‘Love’ In Relationship — मी, स्वरा आणि ते दोघं!
आपल्यावर मनापासून निस्वार्थी प्रेम करणारं माणूस सापडायला मोठं भाग्य लागतं. अशी व्यक्ती प्रत्येकाला भेटतेच असे नाही; आणि भेटलीच तरी वयाच्या कोणत्या टप्प्यात भेटेल ह्याचा नेम नाही. पण समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला, तर ते नातं अधिक बहरतं. तसेच नात्यात एकमेकांना समजून घेण्याची maturity असली की, ते तुटण्याचा प्रश्नच नसतो. ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नात्यांकडे आणि पर्यायाने आपल्या जोडीदाराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणारे नवेकोरे नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे.
Me Swara Aani Te Dogha Video
Me Swara Aani Te Dogha Natak Synopsis
स्वरा (रश्मी अनपट) ही शिकली सवरलेली, चांगल्या कुटुंबात मोठी झालेली, आणि स्वतःच्या पायांवर उभी असलेली मुलगी वडिल गेल्यावर आई मंजुषासोबत(निवेदिता सराफ) राहत असते. वैयक्तिक आयुष्यात स्वरा कोणाचेही प्रेम मिळण्याच्या बाबतीत कमनशीबीच असते. ह्याउलट, तिची आई स्वराचे वडिल मिस्टर रानडे गेल्यावर नव्याने आयुष्याकडे बघायला शिकतेय. कर्मधर्मसंयोगाने तिचा कॉलेजचा मित्र यशवंत पाटील (विजय पटवर्धन) तिला पुन्हा एकदा भेटतो. इथे प्रेमाच्या बाबतीत सतत अपयशी ठरलेल्या स्वराच्या आयुष्यात ऑफीसमधला मित्र कपिल(सुयश टिळक) नव्याने प्रेमाची आस घेऊन येतो. ह्या सगळ्यात मंजुषाला स्वरासोबत स्वत:च्या आयुष्याची घडीही नीट बसवायची असते. पुढे त्या चौघांच्या आयुष्यात काय घडते, हे कळण्यासाठी तुम्हाला ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक बघायला हवे.
Me Swara Aani Te Dogha Natak Actors
निवेदिता सराफ यांनी मंजुषाच्या स्वभावाचा पदर अगदी योग्यपणे धरला आहे. त्यांनी अनेक वर्षांच्या ‘तोचतोचपणा’ असलेल्या जगण्यातून बाहेर पडलेली, आयुष्याकडे नव्याने संधी म्हणून पाहणारी, आई-बाई-प्रेयसी अशा नानाविध छटा असलेली ही मंजुषा फार सुंदर उभी केलेली आहे. विजय पटवर्धन यांचा यशवंत पाटील तितकाच दमदार आणि मुख्य म्हणजे expressive आहे. प्रत्येक क्रियेला आलेली त्यांची प्रतिक्रिया, विविध प्रसंगातील त्यांचे timing कमाल जादू करते. रश्मीने साकारलेली matured पण आतून hurt झालेली स्वरा फार संयमाने उभारली आहे. तिच्या व्यक्तीरेखेत भावनांचा समतोल जाणवतो. सुयशने साकारलेला कपिल हा मुक्तपणे वावरणारा आणि खरंतर प्रत्येकालाचा हवाहवासा वाटेल असा मित्र आहे. पक्क्या पुणेरी कपिलचा अखंड नाटकातला वावर प्रेक्षकांचे मन प्रसन्न करतो.
“पहिल्याप्रथम कदाचित ‘कॉमन’ वाटणारा विषय त्याच्या निराळ्या आणि मनोरंजक मांडणीमुळे लक्षवेधक ठरतो. ह्यात कुठेही एखादा संदेश देण्यासाठीचा अट्टहास नाही किंवा मेलोड्रामाचा सूर नाही.”
