मंडळी प्रेम म्हणजे काय आणि प्रेम कसं करायचं ह्याचं उत्तर काळानुसार आणि व्यक्तीनुसार बदलत गेलय. आजपर्यंत प्रेमाची कथा सांगणारी किंवा प्रेमावर भाष्य करणारी बरीच नाटकं येऊन गेली आहेत. पण प्रेमाकडे एका वेगळ्या नजरेने बघणारं आणि आजकालच्या जगातल्या प्रेमसंबंधांबद्दल आपले डोळे उघडणारं एक नवीन नाटक सध्या रंगभूमी वर आलंय. मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर प्रस्तुत ‘प्रेम करावं पण जपून‘ हे नव्यापिढीच्या प्रेमाबद्दलच्या विचारांवर आणि प्रेमाच्या विविध छटांवर हसत-खेळत रंग टाकणारं एक नवीन विनोदी नाटक. नाटकाची कथा आणि कलाकार हे अगदी नवोदित असूनही नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. नाटकात असलेल्या मालवणी ठसक्यामुळे प्रेक्षकांची भरभरून करमणूक होते हे अगदी निश्चित.
सध्याची पिढी अगदी मोकळेपणाने प्रेम करणारी आहे. जनाच्या नजरेपेक्षा स्वतःच्या मनाच्या कौलाला जास्त महत्वाकांक्षा देणारी आहे. आजचं आयुष्य आज उपभोगून उद्याची चिंता उद्या करणाऱ्या पिढीतली ही एक प्रेम कथा आहे. पण एका सरळसाध्या प्रेमकहाणीच्या पलीकडे जाऊन, प्रेक्षकांपर्यंत आणि मुख्यतः तरुण पिढीपर्यंत हे नाटक बरंच काही पोहचवण्याचा प्रयत्न करतं.
Prem Karava Pan Japoon Natak Synopsis
सुरेखा(भक्ती तारलेकर) ची मैत्रीण श्रावणी(मृदुला कुलकर्णी) तिच्या घरी राहायला येते. तिथेच श्रावणीची भेट होते सुरेखाच्या मित्राशी, म्हणजेच आकाश(संकेत शेटगे)शी. आकाश आणि त्याचा भाऊ संत्या(विशाल असगणकर) त्यांच्याच बिल्डिंगमध्ये वरच्या माळ्यावर राहत असतात. आकाश आणि श्रावणी लगेच एकमेकांकडे आकर्षित होतात आणि लवकरच त्यांचं प्रेम खुलू लागतं. पण परस्परविरोधी विचारांचे आकाश आणि श्रावणी भांडू लागतात. प्रेमाबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल दोघांचे वेगळे विचार असतात. श्रावणी, ही ज्याच्यावर प्रेम करेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारी मुलगी असते. पण आकाश तिच्या अगदी विरुद्ध, जपून, सावधपणे प्रेम करणारा मुलगा असतो. त्यामुळे श्रावणी जेव्हाही त्यांचं नातं पुढे न्यायचा प्रयत्न करते, आकाश आडकाठी घालतो. त्यांच्या या विरोधी स्वभावामुळे त्यांच्यात वाद व गैरसमज होतात. संत्या आणि सुरेखा त्यांची समजूत घालायचा बराच प्रयत्न करतात पण ते सगळे प्रयत्न निष्फळ होतात. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्याला अशी काही कलाटणी मिळेल, ह्याचा त्यांनी कधीच विचार केलेला नसतो. आता हा ट्विस्ट काय आहे, संत्या आणि सुरेखा काय युक्त्या लढवतात आणि आकाश आणि श्रावणी च्या नात्याचं पुढे काय होतं हे जाणून घ्यायला ‘प्रेम करावं पण जपून’ हे नाटक तुम्ही प्रेक्षागृहात जाऊनच पाहायला पाहिजे.
Prem Karava Pan Japoon Natak Review
आकाश हे अगदी जपून आणि समजून उमजून प्रेम करणारं पात्र आहे. प्रेमात वाहवत न जाता अगदी जपून पाऊल पुढे टाकणारा तो मुलगा आहे. आणि संकेत शेटगे ह्यांनी हे पात्र खूप छान निभावलं आहे. श्रावणीसाठीचं प्रेम, तिला सांगता न येण्याची तगमग आणि या मोकळ्या जगात मनमुराद वावरणाऱ्या लोकांच्या प्रवाहाच्या थोडासा उलट वाहणाऱ्या आकाशचे पात्र त्यांनी चांगले रंगवले आहे.
मृदुला कुलकर्णी श्रावणी हे पात्र साकारतेय. अतिशय बिंदास आणि मोकळेपणाने वागणारी मुलगी असते श्रावणी. कशाचीही चिंता नाही आणि उद्याचा विचारही नाही. या स्वतःच्या दुनियेत जगणाऱ्या, समुद्रावर प्रचंड प्रेम करणाऱ्या आणि प्रेमात स्वतःला अथांग भिजवून घेणाऱ्या श्रावणीचे पात्र मृदुला कुलकर्णी यांनी छान निभावले आहे.
