृष्ण गाडगीळ आणि मी “घोटभर पाणी” चे प्रयोग सादर करत होतो. गाडगीळांची भूमिका सुनील तावडेही करत असे. तर माझी भूमिका हिंदीमध्ये राजेंद्र चावला करायचा.
५० वा प्रयोग, नाटयदर्पणचे सुधीर दामले यांच्या उपस्थितीत पथ नाटय स्वरूपात सादर झाला. १०० व्या प्रयोगापर्यंत आम्ही लवकरच पोहोचणार होतो. १०० वा प्रयोग छबिलदासला करण्याचे दोन महिने आधीच ठरले होते. तेवढ्यात मला मोटरसायकलचा अपघात झाला. डावा हात प्लॅस्टरमध्ये गेला. रामकृष्ण गाडगीळ आणि सुनील तावडे यांनी हा प्रयोग करावा असे ठरले. या प्रयोगाच्या आदल्या दिवशीच माझ्या हाताचे प्लॅस्टर डॉक्टरांनी काढले. तरीपण हात थोडा वाकडाच होता. अंतिमतः हा प्रयोग पुन्हा रामकृष्ण गाडगीळ आणि मी करायचे ठरले. इजा होऊ नये म्हणून वाकड्या हाताला सांभाळत केलेला तो प्रयोग आजही आठवतो. कारण त्यात मारहाणीचा प्रवेश होता.
“घोटभर पाणी” ची कीर्ती दूरवर पसरत होती. एक दिवस गाडगीळांनी सांगितले की कल्याणला “घोटभर पाणी” सादर करण्यासाठी निमंत्रण आलेय. आपल्याला प्रयोग करायचाय. मी ही तयार झालो. दोघेही संध्याकाळी ऑफिसमधून लवकर निघून कल्याणला जाण्यासाठी ट्रेनमध्ये समोरासमोर बसलो. सवयीप्रमाणे चक्री मारायला सुरुवात केली. “घोटभर पाणी” ची चक्री मारण्याच्या नादात आम्ही ट्रेनमधील आजूबाजूच्या प्रवाशांना विसरलो. चक्री सुरूच होती. १५ मिनिटांनी चक्री संपल्यावर भानावर आलो. सर्व सहप्रवासी आमच्याकडे ‘यांना वेड लागलंय की काय?’ अशा नजरेने पहात होते. नक्कीच आम्हाला ते वेडे समजले असतील.
कल्याणला कोळसेवाडीत पोहोचलो. त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. चहापान झाले आणि आम्ही रंगमंचाकडे निघालो. रंगमंच पाहिला आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे पहातच राहिलो. कारण …
आमच्या समोर चक्क लोखंडी रंगमंच होता. चार लोखंडी खाटा एकमेकाला सुतळीने बांधल्या होत्या आणि त्यावर गाद्या विराजमान झाल्या होत्या. डोक्यावर सहा बल्ब लावले होते.
समोरचे प्रेक्षक एकांकिका पहायला अधीर झाले होते. आम्ही एकांकिका सादर करण्याचा निर्णय घेतला. एकांकिका सादर करताना एक वेगळाच आनंद आणि अद्वितीय अनुभव मिळत होता. कारण लोखंडी खाटांच्या रंगमंचावर एकांकिका सादर करणारे बहुदा आम्ही पहिले आणि शेवटचे रंगकर्मी होतो.
प्रदीप देवरुखकर
कला आणि रंगभूमीशी निगडित असंख्य उपक्रम राबवून गेली कित्येक वर्षे कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे प्रयोग मालाड संस्थेचे प्रमुख सदस्य, अभिनेता आणि हौशी लेखक
1 Comment
क्या बात है सर, वेगळा अनुभव सांगुन आमच्या आठवणी सुद्धा ताज्या केल्यात सर खुपच छान आणि सुंदर अनुभव…
धन्यवाद….