एकीकडे ‘मानवता हाच खरा धर्म’ असे सुविचार गिरवणारा माणूस दुसरीकडे ‘तुझं आडनाव काय?‘ या प्रश्नात नेमकं कुठलं उत्तर शोधत असतो? धर्म मोठा की माणूस मोठा? मंदिरात जातो तो हिंदू, मशीदीत जातो तो मुस्लिम, गुरुद्वारेत जातो तो शीख मग या सगळ्यात माणूस कुठे राहिला? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवून देणारं आजच्या काळातलं सुज्ञ नाटक म्हणजे सुनील हरिश्चंद्र लिखित-दिग्दर्शित ‘मोस्ट वेलकम‘!
मोस्ट वेलकम हे फक्त एक नाटक नसून आजवर उगीचच गुंता होऊन बसलेल्या आणि क्लिष्ट भासू लागलेल्या ‘मानवते’च्या व्याख्येला नव्याने प्रकाशात आणणारं एक वादळ आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हे नाटक बघून त्यातून सुयोग्य बोध घेणं ही आजच्या काळाची गरज आहे.
Most Welcome Marathi Natak
सुनील हरिश्चंद्र (‘मोस्ट वेलकम’चे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते)
सर्वप्रथम, सुनील हरिश्चंद्र यांच्या धाडसी लेखनाला सलाम!!! त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने बघितल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार आणि या विषयाचा जो सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यासाठी त्यांचे मनापासून कौतुक! सुनील हरिश्चंद्र हे नाट्यसृष्टीतील एक उभरतं नाव आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. यंदाच्या अस्तित्व आयोजित ‘कल्पना एक अविष्कार अनेक’ या स्पर्धेत त्यांनी गाजवलेली प्रथम पारितोषिक विजेती ‘मानलेली गर्लफ्रेंड’ ही एकांकिका असो अथवा हे ‘मोस्ट वेलकम’ नाटक असो, या दोन्ही संहिता सुनील हरिश्चंद्र यांच्या लिखाणातील ताकद आणि वैविध्यता दर्शवितात. त्यासोबत दिग्दर्शन आणि अभिनयातही चोख कामगिरी बजावून हा अष्टपैलू कलाकार स्वत:ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवतो.
Most Welcome Marathi Natak Info
नाटक सुरू होताच एका नाटकाची रंगीत तालीम सुरू असलेली दिसते. नाटकाचं नाव असतं ‘मोस्ट वेलकम‘. गौरी लंकेश या भारतीय पत्रकार होत्या. २०१७ साली त्यांच्या घराच्या दारात गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्या करण्यापूर्वी तो मारेकरी आणि गौरी लंकेश यांच्यामध्ये झालेला काल्पनिक संवाद असा या नाटकाचा विषय असतो. नाटकाचा दिग्दर्शक अजात (सुनील हरिश्चंद्र) त्याच्या एका मित्राला या संकल्पनेबद्दल सांगतो आणि तो पत्रकार मित्र मागचा पुढचा विचार न करता नाटकाची बातमी वृत्तपत्रात छापून आणतो. इथून पुढे सुरू होतो धमक्या आणि हल्ल्यांचा खेळ! अजातला धमक्यांचे फोन येऊ लागतात. त्याच्यावर हल्ले होतात. आता या नाटकात असं काय असतं? ते नाटक यशस्वीरीत्या पडद्यावर सादर होईल का? नाटकासाठी अजात ‘गौरी लंकेश’ याच व्यक्तिमत्वाचा का विचार करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवायची असतील तर तुम्हाला मोस्ट वेलकम या नाटकाला भेट द्यावी लागेल.
Most Welcome Marathi Natak Details
नाटकाचा विषय गंभीर आहे. विषयाची हाताळणीही गंभीरपणेच करण्यात आलेली आहे. नाटकातील एकही वाक्य उगीचच लिहिलं गेलेलं नाही. नाटकात विनोदही आहेत. पण त्यात थिल्लरपणा कुठेही नाही. एका विषयातून इतर असंख्य विचारप्रवाहांना वाट करून देण्यात आली आहे. धर्म, जात, कुळ, वंश अशा समाजाने आखून ठेवलेल्या बंधनात्मक विळख्यात अडकून पडलेल्या माणसाला एक नवीन दिशा दाखवणारं हे नाटक पचायला हलकं नसलं तरी आजच्या काळाचं सत्य आहे आणि गरजही! तुम्हाला ते पटेल अथवा पटणार नाही पण बघणं मात्र अनिवार्य आहे.
