“नवा गडी नवं राज्य” च्या अभूतपूर्व यशानंतर जवळजवळ दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत या लोकप्रिय जोडीचे “जर तरची गोष्ट” हे नाटक रंगमंचावर सध्या धुमाकूळ घालत आहे. लेखिका इरावती कर्णिक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेल्या आणि आजच्या काळातल्या नातेसंबंधाची गोष्ट सांगणार्या ह्या नाटकाने नाट्यरसिकांच्या मनावर गारुढ केले आहे. वर्तमान पिढीला साजेसे आणि त्यांना स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्त करायला भाग पडणारे हे नाटक जुन्या व नवीन पिढींच्या पसंतीस उतरणारे आहे. आपल्या आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या गोष्टीं आणि त्या अनुषंगाने जीवनात होणारे बदल, यांचा नातेसंबंधावर होणारा परिणाम यावर गोष्ट आधारित असल्याने, ती प्रेक्षकांच्या मनाला भावते. आपल्या मागच्या पिढीला उमजलेल्या जगाबरोबर आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन जीवनाची मार्गक्रमणा करावी की भविष्यातील पुढील बदल शोधत जीवनातील अंतरंग अलगद उलगडत जावे, या संभ्रमात पडलेल्या नवीन तरुण पिढीला स्वतःचा निर्णय घेण्यासाठी हे नाटक निश्चितच मार्गदर्शक ठरेल. यामधून आजच्या पिढीची जर तर च्या प्रश्नातून सोडवणूक झाली, तर ते नाटकाचे यश म्हणावे लागेल. नाती जमणे, जुळून येणे, नाते टिकणे, नाते तुटणे यामधील सर्व समज आणि गैरसमज या सगळ्याचाच उहापोह करणारी ही गोष्ट आहे.
प्रिया बापट (राधा) आणि उमेश कामत (समर) ही जोडी एक जोडपं म्हणून अनेक जोडप्यांची गमतीशीर गोष्ट तर सांगतातच, शिवाय आपल्या सहज अभिनयातून प्रेमळ नात्याकडून असलेल्या अपेक्षा देखील समर्थपणे मांडतात. स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी आणि रिलेशनशीप सांभाळून करिअरवर फोकस करणाऱ्या सतीच्या भूमिकेत पल्लवी अजय विशेष लक्ष वेधून घेते. आशुतोष गोखले यांचा इनोसंट अबिर बाजी मारून जातो. नाटकातील गंमतीची गोष्ट प्रेक्षकांपुढे सहजपणे मांडण्यात लेखिका इरावती कर्णिक प्रचंड यशस्वी झाल्या आहेत. नाटकातील जर तर ची हीच गोष्ट अधिक खुलवण्यासाठी अद्वैत दादरकर / रणजीत पाटील या दिग्दर्शकद्वयींनी आपले दिग्दर्शन कौशल्य पणाला लावत ही कलाकृती प्रभावी केली आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि अमोघ फडके यांची प्रकाशयोजना नाटकाच्या गोष्टीला साजेशी आहेत. श्रीनाथ म्हात्रे यांच्या संगीताने गोष्टीत गहेरे रंग भरले आहेत. जर तर च्या या नात्याला वन्स मोअर देण्यात हे नाटकं यशस्वी झालं आहे.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल अथवा कलाकराबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.