आपल्या वाचनात बऱ्याच कथा, एकांकिका येत असतात. कधी आपल्याला त्या आवडतात तर कधी नाही आवडत. वाचताना जेवढी मजा आली तेवढी त्या कथेचं सादरीकरण बघताना येईलच असं नाही. ‘नवरा आला वेशीपाशी’ दीर्घांकाचे यश नवले आणि राजरत्न भोजने यांनी केलेले लेखन लॉकडाउनच्या काळात माझ्या वाचनात आले होते. लेखन वाचून मला ते मनापासून आवडलेही होते आणि हल्लीच मला यश नवले आणि राजरत्न भोजने लिखित-दिग्दर्शित ‘नवरा आला वेशीपाशी’ हा दीर्घांक नाट्यगृहात पाहण्याची संधी मिळाली. मला सांगावयास अत्यंत आनंद होत आहे की दीर्घांकाचे लेखन जितके सुंदर आहे तितक्याच सुंदरपणे ते नाट्यरूपात सादरही करण्यात आले आहे. त्याबद्दल, या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक यश नवले आणि राजरत्न भोजने यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
पडदा उघडताच मुनमुन लॉजची एक रूम प्रेक्षकांना दिसते. संपूर्ण नाटक या खोलीतच घडते. हॉटेलचा मॅनेजर, गेस्टला रूममध्ये घेऊन येताना थोडा साशंक दिसत असतो. कारण, ती गेस्ट म्हणजे स्वतःची हळद अर्ध्यावर सोडून आलेली एक तरुणी असते. तिच्या हातात हिरवा चुडा असतो. तिने साडी परिधान केलेली असते आणि मुंडावळ्यादेखील बांधलेल्या तशाच असतात. इतक्यात अजून एक इसम हळद लागलेल्या कपड्यांमध्ये लपत छपत त्याच रूममध्ये प्रवेश करतो. हा इसम म्हणजे त्या तरुणीचा होणार नवरा असतो. त्याला अजिबात कल्पना नसते की हळदीच्या रात्री इतक्या उशीरा या अशा विचित्र हॉटेलमध्ये आपल्या होणाऱ्या बायकोने आपल्याला अचानक का बोलावलं आहे. तो तिला बोलतं करायचा खूप प्रयत्न करतो आणि मुनमुन लॉजमधून निघण्याचा हट्ट करतो. त्याला ती जागा फारशी चांगली वाटत नसते. थोडा वेळ घेऊन ती तरुणी स्वतःचं मन हळूहळू मोकळं करू लागते. ती त्याला काय सांगते? हळदीच्या रात्रीच ती गोष्ट सांगणे तिच्यासाठी का गरजेचे असते? ते ऐकल्यावर तो तिच्याशी लग्न करण्याचा विचार बदलतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही हा दीर्घांक नक्कीच बघा.
नाटकाचा विषय थोडा गंभीर आहे यात शंकाच नाही. पण, विषयाचे सादरीकरण अतिशय सुटसुटीत पद्धतीने करण्यात आले आहे. त्यांना योग्य वेळी खुमासदार विनोदांची फोडणी आहेच! नाटकातील दोन प्रमुख कलाकार आणि हॉटेलचा मॅनेजर अशी एकूण तीन पात्रं आहेत. तिघांचाही अभिनय वाखाणण्याजोगा आहे. मॅनेजरच्या छोट्याशा भूमिकेतील संदेश रणदिवेही भाव खाऊन गेला आहे. प्रमुख भूमिकेतील अभिजीत पवार आणि सिमरन सैद यांचं करावं तितकं कौतुक कमीच! त्यांनी आपल्या बोलक्या देहबोलीचा अचूक वापर करून प्रेक्षकांना दीड तास खिळवून ठेवलं आहे. अभिजीत पवार याची energy सुरुवातीपासून शेवटपर्यंत जराही कमी होत नाही. चेहऱ्यावरील भाव आणि भूमिकेचं बेअरिंग अप्रतिम! त्याचं विनोदाचं करेक्ट टाईमिंग नाटकाचा ग्राफ चढवत राहतं. सिमरननेही पूर्व आयुष्यात ठेच लागलेली आणि नव्या नात्याला स्वीकारण्यास मनाची तयारी नसलेली तरुणी चांगली वठवली आहे.
या नाटकाच्या लेखनामध्ये स्त्रियांशी संबंधित बऱ्याच विषयांवर वक्तव्य करण्यात आले आहे आणि हे लेखन दोन पुरुषांनी केले आहे हे विशेष! एका स्त्रीचे त्या परिस्थितीतील विचार या दोघांनी नाट्यरूपात तंतोतंत मांडले आहेत. कोणत्याही कठीण प्रसंगात पुरुष स्त्रीला झिडकारून न देता तिला आयुष्यभर कशी साथ देऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘नवरा आला वेशीपाशी’ हा दीर्घांक! स्त्री ही काही वस्तू नाही, की काही बिघाड झाला आणि तिला फेकून दिलं. ती देखील एक सामान्य जीव असते. भावना तिलाही असतात. या आणि अशा बऱ्याच गोष्टी कुठलीही भाषणबाजी न करता अतिशय सौम्य शब्दांत या नाटकात मांडल्या आहेत.
नाटकाचे लेखन, दिग्दर्शन याबद्दल अजून मी काय सांगू? सगळंच मस्त जुळून आलेलं आहे. विषयाचे गांभीर्य कमी होऊ न देता, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून या नाटकाला सुंदर वळण देण्यात त्यांना पूर्ण यश मिळाले आहे. नेपथ्याची बाजूही अमेय भालेराव यांनी चांगली सांभाळली आहे. एकच सुचवावंसं वाटतं की, नवऱ्या मुलाला नकोशी वाटणारी ‘मुनमुन लॉज’मधील ती रूम थोडी अधिक भडक दाखवावी असं मला वाटतं. त्यामध्ये, भिंतीवर थोड्या जास्त फोटोफ्रेम्स आणि भडक रंगाचे पडदे यांची नक्कीच मदत होईल. राजेश शिंदे यांनी केलेली प्रकाशयोजना नायक-नायिकेच्या भावनांना वेळोवेळी उजाळा देत राहते. त्यांच्या संभाषणातील मूड प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात या नाटकाच्या प्रकाशयोजनेचाही तितकाच वाटा आहे. या नाटकात संगीतकार ओमकार सोनावणे आणि निनाद म्हैसाळकर या जोडीने ‘नवरा आला वेशीपाशी’ या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या हळदीच्या गाण्याचा, त्याच्या म्युजिकचा नाटकात वेळोवेळी पूरक वापर केला आहे. खासकरून, जेव्हा एखाद्या संवेदनशील विषयावर बोललं जात असतं तेव्हा वापरलेला याच गाण्याचा स्लो ट्रॅक मनात घर करून जातो.
आपल्या सगळ्यांसाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की, आजच्या काळातला स्त्रियांच्या काही महत्वाच्या विषयांवर, अडचणींवर भाष्य करणारा हा दीर्घांक करनाटकू संस्थेने नाट्यगृहात प्रेक्षकांच्या भेटीसाठी उपलब्ध करून दिला आहे. लवकरात लवकर तुम्ही या दीर्घांकाचा आस्वाद घ्या आणि आम्हाला [email protected] या ई-मेल आयडीवर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आम्ही नाटकाच्या संपूर्ण टीमपर्यंत तुमची प्रतिक्रिया पोहोचविण्याचा पूर्ण प्रयत्न करू.