Me Swara Aani Te Dogha Natak Review
पहिल्याप्रथम कदाचित ‘कॉमन’ वाटणारा विषय त्याच्या निराळ्या आणि मनोरंजक मांडणीमुळे लक्षवेधक ठरतो. ह्यात कुठेही एखादा संदेश देण्यासाठीचा अट्टहास नाही किंवा मेलोड्रामाचा सूर नाही. लेखक आदित्य मोडक यांनी चारही व्यक्तीरेखा त्यांच्या खास गुणविशेषांनी उभ्या केल्या आहेत. स्वभावातले ‘contrast‘ त्या व्यक्तीरेखांचे वेगळेपण अधोरेखित करते. त्यामुळेच कथानकात एक सहजता जाणवते. अनेक प्रसंग, खासकरून दुसरा अंक अतिशय सुंदर खुलवला आहे. ह्या सगळ्यात नितीश पाटणकर यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचाही तितकाच वाटा आहे. पात्रांच्या हालचाली, रंगमंचाचा सुयोग्य वापर, आणि त्यामुळे खुललेले प्रसंग. संदेश बेंद्रे यांच्या संकल्पनेतून उभारलेले नेपथ्य कथानकाला साजेसे आणि मुळात सर्वच पात्रांना एक मुक्त अवकाश प्राप्त करून देणारे आहे. दोन बेडरूमच्या फ्लॅटमधे हॉल आणि कोपऱ्याला असलेली बाल्कनी, सोफासेटला मॅचिंग उशा, जागोजागी असलेले आकर्षक लॅम्प इत्यादी अनेक गोष्टी नाटकाला visually अधिक सुंदर बनवतात. शीतल तळपदे यांची घटनांच्या ‘mood’ला पूरक अशी प्रकाशयोजना. स्पृहा जोशीचे सुरेख गीतलेखन, सारंग कुलकर्णीने दिलेले सुश्राव्य संगीत दोन तासांचा तो नाट्यप्रयोग अधिक मनोरंजक करतात.
अनेकदा आपण ‘लोक काय म्हणतील?’ ह्या विचाराने आपल्या आयुष्याचे निर्णय घेत असतो. पण कधीच आपल्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयानुसार लोकांना त्यांची मानसिकता बदलायला भाग पाडत नाही. हे नाटक तेच सांगू पाहतं. एकीकडे नव्याने आयुष्य घडवण्यासाठी उभी राहणारी मंजुषा आहे, तर दुसरीकडे आजही तिच्यावर निस्वार्थी प्रेम करणारा यश. ह्याचीच वेगळी बाजू म्हणजे तरूण वयात प्रेमात सतत अपयशी ठरलेली स्वरा आणि तिच्या आयुष्यात प्रेमाची नवी पालवी घेऊन आलेला कपिल. वयाच्या कोणत्याही टप्प्यात आल्यावर आपल्यात नव्या नात्यांना समजून घेण्याची, त्यांना सामावून घेण्याची maturity असायला हवी, हेच खरे. आज कोरोना आणि लॉकडाऊननंतर रंगभूमी पुन्हा नव्याने सिद्ध होत असताना अशा प्रकारचे एक उत्तम आणि फ्रेश नाटक तिच्यासाठी नवसंजीवनीच म्हणावे लागेल; ज्यायोगे नाट्यरसिक पुन्हा एकदा नाट्यगृहांकडे वळतील. तिकिटे काढतील आणि ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक त्यांचे दोन तास निखळ मनोरंजन करेल.
Me Swara Aani Te Dogha Natak Schedule
नाटक : मी, स्वरा आणि ते दोघं
लेखक : आदित्य मोडक
दिग्दर्शक : नितीश पाटणकर
नेपथ्य : संदेश बेंद्रे
प्रकाशयोजना : शीतल तळपदे
संगीत : सारंग कुलकर्णी
गीत : स्पृहा जोशी
वेशभूषा : शाल्मली टोळ्ये
रंगभूषा : शरद सावंत
निर्माते : चंद्रकांत लोकरे
सहनिर्माते : गौरव मार्जेकर
निर्मितीसंस्था : एकदंत क्रिएशन्स