Most Welcome Marathi Natak Actors
अभिनयाबद्दल मी बोलणारच आहे. पण, माझं असं प्रांजळ मत आहे की हे लेखकाचं नाटक आहे. त्याच्या लेखनात इतकं सामर्थ्य आहे की प्रेक्षक त्या शब्दांमध्ये हरवून जातात. अंतर्मुख होतात. सुनील हरिश्चंद्र यांनी त्यांच्या लेखनाला यथायोग्य न्याय देत अगदी सहजसोप्या अभिनयशैलीत, नैसर्गिक देहबोली व वक्तव्याचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांचे सडेतोड विचार अगदी समर्पकरीत्या प्रेक्षकांसमोर मांडले गेले आहेत. इतर सर्वच कलाकारांचा अभिनय सुंदर आहे. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे गौरी लंकेश यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या निहारिका स्मिताली राजदत्त हिचा! तिने अतिशय सुंदर पद्धतीने ही व्यक्तिरेखा सादर केली आहे. तसेच, अजातचा सेलिब्रिटी मित्र साकारलेल्या अमोल भारती अशोक या कलाकारानेही सुंदर अभिनय केला आहे. अजातचे विद्यार्थी दाखवलेले सगळेच कलाकार पूर्ण ताकदीने सादरीकरण करतात. ते या नाटकाचा एक महत्वाचा भाग आहेत. ते जणू काही प्रेक्षकांच्याच मनातील प्रश्न अजातसमोर वेळोवेळी मांडत राहतात. सिमरन संगीता श्रीकांत हिनेही अजातच्या प्रेयसीची भूमिका चांगली वठवली आहे. सिमरन संगीता श्रीकांतने सादर केलेले नृत्य आणि निहारिका स्मिताली राजदत्तने सादर केलेले गायन अप्रतिम!
हे नाटक तुम्ही का बघायला जावं याची भरपूर कारणे आहेत. पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या नाटकाच्या संपूर्ण टीमची मेहनत! संगीत आणि प्रकाशयोजनेची अचूक साथ मिळाल्यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या मनात भिनत जातं. ज्या पोट तिडकीने ही सर्वच मंडळी सुनील हरिश्चंद्र यांचं लेखन आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आसुसलेली आहेत त्याच जाणिवेने, प्रेक्षकांनी हे नाटक नाट्यगृहात जाऊन बघणं अत्यावश्यक आहे. मुद्दा पटणं, न पटणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हे नाटक प्रत्येक घरातील एकाने तरी बघणं आजच्या काळाची गरज आहे असं मला पुन्हा पुन्हा वाटतं.
‘मोस्ट वेलकम’ नाटकाचे पुढील प्रयोग
- १ मे २०२२, सायं. ६:३० वाजता → प्रबोधन प्रयोग घर, कूर्ला
- ३ मे २०२२, सायं. ६:३० वाजता → मैसूर अशोसिएशन बॉम्बे, माटुंगा
- ८ मे २०२२, रात्रौ १० वाजता → जनवादी साहित्य-संस्कृती संमेलन २०२२, सावंतवाडी
- ९ मे २०२२, रात्रौ ९ वाजता → मराठा मंदिर, कणकवली
- १० मे २०२२, रात्री ९ वाजता → मालवण
Most Welcome Marathi Natak Cast & Crew
नाटक: मोस्ट वेलकम
लेखक-दिग्दर्शक: सुनील तारामती हरिश्चंद्र
निर्माते: कलासाधना
प्रकाशयोजना: श्याम भारती गणेश
संगीत-ध्वनीसंयोजन: सुमेध सिद्धी सचिदान्नंद.
कलाकार: सिमरन संगीता श्रीकांत, निहारिका स्मिताली राजदत्त, भक्ती भारती रमेश, ऋतिका माया संजय, ऋतिका माधुरी संतोष, संकेत सुवर्णा श्रीधर, विकास मंदा विठ्ठल, प्रणय मयुरी महेंद्र, भावेश वैशाली विलास, अमोल भारती अशोक, आणि सुनील तारामती हरिश्चंद्र