शुद्धता गॅरंटेड… अर्थात पाणी — सुमारे दीड तास खिळवून ठेवणारा एकपात्री दीर्घांक
मराठी रंगभूमीवर नेहमीच निरनिराळे प्रयोग होत असतात. कलावंतांची सृजनशीलता त्यांच्याकरवी रंगभूमीची सेवा घडवत असते. मग त्यासाठी प्रत्येक वेळी भव्य नेपथ्य, अनेक व्यक्तीरेखा असणे गरजेचे असतेच असे नाही. कलाकाराची नाटकाबद्दलची समज, अभ्यास आणि उत्तम देहबोली ‘एकपात्री’ अभिनयातूनही दमदार प्रयोग रंगवू शकते. याचेच उदाहरण म्हणजे रंगकर्मी प्रमोद शेलार यांचा एकपात्री दिर्घांक ‘शुद्धता गॅरंटेड… अर्थात पाणी‘.
साधारण २०१७च्या सुमारास ‘कल्पना एक, आविष्कार अनेक’ ह्या एकांकिका स्पर्धेत जेष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी सुचवलेल्या ‘कृपा’ ह्या विषयाअंतर्गत एक एकांकिका सादर झालेली त्याच एकांकिकेचा हा दिर्घांक. विशेष म्हणजे प्रमोद शेलार यांनी एकांकिकेचा दिर्घांक करताना विषयाला पसरट न करता आशयाची खोली वाढवली आहे. महेश भोसले नामक अधिकारी नदी स्वच्छता अभियानामार्फत गंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात सुरू असलेल्या प्रोजेक्टवर नेमला जातो. गेली कित्येक वर्षे आपल्या आसपास पाण्याविषयी सुरू असलेल्या जनजागृतीचा त्याच्यावर खुप मोठा परिणाम झालेला असतो. गंगा, यमुना व तसेच इतर नद्यांच्या प्रवाहातील विविध शहरांत जाऊन सर्वेक्षण करण्याचा आणि पर्यायाने प्रदूषण पातळी कमी करण्याचा त्याचा मानस असतो. त्याप्रमाणे तो हरिद्वारपासून ते पुढे कानपूर, अलाहाबाद व अलीकडे यमुना नदीसाठी दिल्लीजवळच्या भागात सर्वेक्षण करतो. ह्या सगळ्या मानवनिर्मित गोष्टींमुळे निसर्गाची होत असलेली हानी आणि पर्यायाने होत असलेले नद्यांचे प्रदूषण त्याच्या निदर्शनास येते. ह्या सगळ्यात त्याच्यासोबत त्याचा सहकारी मि. शोधक असतो. २५ पेक्षा जास्त शहरांतून वाहणारी, शेवटी कोलकाता करुन बंगालच्या उपसागराला मिळणारी गंगा नदी हरिव्दार ते कोलकाता ह्या प्रवासात अत्यंत वाईट पद्धतीन प्रदूषित होत आहे, हे त्याच्या निदर्शनास येते. ह्या सगळ्याला सामाजिक, राजकीय घडामोडी, तसेच गावखेड्यातील व शहरातील लोकांच्या मानसिकतेची जोड असते. ह्या सगळ्यांत महेश भोसले पार गुंतत जातो. त्याने आखलेल्या प्रोजेक्टचे पुढे काय होते ? तो त्याचे आराखडे पूर्ण करू शकतो का? हे प्रत्यक्ष नाटकात बघणे फार वेगळा अनुभव आणि सोबत वास्तविकतेची जाणीव करून देते.
‘शुद्धता गॅरंटेड… अर्थात पाणी’ या दीर्घांकाचे पुढील प्रयोग
- दामोदर नाट्यगृह, परळ
२८ नोव्हेंबर, २०२१ रोजी रात्रौ ८:३० वाजता - प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
५ डिसेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता - तिकिटांसाठी संपर्क: प्रमोद शेलार – ९८६७५ २२८९४
प्रस्तुत दीर्घांकाबद्दल सविस्तर सांगताना नाटकाचे सर्वेसर्वा श्री. प्रमोद शेलार
ह्या दिर्घांकात आहेत सहा टेबल, दोन खुर्च्या, सात अब्ज माणसे, एक न सुटलेला प्रश्न आणि प्रमोद शेलार. लेखक आणि दिग्दर्शकाच्या चष्म्यातून हे नाटक साकारताना शेलार ह्यांनी टेबल खुर्च्या, तसेच वर लावलेला पंखा वापरून अनेक घटनांचा सुंदर FEEL नाटकात आणला आहे. जिथल्या तिथे काही सेकंदात मोजक्या गोष्टी वापरत त्यांनी बदललेल्या व्यक्तीरेखा त्यांच्यातील अभिनेत्याला सलाम करण्यास भाग पाडतात. एकीकडे मराठी भाषेत बोलत असणारा महेश भोसले अचानक लुंगी किंवा साडी नेसून उत्तर भारतीय बनतो आणि थेट त्या लहेजात बोलू लागतो, हे सादरीकरण नक्कीच प्रयोग रंगतदार करते. ह्या मनोरंजनापेक्षा वास्तविकता जास्त जाणवते. पाण्याविषयीच्या जनजागृतीचे महत्त्व कळते. साधारण १ तास २० मिनीटांच्या त्या दिर्घांकात अनेक शहरांतून प्रवास होतो, अनेक माणसांचे स्वभाव दिसतात, अनेक गोष्टी समोर येतात आणि जलप्रदूषणाचे भीषण वास्तव आ वासून समोर उभे राहते.
प्रमोद शेलार यांच्या ह्या कलाकृतीत नावीन्य आहे, उत्तम conception आहे, ज्वलंत प्रश्नाबद्दलची तार्कीक चर्चा आहे, तसेच त्यावर उपायही आहे. हा नक्कीच एक उत्तम दृकश्राव्य अनुभव आहे. आता किमान ह्या दिर्घांकांमार्फत तरी लोकांमधे जलप्रदूषणाबाबत जागृती निर्माण व्हावी. जलस्त्रोतांचे संवर्धन करण्याची तसेच नद्या व घाट स्वच्छतेची मोहिम अधिक जबाबदारीने हाताळली जावी, हीच अपेक्षा. ह्या नाट्यप्रयोगाला अनेक शुभेच्छा!
दिर्घांक: शुद्धता गॅरंटेड… अर्थात पाणी
लेखक/दिग्दर्शक/नेपथ्य: प्रमोद शेलार
निर्माते: शशीकांत सारंग
प्रकाश: श्याम चव्हाण
संगीत: महेंद्र मांजरेकर
रंगभूषा/निर्मितीप्रमुख: अनिल कासकर
कलाकार: सहा टेबल, दोन खुर्च्या, सात अब्ज माणसे, एक न सुटलेला प्रश्न आणि प्रमोद शेलार