मंडळी! तुम्हाला तुमच्या गावच्या आठवणी कुणी विचारल्या की काय होतं? अर्थात खूप गप्पा रंगतात. गावच्या आठवणी ताज्या होतात आणि मग त्या गप्पांमधून आठवणीतील किस्से, ओळखीची ठिकाणं, गावची माणसं यांचा एक रंगीत असा कोलाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तो कोलाज रंगभूमीवर थेट आपल्यासमोर उतरविण्याच्या एक प्रयत्न म्हणजे अष्टविनायक प्रकाशित अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित स्नेहा प्रदीप प्रॉडक्शनचं नाटक ‘मुक्काम पोस्ट आडगाव’! जशा गावच्या गप्पा संपल्यावरही मनातला गावचा प्रवास सुरूच राहतो अगदी तसंच ‘मुक्काम पोस्ट आडगाव’ हे नाटक बघून प्रेक्षक नाट्यगृहाबाहेर पडतात ते अतिशय भावूक होऊन! गावची जत्रा, गावच्या घरातली माणसं, समुद्रावर जाण्याची धमाल, टमटममधील प्रवास असं सगळं झपझप डोळ्यासमोर तरळत असतं.
Mukkam Post Adgaon Video
Mukkam Post Adgaon Review
‘मुक्काम पोस्ट आडगाव’ हे नाटक प्रदीप आडगावकर यांच्या आत्म निवेदनावर आधारित आहे. हे नाटक म्हणजे मराठवाड्यातल्या एका खेडेगावातून मुंबई पुण्यात शिकून एका मोठ्या फार्मासिटिकल कंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचलेल्या अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा एका मूळच्या शेतकरीपुत्राची गोष्ट आहे, ज्याच्या नसानसात मराठवाड्याची भाषा, संस्कृती, लोककला, साहित्य, कविता, संतकाव्य आणि तिथल्या खेड्यापाड्यातल्या रूढी प्रथा ठासून भरलेल्या आहेत. असा हा शेतकरीपुत्र अनेक वर्षांनी मराठवाड्यातल्या आपल्या आडगाव या खेडयात जातो आणि तिथलं बदलत चाललेलं लोकजीवन आणि संस्कृती पाहून आपल्या गतकाळाच्या तुलनेने अस्वस्थ होतो.. आणि गतकाळातल्या समृद्धीचे मोठ्या रसिकतेने आणि रसभरीत भाषेने पुनःप्रत्ययाचा आनंद रसिकांनाही देतो आणि स्वत:ही अनुभवतो.
नाटकाचे सर्वेसर्वा — पुरुषोत्तम बेर्डे
नाटकाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम बेर्डे आहेत. ते या नाटकाचे निर्माता, दिग्दर्शक, नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा आणि संगीत संयोजक अशा सगळ्याच भूमिका बजावत आहेत. २५ कलाकारांचा ताफा त्यांनी असा काही गुंफला आहे की नाटक पहिल्या काही मिनिटांतच आपल्याला पूर्णपणे आडगावात ओढून घेतं.
नाटकाच्या नेपथ्यात तर पुरुषोत्तम सरांनी धम्माल उडवून टाकली आहे. बैलांच्या शर्यतीचा पट असो किंवा टुरिंग टॉकीज, गावचं संगीत नाटक असो किंवा ‘काळी पिवळी’मधील प्रवास, सगळंच त्या त्या प्रसंगाला डोळ्यासमोर हजर होतं. सगळ्यात महत्वाचा उल्लेख असा कारावासा वाटतो की वाद्यवृंदकांना स्वतःची अशी एक जागा रंगमंचावरच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे वाद्यवृंदक जी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवतात ते बघण्याची मजाही निराळीच आहे.
Mukkam Post Adgaon – Cast
कलाकारांची निवड करण्यात पुरुषोत्तम बेर्डे यांनी खूप मेहनत घेतली. गणेश चंदनशिवे यांच्याशी बोलून अकैडमी ऑफ फोक आर्ट्स – युनिव्हर्सिटी मधून काही कलाकार त्यांना मिळाले. तसंच, वामन केंद्रेच्या इंस्टिट्यूटमधून काही कलाकार मिळाले. काही कलाकार अकैडमी ऑफ थिएटर आर्ट्समधील आहेत. तर काही योगेश सोमण यांनी सुचविले आहेत.
रंगमंचावर अभिनयाची जुगलबंदीच सुरू असल्यासारखं वाटतं. एकाचा गोड गळा तर एखादीचं नृत्य सुंदर! एखाद्याचा अभिनय कमाल तर दुसरा या सगळ्याच कलांमध्ये पारंगत! प्रत्येक कलाकाराचं वर्णन करावं तितकं कमीच. या नाटकाचं वैशिष्ट्य असं की नाटकात २५ जणं असली तरी नाटक संपल्यावर प्रत्येकजण आपल्या लक्षात असतो.
Mukkam Post Adgaon Writer Pradeep Adgaonkar
हे नाटक एकदा बघून तुमचं पोट भरणार नाही. प्रदीप आडगावकर हे या नाटकाचा आत्मा आहेत. आपले काका मामा जसे आपल्याला गावचे किस्से सांगतात अगदी त्याचप्रमाणे प्रदीप सर नाटकात आडगावबद्दल सांगत राहतात. ते या नाटकाचे एकपात्री दीर्घांक करत होते. पुरुषोत्तम बेर्डेंना त्यांनी या आडगावच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा पुरुषोत्तम बेर्डेंनी कलाकारांना घेऊन आडगावचं नाटक बसवण्याची कल्पना सुचवली. म्हणूनच, आज हे नाटक आपल्या भेटीस आलं. ‘रिव्ह्यू’ या नाट्यप्रकारांत मोडणाऱ्या फॉर्ममध्ये संगीत, नाट्य, नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून हे नाटक पुढे सरकतं.
प्रत्येकाने आपापल्या गावाची महती जाणून गावाच्या विकासासाठी पावलं उचलली पाहिजेत, हा सामाजिक संदेश मला या नाटकाने दिला. पण भाषणातून नाही तर कृतीतून! प्रदीप आडगावकर खरंच त्यांच्या गावी म्हणजेच आडगाव येथे शेतीच्या विकासासाठी काही उपक्रम राबवित आहेत. गावकऱ्यांना मदतीचा हात देत आहेत. अशा मदतीच्या हाताची शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने गरज आहे हेही आपण जाणतो. त्यामुळे, उत्कृष्ट अभिनय, सुरेल गीतं, देखणी नृत्ये आणि बऱ्याच आडगावातील बऱ्याच गंमतीजमती अनुभवण्यासाठी लवकरात लवकर नजीकच्या नाट्यगृहाला भेट द्या.