हौस माझी पुरवा — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस
लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांना ज्या ‘booster dose’ ची गरज होती तो बूस्टर डोस म्हणजे ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक! तुम्ही जर लॉकडाऊनला वैतागलाय आणि आता संपूर्ण कुटुंबासोबत तुम्हाला काहीतरी ‘refreshing’ बघावंसं वाटतंय तर तुमच्यासाठी संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या राजकीय व सामाजिक ज्वलंत विषयांवर विनोदाच्या अंगाने पण, सडेतोड भाष्य करणारं हे नाटक प्रेक्षकांना ३ तास खिळवून ठेवतं. लोकशाहीचं आजच्या काळात काय महत्व आहे हे हास्याच्या कोषातून लोकांना समजावयाचा संतोष पवार यांचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.
Haus Mazi Purva Marathi Natak Review
नाटकाची कथा आटपाट नगरात सुरू होते. या नगरामध्ये संत्या (संतोष पवार) आणि अंशू (अंशुमन विचारे) हे दोन अवली मित्र राहत असतात. संत्या आणि अंशूची जोडी म्हणजे राहू-केतूची जोडीचं जणू! आटपाट नगराची संपूर्ण सत्ता आपल्या हातात यावी यासाठी संत्या व अंशू एक प्लॅन बनवतात. नगराच्या राजाला (अमोल सुर्यवंशी) सत्तेच्या खुर्चीवरून पाडण्यासाठी ते त्याच्याशी जवळीक साधून राजा व राणीला (प्राप्ती बने) चुकीचे सल्ले द्यायचा कट रचतात. जेणेकरून, सामान्य प्रजा त्याच्यावर चिडेल व त्याला सत्तेवरून हाकलून लावेल. एकदा प्रजेने राजाला हाकललं की आपल्यासाठी सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा होईल असा काहीसा संत्या आणि अंशूचा विचार असतो. हे करण्यामध्ये त्यांची मैत्रीण सोनूही (हर्षदा बामणे) त्यांना मदत करते. पण संत्या, अंशू आणि सोनू त्यांच्या या प्लॅनमध्ये यशस्वी होतात का? ते खरंच राजा-राणीची दिशाभूल करतात का? ते करताना त्यांना कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला ‘हौस माझी पुरवा’ हे नाटक बघावंच लागेल.
Haus Mazi Purva Marathi Natak Direction
कथा कितीही गंभीर वाटत असली तरी नाटक अतिशय विनोदी अंगाने पुढे पुढे सरकत जाते. खूप साऱ्या गंभीर विषयांवर बोललं गेलं असूनही ते तितक्याच सहजतेने आणि विनोदी स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडले गेलं आहे. प्रेक्षकांच्या मनावर कुठेही प्रवचन किंवा उपदेशाचा भडीमार केला जात नाही. याचं संपूर्ण श्रेय अर्थातच नाटकांचे लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांना जातं. तसेच, प्रसंगानुरूप कथेला पूरक ठरणारी गाणी या नाटकात आहेत. त्यामुळे गाण्यांचा अतिरेक झाल्यासारखा वाटत नाही. याउलट गाणी कथेच्या प्रवाहासोबतच प्रेक्षकांचे मनोरंजन करीत राहतात.
Haus Mazi Purva Marathi Natak Script
नाटकाची मूळ कथा अजय राजाराम विचारे यांनी लिहिली आहे. या नाटकाचे निर्मातेही तेच आहेत. सद्य परिस्थितीला साजेशी कथा लिहिल्याबद्दल व त्या कथेवर आधारित नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल अजय राजाराम विचारे यांचे खूप अभिनंदन!
Haus Mazi Purva Marathi Natak Actors
संतोष पवार यांनी या नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार व अभिनेता अशा चारही भूमिकेत उत्तम कामगिरी बजावली आहे. सोप्या पद्धतीचे पण अचूक नेपथ्य आणि तितकंच सडेतोड लिखाण करत त्यांनी क्षणोक्षणी प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. नाटकाचा उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा थोडासा उजवा ठरला आहे. शेवटापर्यंत नाटकाचा आलेख कमालीच्या उंचावर जाऊन पोहोचतो. राजकीय, शासकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करणारं हे नाटक प्रेक्षकांना कधी स्वत:कडे खेचून घेतं हे प्रेक्षकांना कळतदेखील नाही.
सादरीकरण्यामध्ये अंशुमन विचारे यांनी त्यांना कमालीची साथ दिली आहे. या दोन मातब्बर अभिनेत्यांसोबतच या नाटकात प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी, हर्षदा बामणे हे नवोदित कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत. या एकूण पाचही पात्रांचा रंगमंचावरील वावर अतिशय सुंदर आहे. तसेच, त्यांचं विनोदाचं टाईमिंगही अचूक जुळून आलेलं आहे. एका गोष्टीची विशेष नोंद करावीशी वाटते. नाटकात फार क्वचित वेळा संतोष पवार आणि अंशुमन विचारे मंचावर नसतात. तरीही नाटकाच्या शेवटापर्यँत दोघेही त्याच क्षमतेने सादरीकरण करताना दिसतात.
Haus Mazi Purva Marathi Natak Details
नाटकाची वेशभूषा करणाऱ्या मंगल केंकरे यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. नाटकातील प्रत्येक दृश्याचा व्यवस्थित विचार करून कलाकारांना त्यानुसार वेशभूषा देण्यात आली आहे. वेशभूषा हा या नाटकाचा खूप महत्वाचा भाग आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर लक्षात येईलच. शितल तळपदे यांनी सेटला पूरक अशी प्रकाश योजना केलेली आहे. प्रसंगानुरूप दृश्यांचा भाव रंगीबेरंगी प्रकाशांसोबत वेळोवेळी बदलत राहतो.
नाटकाची संपूर्ण टीम एक सुंदर कलाकृती बघण्याची तुमची हौस पूरी करण्यात नक्कीच यशस्वी ठरली आहे. हे नाटक बघितलंत तर तुम्ही एक सुंदर अनुभव घेऊन समाधानाने नाट्यगृहातून बाहेर पडाल. या धाटणीच्या लिखाणाची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षक या नाटकाला हजेरी लावतील याबद्दल काही शंकाच नाही.
Haus Maajhi Purva – Upcoming Shows
नाटक: हौस माझी पुरवा
लेखक/दिग्दर्शक/नेपथ्य: संतोष पवार
निर्माते: अजय विचारे
प्रकाश: शितल तळपदे
संगीत: रुपेश-नितीन
वेशभूषा: मंगल केंकरे
कलाकार: प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी, हर्षदा बामणे, अंशुमन विचारे आणि संतोष पवार
1 Comment
Pingback: संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हौस माझी पुरवा’ या धमाल कॉमेडी नाटकाचा मी लिहिलेला रीव्ह्यू –