कुर्रर्रर्रर्र — निखळ मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी!
लोकहो! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका नव्या कोऱ्या नाटकाने मुंबईमधील नाट्यगृहांमध्ये हाऊसफुल्ल धुमशान घातलं आहे. या तुफान नाटकाचं नाव आहे कुर्रर्रर्रर्र! व्ही. आर. प्रोडकशन आणि प्रग्यास क्रिएशन्स निर्मित ‘कुर्रर्रर्रर्र‘ हे नाटक म्हणजे प्रेक्षकांसाठी, सहकुटुंब आनंद घ्यावा, अशी मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी आहे. आपल्या सर्वांचेच लाडके कलाकार विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे या धुरंधर विनोदवीरांनी नाटकाच्या विषयाचे गांभीर्य राखत प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे. या नाटकात प्रेक्षकांसाठी बरीच ‘surprises’ आहेत. ती मी इथे न उलगडलेलीच बरी! नाटक बघताना या मध्ये मध्ये येणाऱ्या ‘twist’ ची बातच काही और आहे.
Kurrrr Marathi Natak Synopsis
अक्षर (प्रसाद खांडेकर) हा एक लेखक असतो आणि त्याची बायको असते पूजा (नम्रता संभेराव). अक्षर आणि पूजा यांच्या लग्नाला पाच वर्षे झालेली असतात. पण त्यांना अजून बाळ होत नसतं. त्यांच्यासोबत पूजाची आई वंदना (विशाखा सुभेदार) ही राहत असते. वंदनाचा नवरा तिला २५ वर्षांपूर्वीच सोडून गेलेला असतो. वंदनाने काळजीपोटी पूजाच्या पाठी बाळासाठी सतत तगादा लावलेला असते. पूजा आईला वरवर समजावत असते की, “होईल गं आई बाळ!” पण तीही मनातून आई होण्यासाठी तरसलेली असते. अक्षर आणि पूजाचे बाळासाठी प्रयत्न सुरूच असतात. अशातच घरात एका माणसाची म्हणजेच पॅडीची एन्ट्री होते. आता पॅडी कोणत्या वेशात येतो? त्याची व्यक्तिरेखा काय? तो घरात आल्यावर त्या तिघांच्या आयुष्यात कोणता मोठ्ठा ट्विस्ट येतो? हे सगळं मी तुम्हाला संगण्यापेक्षा तुम्ही हे नाटक नक्कीच नाट्यगृहात जाऊन बघा.
Kurrrr Marathi Natak Video Review
Kurrrr Marathi Natak Direction
कथा वाचून नाटकाचा विषय तसा गंभीर वाटतो, पण हाच गंभीर विषय लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना यामध्ये यशदेखील मिळाले आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! या नाटकात पोट धरून हसायला लावणारे विनोदही आहेत आणि क्षणार्धात प्रेक्षकांना हळवे करतील अशी दृश्येही आहेत. दर्जेदार विनोद आणि विषयाची खोली यांचं एक सुंदर गणित या नाटकात जुळून आलेलं दिसतं. पण त्या विनोदांना पाणचटपणा आणि वाह्यातपणाचा मुलामा कुठेही नाही. म्हणूनच, हे नाटक सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी समर्पक ठरतं.
Kurrrr Marathi Natak Production
पूनम जाधव आणि विशाखा सुभेदार या नाटकाच्या निर्मात्या आहेत. निर्मातीच्या भूमिकेत विशाखा सुभेदार यांनी चोख कामगिरी बजावली आहे. तिने निर्माती म्हणून नाटकाच्या बाबतीत कुठल्याच प्रकारची तडजोड केलेली नाही. पडदा उघडताच प्रेक्षकांना या गोष्टीची प्रचिती येते. प्रकाशयोजना, नेपथ्य, गाणी, नृत्य असं सगळंच अगदी परफेक्ट जुळन आलेलं आहे. नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत यांची नाट्य निर्मितीचे धडे गिरवण्यात मदत झाल्याचे विशाखा सुभेदार यांनी म्हटले आहे.
