तरुण मुलगा आणि सूनेने मिळून म्हाताऱ्या सासू सासऱ्यांचा छळ केला आणि त्यांना घराबाहेर काढलं, नाही हो! असं या नाटकात काहीही नाही. नवरा बायकोच्या आयुष्यात भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे ते म्हातारपणी एकमेकांवर सूड उगवतात. छे! छे! असंही या नाटकात काहीही नाही. मुलाने बाहेरचा रस्ता दाखवल्यावर, एक वयस्कर जोडपं वृद्धाश्रमात आपला वृद्धापकाळ एकमेकांच्या सहवासात व्यतीत करतं… अजिबात नाही! या नाटकात तसंही काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोस्टर बघून हे नाटक ‘judge‘ करण्याची चूक तर मुळीच करू नका. सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखं हे नाटक वृध्द व्यक्तींना तरुणासारखं जगण्याचा मंत्र देणारं आहे आणि तरुण मंडळींसाठी येणारा काळासाठी ‘FD‘ म्हणजेच ‘Fixed Deposit‘ ठरणार आहे. प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया‘ या नाटकात ‘तसं काहीही नसलं‘ तरी रसिक प्रेक्षकांना भरभरून देण्यासारखं बरंच काही आहे.
या नाटकाच्या कथानकाबद्दल सांगायचंच झालं तर एवढंच सांगेन की मुंबईतील दादर येथे स्थायिक एक वयस्कर जोडपं, आपल्याला आयुष्य कसं जगावं हे अतिशय खेळकर आणि प्रात्यक्षिक स्वरूपात दाखवून जातं. याव्यतिरिक्त मला या नाटकाबद्दल एकही गुपित उघडावंसं खरंच वाटत नाहीये. बरीच ‘Surprises‘ आहेत या नाटकात… हे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी एक भावनिक प्रवास असणार आहे. हसवत हसवत मनात खोलवर कुठेतरी वादळ निर्माण करणारं आणि आपली एका नव्या विचार प्रवाहाशी भेट करून देणारं हे नाटक सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी आवर्जून बघण्यासारखं आहे.
Sanjyaa Chhaaya Writer — Prashant Dalvi
नाटकाच्या लेखनाबद्दल लिहिण्यासाठी कुठून सुरुवात करु कळत नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की… प्रशांत दळवी यांच्या लेखणीतून जन्माला आलेली एक दर्जेदार आणि परिपूर्ण कलाकृती म्हणजे ‘संज्या छाया‘! प्रेक्षक टाळ्या वाजवून थकतात. व्वाह! व्वा! असा कोरस सतत प्रेक्षागृहात घुमट राहतो. पण लेखक काही थांबत नाही. तो नाटकाच्या शेवटपर्यंत अधिकाधिक सुखद क्षणांनी आपल्याला घायाळ करतच राहतो. लेखकाने लिहिलेल्या शब्दांत, त्यांनी मांडलेल्या विचारांत क्षणोक्षणी प्रेक्षक न्हाऊन निघतात. मनाचा एक असा कोपरा जो आपण वर्षानुवर्षे बंद केलेला असतो, त्या कोपऱ्याला लेखकाने हळूवार साद घातली आहे. त्यामुळे या नाटकाने दिलखुलास आयुष्य जगण्याचा फक्त सल्लाच दिला नाहीये तर त्यासाठी काय काय उपाय करता येतील तेही सुचवलंय! आणि त्यासाठी डॉक्टर, वकील, पोलिस, न्यायाधीश अशा सगळ्यांनाच तुमच्या मदतीसाठीही आणलंय. विश्वास बसत नसेल तर ‘संज्या छाया‘ला नक्की भेट द्या!
Sanjyaa Chhaaya Director — Chandrakant Kulkarni
अप्रतिम लेखनासोबतच अप्रतिम दिग्दर्शन ही या नाटकाची अजून एक भक्कम बाजू आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्या कमाल दिग्दर्शकीय शैलीतून जन्माला आलेला अजून एक ‘मास्टरपीस‘! एखादा नवा विचारप्रवाह नाट्यरुपात समाजासमोर आणताना, त्याला ‘भाषणबाजी‘चं स्वरूप प्राप्त होण्याची तीव्र शक्यता असते. परंतु, दिग्दर्शकाने तसं न होण्याचं भान नाटकभर कटाक्षाने पाळलं आहे. त्यामुळे नाटकाची पकड कुठेच सैल होत नाही. नाटक एकाही क्षणी बोअरिंग वाटत नाही. सुख दुःखांचा अचूक मूड दिग्दर्शकाने नाटकात अखंड जपला आहे.
Sanjyaa Chhaaya Actors
संज्या छाया – सुनील अभ्यंकर, योगिनि चौक, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे, आणि वैभव मांगले, निर्मिती सावंत
सगळ्याच कलाकारांचा प्रामाणिक आणि चोख अभिनय लेखकाच्या शब्दांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवतो. वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांच्यामध्ये दिसून येणारी केमिस्ट्री, दोघांचं विनोदाचं टायमिंग इतकं गोड आहे की आपण बाकीचं जग नाटकाचे २ तास पूर्ण विसरून जातो. वैभव मांगले यांनी साकारलेला मिश्किल तरीही संवेदनशील ‘संज्या‘ मनाला भावून जातो. तर निर्मिती सावंत यांनी साकारलेली ‘छाया‘ आपल्याला आपली एखादी खंबीर, थोडीशी भावूक तरीही थोडीशी खट्याळ अशी मैत्रीणच वाटते.
वैभव मांगले आणि निर्मिती सावंत हे दोन मुख्य कलाकार असले तरी नाटकातील इतर कलाकारही तितकीच महत्वाची व्यक्तिरेखा नाटकात साकारत आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखा या नाटकात एक महत्वाची भूमिका बजावताना दिसते. सर्वच कलाकारांनी त्यांच्यासाठी लिहिलेल्या संवादांची खोली जाणून घेऊन तंतोतंत व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत.
Sanjyaa Chhaaya Technical Crew
नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी अतिशय हुशारीने केले आहे. पडदा उघडताच दादरमधील एका फ्लॅटचा हॉल आपल्याला दिसतो. संपूर्ण नाटक या हॉलमध्येच घडतं. पण त्यामध्येही एक छोटासा ट्विस्ट आहे. काही छोटेसे बदल आपल्याला अधूनमधून चकित करत राहतात. प्रकाशयोजनेच्या बाबतीतही नाटकाने बाजी मारली आहे. नेत्रदीपक प्रकाश नाटकाचा मूड घट्ट धरून ठेवण्यात मदत करतो.
पुरुषोत्तम बेर्डे यांचे संगीत, उलेश खंदेरे यांची रंगभूषा आणि प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांनी कलाकारांना दिलेली वेशभूषा नाटकाच्या सुंदरतेत भर पाडत राहतात.
Sanjyaa Chhaaya Producers
श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव यांचं मन:पूर्वक अभिनंदन! त्यांनी इतका सुंदर विचारप्रवाह प्रेक्षकांच्या भेटीस आणला. समाजात ताण तणावात जगणाऱ्या आणि मुळातच आयुष्य जगणं सोडून दिलेल्या लोकांना वाट दाखवणारं असं हे नाटक ‘संज्या छाया‘! संधी मिळताच हे नाटक आवर्जून बघा! कारण ‘खस्ता खाणाऱ्यांना पिस्ता खा‘ असा संदेश देणारं कूल नाटक फार क्वचित घडतं.
1 Comment
संज्या छाया चा एवढा सुंदर”रिव्ह्यू”वाचल्यावर ते पहाण्याची उत्सुकता आणखीच वाढली.