‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ अशा नावाचा एक कार्यक्रम मुक्ता बर्वे सादर करत आहेत असं काही दिवसांपूर्वी कानावर आलं. भाई म्हणजे पु.ल. देशपांडे. म्हणजे, पुलंशी संबंधित काहीतरी नाट्यवाचन असावं. पण मग ‘एक कविता हवी आहे’, असं का म्हटलंय? हां! त्यांच्या आवडीच्या कवितांचं वाचन असणार. पण मग मुक्ता बर्वे? नाटकाचे दौरे, सिनेमाचं शूट संभाळून ही ती हा कार्यक्रम पण करतेय? इतका महत्वाचा का बरं असावा हा कार्यक्रम? असे अनेक तर्क मनात सतत कुतूहल निर्माण करत होते. मग हळूहळू प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओज समोर येऊ लागले. प्रेक्षकांच्या भारावून गेलेल्या त्या प्रतिक्रिया ऐकून लक्षात आलं की ही काही साधीसुधी कलाकृती नोहे! हे काहीतरी अफाट आहे. कल्पनेपलीकडचं!
मग आम्ही पुढील प्रयोगाच्या तारखेची वाट पाहू लागलो. जाहिराती तपासू लागलो. पण प्रयोग काही लागेना. अचानक एके दिवशी छायाचित्रकार संजय पेठे यांनी फोन केला आणि तक्रारवजा शंका व्यक्त केली की रंगभूमी.com वर ‘प्रिय भाई… एक कविता आहे!’ या कार्यक्रमाबद्दल अद्याप काहीच का नाही? मग काय… त्यांना सगळी हकीगत सांगितली. त्यांनी लगेचच पुढील प्रयोगाची तारीख आणि कार्यक्रमाचे दिग्दर्शक अमित वझे यांचा संपर्क क्रमांक नोंद करुन घेण्यास सांगितलं. आम्ही अमित वझे यांना फोन करुन आमच्या येण्याबद्दल कळवलं आणि शीघ्र प्रतीक्षेनंतर तो दिवस आला…
आणि तो दिवस आला…
३१ मार्च, २०२४ रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे सकाळी ११ वाजताचा प्रयोग होता. आम्हीनाट्यगृहापाशी पोहोचलो. प्रथेनुसार कलाकारांच्या मुलाखती घेऊन प्रयोगासाठी नाट्यगृहात शिरलो. प्रयोग सुरू झाला. आम्हाला काय ठाऊक होतं की पुढचे दोन-अडीच तास आम्ही एका स्वररसभरीत अवकाशात सफर करणार होतो! एक काव्यमय अवकाश! तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. आजकालच्या अतिशय उथळ आणि प्रॅक्टिकल जगात तुमच्या अंतरंगात कुठेतरी एखादा, अगदी ७% ते ८% च का होईना, पण साहित्यप्रेमी दडला असेल तर हा कार्यक्रम चुकवू नका.
