आमची ताई, म्हणजे माझी मोठी बहीण, वरळी येथे “जनता शिक्षण संस्था” या शाळेत शिक्षिका होती. या शाळेत व्यवस्थापक मंडळात माझे काकाही उच्चपदावर होते. शाळेच्या जीर्णोद्धारासाठी आणि काही मजले आणखी वाढवण्यासाठी काही प्रथितयश नाट्यसंस्थांचे व्यावसायिक नाट्यप्रयोग करून निधी जमा करावा यासाठी या शाळेने “धि गोवा हिंदू असो.” चे संगीत मत्स्यगंधा हे नाटक करावयाचे ठरवले.
मी त्यावेळी साधारण सहावी ते सातवीत असेन. नाटकं तर मी गणेशगल्लीच्या मैदानात, आमच्या मेघवाडीच्या मैदानात आणि गावी तर दशावतारी नाटकेही जत्रांमधून पाहिली होती. पण नाट्यगृहात आणि तेही रवींद्र नाट्य मंदिरात पाहण्याची ही माझी पहिलीच खेप होती. त्यावेळी रवींद्र नाट्य मंदिर छोटेसे व टूमदार पण वातानुकूलित व भव्यही होते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रथमतःच गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा पूर्णाकृती भव्य ध्यानमग्न अवस्थेत बसलेला धीरगंभीर पुतळा पाहताच नतमस्तक होऊन अपूर्व अशा भावविश्वात जाऊन पोहोचलो. हा अनुभव मला आजही येतो. तेव्हाही आसनव्यवस्था व एकंदरीत टापटिपपणाही ठीक होता. प्रा. वसंतराव कानेटकर लिखित हे नाटक सर्वप्रथम १९६४ रोजी रंगमंचावर आले. पं. जितेंद्र अभिषेकींचं संगीत लाभलेलं व बहुधा मा. दत्ताराम यांचं दिग्दर्शन असलेलं हे नाटक सर्वार्थानं गाजलं. महाभारतातील राजा शंतनू आणि गंगापुत्र देवव्रत अर्थात भीष्माचार्य यांच्या जीवनात घेऊन जाणारं हे कथानक आहे. पराशरमुनींवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठूर होते. त्याचे अत्यंत घातक परिणाम तिला स्वत:ला व देवव्रताबरोबरच अनेकांना भोगावे लागतात. अत्यंत गहन विषयावरचे, अभिषेकींच्या अप्रतिम संगीताने व वसंतरावांच्या पल्लेदार संवादांनी सजलेले हे नाटक त्यावेळी अतिशय गाजले होते. “गुंतता हृदय हे कमलदलांच्या पाशी”, “साद देती हिमशिखरे”, “नको विसरू संकेत मिलनाचा”, “देवाघरचे ज्ञात कुणाला” ही रामदास कामत यांनी गायलेली पदे अत्यंत गोड आहेत. तसेच आशालता वाबगावकर यांनी गायलेली “गर्द सभोती रान साजणी”, “तव भास अंतर झाला”, “मन रमता मोहना”, “अर्थशून्य भासे मज हा” ही पदेही उत्कृष्ट झाली आहेत. या दोघांनीही अभिषेकींनी संगीत दिलेल्या या गाण्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्याच ताकदीने मा. दत्ताराम यांनी देवव्रत अर्थात भीष्माचार्यही उत्तम साकारले होते. “मृगया! मृगया!” करीत शिकारीला बाहेर पडलेल्या देवव्रताची, सत्यवतीच्या अंगणातील एन्ट्री त्यांनी दमदारपणे साकारली होती. भीष्माचार्यांची मानसिक दोलायमानता व अगतिकता आपल्या संवादातून व देहबोलीतून उत्कटपणे साकारली होती. मी लग्नच करणार नाही ही प्रतिज्ञा करतानाचा सिन त्यांनी जबरदस्त ताकदीने वठवला होता. “भीष्म! भीष्म” असे पार्श्वभूमीवर उमटणारे प्रतिध्वनी आणि त्यामुळे त्यांना मिळालेलं भीष्म हे नाव वातावरणाला एक वेगळं परिमाण देऊन जातात. तर असं हे संगीत नाटक. मी बालवयात पाहिलेलं. यातील गाणी मी गावी गेल्यावर येताजाता घरात मोठ्याने गुणगुणत असे. माझा आवाज बरा असावा त्यावेळी. कारण कै. शालीमावशी माझे फारच कौतुक करत असे.
या नाटकातील गाणी, त्यातले माधुर्य, कलाकारांचा अभिनय यामुळे हे नाटकच कुठेतरी हृदयाच्या एका कोपऱ्यात गुंतून राहिलेलं आहे हे नक्की!
मोहन टंकसाळी
Commercial Artist, हौशी लेखक