प्रशांत दामले यांना ‘रंगमंचावरचा बादशाह’ का म्हणतात त्याचा पुन:प्रत्यय देणारी कलाकृती म्हणजे त्यांचं हे नवं नाटक ‘शिकायला गेलो एक’! प्रशांत दामले विनोद करतात तेव्हा अख्खं नाट्यगृह हास्यसागरात डुबून जातं… ते हळवे झाले की प्रेक्षकांच्या डोळ्यातही टचकन पाणी येतं… ते गातात तेव्हा त्यांचा मधुर आवाज प्रेक्षागृह मंत्रमुग्ध करून टाकतो. अरेच्चा! हे सगळं खरं तर तुम्हाला माहितीये ना! पण ‘दी’ प्रशांत दामले जेव्हा एखाद्या सुपरहीट हिंदी गाण्यावर ठेका धरतात तेव्हा तमाम रसिक प्रेक्षक भान हरपून टाळ्यांच्या जल्लोषात गुंग होऊन जातात, याची अनुभूती घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्हाला भेट द्यावी लागेल गौरी थिएटर्स निर्मित, प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाला!
ज्येष्ठ लेखक स्वर्गीय द. मा. मिरासदार यांच्या खुमासदार लेखणीतून एक निखळ विनोदी रसायन ‘कथेच्या’ स्वरूपात जन्माला आलं. ती कथा म्हणजे ‘व्यंकूची शिकवणी’ आणि या कथेचं नाट्यरुपांतर केलं आजच्या काळातला आघाडीचा लेखक-दिग्दर्शक अद्वैत दादरकर याने.

Shikayla Gelo Ek Natak Synopsis
एका आदर्श शिक्षकाच्या आयुष्यात प्रवेश होतो एका अत्यंत खोडकर, सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर अगदी वाया गेलेल्या मुलाचा. या मुलाला शिकवून इयत्ता दहावीत उत्तीर्ण करण्याची जबाबदारी येते या आदर्श शिक्षकावर. हा कुणी साधासुधा मुलगा नसतो बरं का!, हा असतो एका आमदाराचा मुलगा. आता या शिकवणीत नेमकं काय होतं? आमदाराचा मुलगा दहावी पास होतो का? की गुरुजींचीच वेगळी शाळा सुरू होते? हे असं सगळं गमतीशीर कोडं सोडवण्यासाठी या धमाल कॉमेडी नाटकाला अवश्य भेट द्या.
Shikayla Gelo Ek Natak Actors
‘शिकायला गेलो एक’ हे नाटक प्रशांत दामले सरांच्या आजवरच्या नाट्य कारकिर्दीतील अतिशय महत्वाच्या नाटकांपैकी एक ठरणार आहे. प्रेक्षक या नाटकाला येत्या काळात भरघोस प्रेम देतील यात मला काहीच शंका नाही. अशोक पत्कींचं संगीत आणि प्रशांत दामलेंचा मन मोहून टाकणारा आवाज… या जोडीने दिलेल्या मधुर सुस्वरांनी जो काही माहौल बनतो तो लाजवाब! रसिक प्रेक्षकांना दोन-अडीच तास मोबाईल विसरून नाटकात गुंग करण्याची क्षमता या नाटकात आहे.
हृषिकेश शेलार या हरहुन्नरी कलाकाराने प्रशांत दामलेंच्या तोडीस तोड अभिनय करत एक उत्तम ‘आगाऊ’ विद्यार्थी साकारला आहे. हृषिकेशशी बोलताना त्याचं नाटकांबद्दलचं प्रेम आणि रंगभूमीबद्दलची ओढ जाणवली. त्याला रंगभूमीवर मिळालेल्या या कमबैकचं त्याने सोनं केलंय. त्याची कोल्हापुरी भाषेवरील पकड, हालचालींमधील लवचिकता, चपळता नाटकाचा वेग कायम ठेवण्यास मदत करतात.
या गुरुचेल्याच्या तुफान केमिस्ट्रीला झणझणीत कोल्हापुरी आमदारी तडका दिलेला आहे सुशील इनामदार यांनी. त्यांचं पात्र नाटकातील सर्व पात्रांना जोडून ठेवतं आणि कथानक पुढे नेण्यास मदत करतं. आपल्या मुलावर नितांत प्रेम करणारा पण त्याच मुलाच्या टार्गट स्वभावापुढे हात ठेकेलेला लाचार आमदार त्यांनी अत्यंत सुरेख साकारला आहे. आपला मुलगा किमान दहावी पास व्हावा मग आपण हत्तीवरून पेढे वाटू, अशा मानसिकतेचा हा आमदार प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.
प्रशांत दामले यांच्या कन्येच्या भूमिकेत अनघा अतुल भगरे भाव खाऊन गेली आहे. दिसायला सुंदर, बाबांची लाडकी आणि बाबांना धाकात ठेवणारी विद्या तिने सुंदर वठवली आहे.
मुख्य कलाकारांच्या अभिनयाला उत्तम साथ दिली आहे चिन्मय माहूलकर आणि समृद्धी मोहरीर या तरुण कलाकारांनी. दोघांचीही रंगमंचावरील उपस्थिती सहज आणि नैसर्गिक वाटते. चिन्मय माहूलकरचं विशेष कौतुक आणि अभिनंदन! त्याने आपल्या भूमिकेत प्रामाणिकपणा, संयम आणि हास्याचं अचूक टायमिंग दाखवलं आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की चिन्मय हा प्रशांत दामलेंच्या T-School या अभिनय कार्यशाळेचा विद्यार्थी आहे, आणि त्याचं ट्रेनिंग त्याच्या परफॉर्मन्समध्ये स्पष्ट जाणवतं. रंगभूमीवर तो एक उमदा आणि आश्वासक चेहरा ठरत आहे. समृद्धी मोहरीर या अभिनेत्रीची भूमिका मला थोडी गुपित ठेवावीशी वाटतेय. या व्यक्तिरेखेने नाटकात धमाल आणली आहे एवढं मात्र नक्की!
रटाळ झालेलं धावपळीचं आयुष्य एकसुरी वाटू लागलं असेल तर या नाटकाला निव्वळ एक संधी द्या. तुमचा मूड नक्की रिफ्रेश होईल. सतत असं धीरगंभीर चेहरा करून आपण कसे समंजस आणि प्रगल्भ विचारांचे आहोत हे दाखवता दाखवता बरेचदा आयुष्य जगायचंच राहून जातं. त्यामुळेच आयुष्याकडे थोडं लाईट मूडने बघण्याचा दृष्टिकोन देणारं हे नाटक आजच्या काळाची गरज आहे.