संकल्पना
डॉ. समीर कुलकर्णी यांनी ‘अनुभव’ मासिकात एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं नाव ‘तप:स्वाध्याय’! या लेखावर आधारित, ‘रूपक’ निर्मित आणि ‘जागर’ प्रस्तुत नाट्यानुभव म्हणजे ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’! १९९८ साली, डॉ. समीर एका हॉस्पिटलात काम करीत होते. त्याकाळी ते आपल्या सहकाऱ्यांसह एक भित्तीपत्रिका चालवीत असत. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन विषय घ्यायचा मानस असे. त्या वर्षी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेवर भित्तीपत्रिका बनवायचं ठरलं. ‘स्वातंत्र्य’ विषयाशी अनुरुप अशा कवितांचा शोध सुरू झाला. एकाने रवींद्रनाथ टागोरांची ‘व्हेअर द माइंड इज विदाऊट फीअर’ ही कविता त्यांना सुचवली. त्या कवितेची, प्रत्यक्ष रवींद्रनाथांच्याच हस्ताक्षरातील बंगाली प्रत मिळाली तर उत्तमच! आणि शोध सुरू झाला…
कविता मिळालीही… पण रवींद्रनाथ यांच्या हस्ताक्षरातीलच कविता हवी असा हट्ट होता. ती काही केल्या सापडेना. मित्रपरिवारातील बंगाली मंडळींनाही विचारून झालं. पण काही यश नाही. अचानक कुणीतरी म्हटलं, ‘पु. ल.’ त्यांच्या निवासस्थानी ‘शांतिनिकेतन’मध्ये त्यांना भेट द्यावी आणि कवितेबद्दल विचारावं. डॉ. समीर यांच्या सहकारी डॉ. धनश्री या नेमक्या पुलंच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या निघाल्या. त्यांच्याकडून पुलंना कवितेबद्दल विचारावं असं ठरलं. ठरल्याप्रमाणे, धनश्री सुनीता देशपांडे यांना भेटल्या. त्यांना कवितेबद्दल विचारलं. त्यावर लगेचच सुनिताबाई म्हणाल्या, “आहे. कुठल्यातरी पुस्तकात आहे. शोधते.” आणि इथून त्या कवितेच्या शोधाने एक नवं रूप घेतलं. एका सखोल शोधाचा, काव्यमय प्रवास पुलंच्या घरात सुरू झाला.
माळ्यावरून शेकडो पुस्तकांचे गठ्ठे खाली काढण्यात आले आणि वाचून… नव्हे वेचून त्यातील काव्यसुमनं पडताळली जाऊ लागली. या काव्यसुमनांच्या वेलींमध्ये पु.ल. आणि सुनिताबाई रममाण झाले. एक कविता शोधायची म्हणजे हाती लागलेल्या त्याव्यतिरिक्त कविता बाजूला ठेवून न देता त्या कविताही पुलं आणि सुनिताबाई वाचत होते. डॉ. धनश्रीही हे सगळं येत जाता न्याहाळत होत्या. डॉ. समीर आणि सगळ्याच सहकाऱ्यांना मात्र अगदी ओशाळल्यागत झालं होतं. आपण खूपच त्रास देतोय पुलं आणि सुनिताताईंना, अशी भावनाही मनात डोकावून गेली. पण ते दोघे ऐकतात थोडीच! ते काव्यपुष्पांच्या झुल्यावर हलके हलके हिंदोळे घेत जुन्या नव्या कवितांना बिलगून भेटण्यात कधीच मग्न झाले होते. आता त्या काव्यसफारीहून त्यांना परत आणणं सहज शक्य नव्हतं. आणि घडायचं तेच घडलं! ती कविता सापडली!!!
बघायला गेलं तर हा एक किस्सा किंवा आठवण किंवा अनुभव. पण, त्या गोड आठवणीसरशी वाहणारा सुमधुर काव्यरसाचा मखमली झरा आणि त्या काव्यरसाचं नाट्यमय सादरीकरण निव्वळ लाजवाब! हा एक असा अद्भुत काव्यप्रवास आहे जो आपल्याला कवितांच्या अधिकच जवळ घेऊन जातो. सद्याच्या प्रॅक्टिकल आणि संधीसाधू जगात त्या इवल्याशा कवितेचं महत्व सर्वार्थाने पटवून देतो. ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा कार्यक्रम कवितांच्या सोबतीने पुढे पुढे सरकत असला तरी त्याचं अतिशय निर्मळ आणि सतेज सादरीकरण बघता, त्याला ‘एक परिपूर्ण व अनमोल नाट्यानुभव’ अशा नावानेच संबोधित करावंसं वाटतं.
कलाकार
खरंतर या नाटकाला काव्यमय मैफलच म्हणावं लागेल. अशा धाटणीची कलाकृती मुख्य प्रवाहात आणून व्यावसायिक स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचे धाडस करणाऱ्या अमित वझे आणि मानसी वझे यांचं कौतुक, आभार आणि अभिनंदन!!! त्यांचं सादरीकरणही उत्तम!