संत्या हा आकाशचा कोकणातला भाऊ आणि ह्याचे पात्र दिग्दर्शक विशाल असगणकर यांनी साकारले आहे. मला सांगायला फार आवडेल की दिग्दर्शकांनी दिग्दर्शक म्हणूनच नाही तर अभिनेता म्हणूनदेखील आपली भूमिका अगदी चोख निभावलीये. संत्या जेव्हा जेव्हा मंचावर येतो तेव्हा तो भाव खाऊन जातो. त्याचा तो मालवणी ठसका, बिंदास वागणं, आकाशला वेड्यात काढणं आणि दुसऱ्या मुलींनी संत्याला वेड्यात काढणं हे अतिशय हास्यास्पद दृश्य आहे. अहो एवढंच काय, प्रेक्षकांनी तर किती वेळा शिट्या आणि टाळ्या देखील वाजवल्या संत्या साठी. अर्थातच, एखादं पात्र दिग्दर्शकापेक्षा चांगलं कोण समजणार?
अभिनेत्री भक्ती तारलेकर सुरेखा हे पात्र साकारतेय. सुरुवातीला अगदी निर्भीड, कोणाला ही न घाबरणारी सुरेखा, व नंतर आयुष्यात घडलेल्या प्रसंगांमुळे कोडमडलेली ती, हा भावनांचा आणि व्यक्तिमत्वाचा विरोधाभास भक्ती तारलेकर हिने फार चांगला साकारलाय.
Prem Karava Pan Japoon Natak Details
दीपेश सावंत आणि अभिनेते – दिग्दर्शक विशाल असगणकर या जोडीने प्रेम करावं पण जपून या नाटकाचा दिग्दर्शन केलं आहे. दोघंही या क्षेत्रात नवीन असूनही त्यांनी खूप सहज दिग्दर्शन केलं आहे. नाटक मनोरंजक आहे त्यामुळे नाटकात ठिकठिकाणी विनोद पेरला आहे आणि नाटक प्रेक्षकांना हसवण्यात अगदी यशस्वी होतंय. कधीकधी एखादा सीन थोडा ओढत नेलाय असा वाटताच एक मस्त पंचलाईन सगळा भाव खाऊन जाते.
नेपथ्य सुद्धा विशाल असगणकर यांचीच कारिगरी असून नेपथ्य अगदी सुटसुटीत मांडलं आहे. मंचाला दोन विभागात भागून दोन घरांचं स्वरूप दिलं आहे. कलाकारांचा रंगभूमीवर बराच वावर आहे पण नेपथ्य आणि दिग्दर्शन अचूक असल्यामुळे कुठेही गोंधळ वाटत नाही.
नाटकाचं लेखन संकेत शेटगे यांनी केले आहे व अभिनयाबरोबरच लेखनात ही त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. नाटकात बरीच सुंदर वाक्ये आहेत पण ती कधी कधी विनोदामुळे झाकली जातात. तरीही नाटकाचा ओघ खूप सुंदर आहे आणि घटना घडवून आणल्यासारख्या वाटत नाहीत. मुळात विषय जरा वेगळा आणि खरंतर गरजेचा असल्यामुळे प्रेक्षकांना नाटक मनापासून आवडतंय.
नाटकात संगीताचाही खूप मोठा भाग आहे आणि संगीतही संकेत शेटगे यांचेच आहे. अक्षय गायकवाड, मधश्री राऊत, विशाल असगणकर, चैताली कुडतरकर व मानसी सावंत यांनी या नाटकासाठी पार्श्वगायन केले आहे. नाटकातल्या भावनेनुसार आणि गरजेप्रमाणे अगदी बरोबर आणि साजेशी गाणी गायली ही आहेत व निवडली ही आहेत.
नाटकाची प्रकाशयोजना अतिशय उत्कृष्ट होती. शिवाजी शिंदे ह्यांनी अगदी चोख कामगिरी केली आहे. प्रेमाच्या भावना आल्या की गुलाबी वातावरण, थोडं वादग्रस्त वातावरण झालं की बदल्लेला प्रकाश आणि अगदी संगीताबरोबर होणाऱ्या भावनांतरासाठी सुद्धा फोकस केलेले लाईट्स. प्रकाशयोजनेमुळे नाटक प्रेक्षकांच्या आणखी जवळ आलं असा म्हणण्यास हरकत नाही.
हे नाटक अगदी नवख्या कलाकारांचं आहे व त्यांच्या पहिल्या प्रयासात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. कधीकधी काही सीन्स सतत खेचत असल्यासारखे वाटतात, पण संत्या येऊन सगळा माहोल सांभाळून नेतो.
प्रेम करणे आणि प्रेम करताना समोरच्यावर विश्वास ठेवण्यात काहीही गैर नसते. पण आपण कोणावर विश्वास ठेवतो हा निर्णय विचारपूर्वकपणे का घ्यायचा असतो हे या नाटकामुळे अगदी स्पष्ट होतं. या वाटणाऱ्या गंभीर विषयवार अगदी अलगद आणि खट्याळपणे भाष्य करणारं हे नाटक आहे. तुम्ही कुठल्याही टप्प्यावर कंटाळणार नाही आणि तुमचे हमखास मनोरंजन होईल. तर प्रेमाबद्दल खूप काही सांगणारं, मनापासून हसवणारं आणि थोडासा विचार करायला लावणारं ‘प्रेम करावं पण जपून’ या नाटकाला प्रेक्षागृहात आवर्जून भेट द्या आणि प्रेम जपून का करावं हे नक्की जाणून घ्या.