Kurrrr Marathi Natak Actors
अभिनेत्री म्हणून पूजाच्या आईच्या भूमिकेतील विशाखा प्रत्येक मुलीला तिच्या आईची आठवण करून देते. माय-लेक नेहमीच एकमेकींच्या ‘best friends’ असतात. हे ‘best friends’ चं नातं खऱ्या अर्थाने या नाटकात दाखवलं आहे. मुलीला बाळ होत नसताना तिच्या मनाची होणारी तगमग, तिला बाळ व्हावं यासाठी तिचं साधू बाबांकडे जाऊन उपाय विचारणं हे सगळंच खूप गोड आणि स्वाभाविक वाटतं. उगीच वाढवलेला मेलोड्रामा तिच्या वावरण्यात कुठेही दिसत नाही.
या नाटकासाठी प्रसाद खांडेकर यांनी लेखक-दिग्दर्शक-अभिनेता अशा तीनही आघाडींवर कामगिरी केली आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की तिन्ही विभागांमध्ये त्यांचे काम अव्वल दर्जाचे आहे. कलाकारांच्या सहज वावरातून, नेपथ्याच्या कल्पकतेतून आणि दर्जेदार लेखनातून त्यांचे कौशल्य व त्यांची मेहनत नाटकाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रेक्षकांना दिसत राहते. अक्षरच्या भूमिकेलाही त्याने चोख न्याय दिलेला आहे. बायकोला बाळ होत नसताना खंबीरपणे तिला मानसिक आधार देणारा, तिच्या आईचाही तितक्याच प्रेमाने सांभाळ करणारा, बायकोच्या सुखात स्वत:चं सुख शोधणारा नवरा प्रसादने अचूक वठवला आहे.
लग्नानंतर बरीच वर्षे बाळ न होणाऱ्या विवाहित स्त्रीची आई होण्यासाठीची तळमळ नम्रताने तिच्या अभिनयातून तंतोतंत मांडली आहे. तिचं आईसोबतचं संभाषण वेळोवेळी आपल्याला नाटकात खेचून घेतं. आपण त्या घरातलेच एक सदस्य आहोत असं आपल्याला सतत वाटत राहतं. ती या भूमिकेशी सहजरीत्या समरस झालेली दिसते. उत्तरार्धात नम्रताने गायलेली ओवी म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्का ठरणार आहे.
आता या नाटकामधील सगळ्यात महत्वाचे पात्र म्हणजे पॅडी! पॅडी कांबळे रंगमंचावर येतो आणि सगळ्यांच्या नकळत नाटकाची सगळी सूत्रं तो आपल्या हातात घेतो. ही व्यक्तिरेखा काय आहे याचा प्रेक्षकांना उलगडा होतो न होतो तोच काही वेळात एक दुसरा बॉम्ब पडतो. खूप कमी कलाकार असे असतात ज्यांच्यासाठी ठराविक अशी भूमिका लेखकाकडून लिहिली जाते. ही तीच भूमिका आहे. पॅडीला डोक्यात ठेवूनच प्रसादने ही व्यक्तिरेखा शब्दातून रेखाटली आहे की काय असं आपल्याला सतत वाटत राहतं. तो या नाटकाची जान आहे. त्याचा रंगमंचावरील सहज वावर, भूमिकेवरील पकड हे सगळंच आपल्या मनाला भावतं. पॅडीने एका दृष्यात पेटीसोबत एक सुंदर गाणे गायले आहे. हे गाणं सर्व प्रेक्षकांसाठी एक सुखद पर्वणी ठरणार आहे.