एखाद्या काव्याला चाल लावली की त्या काव्याचं सौंदर्य अधिकच खुलतं. अगदी त्याचप्रमाणे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य आणि अंजली मराठे या तिघांनी या संपूर्ण कार्यक्रमाला एक सुरेख चाल लावली आहे, असं म्हणायला हरकत नाही. या गोड गळ्याच्या मंडळींनी कार्यक्रमाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय. निनाद सोलापूरकर या कलाकाराचं, कीबोर्डवरील उत्कृष्ट संगीत वादनाबद्दल विशेष कौतुक करावंच लागेल.
…आणि मुक्ता बर्वे
‘प्रिय भाई…एक कविता हवी आहे!’ हा कार्यक्रम बघून तुम्ही घरी जाल तेव्हा एक गोष्ट होणार… नक्की होणार! तुम्हाला रंगमंचावर ऐकलेल्या बाकीबाब यांच्या कविता मुक्ता बर्वे या अत्यंत गुणी अभिनेत्रीच्या आवाजात ऐकू येणार. फक्त त्याच दिवशी नाही तर आयुष्यभरासाठी ही सुरेल शिदोरी तुमच्यासोबत राहणार! डोळ्यासमोर पुल आणि सुनिताबाई दिसतील. पण, आवाज मुक्ताचाच असेल. चारचौघी नाटक, सिनेमांचं शूट, असं सगळं सुरू असतानाच ती त्याच ताकदीने ‘प्रिय भाई…एक कविता हवी आहे!’ हा कार्यक्रमही सादर करतेय, हे उल्लेखनीय आहे.
तांत्रिक बाजू
हे नाटक म्हणजे खरंतर नाट्यकाव्यअभिवाचन आहे. कलाकार एकाच जागी बसून सादरीकरण करतात. त्यामुळे, मोठमोठ्ठाले सेट ही या नाटकाची गरजच नाही. पडदा उघडताच कलाकार एका विशिष्ट रचनेत शेजारी बसलेले दिसतात. मुक्ता बर्वे, अमित वझे, मानसी वझे प्रेक्षकांसमोर आणि अंजली, निनाद व जयदीप ही गायक व वाद्यकलाकार मंडळी काहीशी काटकोनात… इतकं साधसुधं गणित! पण, तरीही रसिक प्रेक्षकांसमोर आठवणींचा एक रंगीत कॅनव्हास मांडावा त्याप्रमाणे, कलाकारांच्या मागील पडद्यावर, प्रोजेक्टरच्या सहाय्याने पुलं आणि सुनीता देशपांडे यांची रेखाटलेली काही चित्रं अप्रतिम माहौल तयार करतात. ते दोघे आपल्यासमोर हजर असल्याचा आभास आपल्या मनात निर्माण होतो. ही चित्रे रेखाटली आहेत मिलिंद मुळीक यांनी. मिलिंदजींचं या सगळ्या चित्रांसाठी खूप अभिनंदन!
तर मंडळी! तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात या नाटकाचे प्रयोग लागले असतील तर अजिबात चुकवू नका. हा नाट्यानुभव चुकवणं, तमाम साहित्यप्रेमी व नाट्यदर्दी रसिक प्रेक्षकांना परवडायचं नाही! पुढील प्रयोगांचं वेळापत्रक व नाटकांबद्दल इतर माहितीसाठी रंगभूमी.com या आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. तसंच, पुढील लिंकवर क्लिक करुन WhatsApp/Telegram द्वारेही आमच्याशी जोडले जाऊ शकता.
- रंगभूमी.com WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va6D2I5I1rcrzyu5BU1N
- रंगभूमी.com WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/GSkYUfG2Gd8LUR6jcnz1fz
- रंगभूमी.com Telegram: https://t.me/myrangabhoomi