Kurrrr Marathi Natak Review
संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य आणि अमोघ फडके यांच्या प्रकाशयोजनेबद्दल लिहावं तितकं कमीच! नेपथ्य आणि प्रकाशयोजनेचं गणित इतकं सुंदर जुळून आलं आहे की त्यामुळे क्षणाक्षणाला नाटकाचं सौन्दर्य अधिकाधिक वाढतच राहतं. घराच्या दारावर सजवलेली वेळ, ओपन किचन, भिंतीवर लावलेल्या फ्रेम्स हे सगळंच खूप सुंदर दिसतं. पडदा उघडताच प्रेक्षक नेपथ्य आणि लाईट्सच्या प्रेमात पडतात. बहुतांशी संयुक्त कुटुंबांमध्ये सर्व कुटुंबीय आपल्याला हॉलमध्ये एकत्र वावरताना दिसतात. याच संकल्पनेचा वापर करत हे नाटकही घराच्या हॉलमध्येच घडताना दाखवलं आहे. दिग्दर्शकाने कल्पकतेने ओपन किचनची संकल्पना वापरून हॉल आणि किचन असा विस्तृत परिसर कलाकारांना वावरण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. नाटकातील बदलते मूड प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय कलाकारांसोबतच प्रकाशकारालाही जाते. खास उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे घरातील भिंतींवर दाखवलेल्या पिवळ्या दिव्यांचा. हे दिवे क्षणोक्षणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहतात.
या नाटकात विषयाला पूरक अशी गाणी आहेत आणि त्या गाण्यांवर कलाकारांनी तितकेच सुंदर नृत्यही केले आहे. त्याचे सर्व श्रेय संगीतकार अमीर हडकर, गीतकार तेजस रानडे आणि नृत्य दिग्दर्शक संतोष भांगरे यांना जाते. रंगभूषाकार उल्हेश खंदारे आणि वेशभूषाकार अर्चना ठावरे शहा यांनी सर्व कलाकारांना कथेनुरूप अचूक पद्धतीने सजवले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे नाटक अधिकच देखणे वाटते.
या नाटकात सर्वकाही आहे. चारही कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, दर्जेदार लेखन, सुंदर नृत्य आणि गाणी, रंगीबेरंगी सेट, उत्कृष्ट लाईट्स आणि बरंच काही! सचिन पिळगांवकर यांनी गायलेले गाणंदेखील सुंदर आहे. हे नाटक प्रेक्षकांना विनोदाच्या अंगाने एक खूप छान बोध देऊन जातं. पण वायफळ भाषणबाजी मात्र कुठेही नाही.
लक्षात ठेवा, मी तुम्हाला बरंच काही सांगितलंय पण काहीच सांगितलेलं नाहीये! मी न सांगितलेलं प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर लवकरात लवकर सहकुटुंब या नाटकाला जा आणि कुर्रर्रर्रर्रच्या डिलीव्हरीला तुमचे शुभाशिर्वाद लाभू द्या.
Kurrrr Natak Schedule — Tickets Available Here
- 12-Dec — Adya Krantiveer Vasudev Balwant Phadke, Panvel @ 4:30PM
- 13-Dec — Prabodhankar Thackeray Natyagruha, Borivali @ 4:30PM
- 19-Dec — Bal Gandharva Rang Mandir, Pune @ 12:30PM
- 19-Dec — Lokshahir Annabhau Sathe Natyagruha, Pune @ 5:00PM
- 19-Dec — Yashwantrao Chavan Natyagruha, Pune @ 9:30PM
नाटक: कुर्रर्रर्रर्र
लेखक/दिग्दर्शक: प्रसाद खांडेकर
निर्माते: पूनम जाधव, विशाखा सुभेदार
नेपथ्य: संदेश बेंद्रे
प्रकाश: अमोघ फडके
संगीत: अमीर हडकर
गीतकार: तेजस रानडे
रंगभूषा: उल्हेश खंदारे
वेशभूषा: अर्चना ठावरे शहा
नृत्य दिग्दर्शक: संतोष भांगरे
सूत्रधार: गोट्या सावंत
कलाकार: विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे