कोविड-१९ मुळे आलेल्या अकस्मात लाटेमुळे संपूर्ण जग बंद पडलं. आणि त्याच बरोबर आपल्या नाट्यगृहांना सुद्धा कुलुपं लागली. त्याच दरम्यान ‘घरो-घरी नाटक’ या संकल्पनेचा जन्म झाला आणि ‘अमूर्त प्रोडक्शन्स’, ‘गुंता’ ही एकांकिका घेऊन आले. कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता प्रायोगिक तत्वांवर ‘गुंता’ हे नाटक प्रेक्षकांच्या घरी सादर केलं जातं. ह्या एकांकिकेचे प्रयोग घराच्या अंगणात, बाल्कनी, टेरेस, रंगमंच या ठिकाणांवर सादर केले जातात. कोविड-१९ अंतर्गत असलेल्या सगळ्या नियमांचे पालन या प्रयोगात केले जाते व अगदी मर्यादित प्रेक्षक सामिल होतात. त्यामुळे शांततेत, फक्त तुमच्यासाठी, या नाटकाचा प्रयोग तुमच्या घराच्या परिसरात घडवण्यात येतो.
लॉकडाऊनमध्ये घरोघरी नाटक घेऊन जाणारी अमूर्त प्रोडक्शन्सची टीम आता नाट्यगृहात भेट देण्यास सज्ज!
आजकाल डिवोर्स हा शब्द फार चर्चेत आहे. लग्न झालेली जोडपी जर एकमेकांबरोबर खुश नसतील तर ते वेगळे होण्याचा निर्णय घेतात. त्याची कारणं अनेक असू शकतात, पण त्यानंतर होणारा त्रास हा सगळ्यांसाठी साधारणतः सारखाच असतो. अश्याच दोन वेगळ्या झालेल्या व्यक्ती, डिवोर्सनंतर जर पाहिल्यांदा भेटल्या, तर त्यांचा काय संवाद होईल? ही भेट वेगळंच वळण घेऊन त्यांच्यामध्ये पुन्हा वाद होतील? की प्रश्नांनी भांडावून गेलेले ते दोघं एकमेकांना प्रश्न विचारून त्यांची उत्तरं जाणून घेतील? ह्या प्रश्नांची उत्तरं देणारं आणि डिवोर्सनंतरची कहाणी सांगणारी एकांकिका म्हणजेच ‘अमूर्त प्रोडक्शन्स’ निर्मित ‘गुंता’.
Gunta Natak Concept
राधा देसाई (मन्विता जोशी) आणि विनायक देसाई (अमेय कुलकर्णी) हे डिवोर्स नंतर पहिल्यांदा एकमेकांना भेटतात. त्यांच्या संवादातून आपल्याला समजतं की ते दोघं पहिल्यांदा एकमेकांना कॉलेजमध्ये भेटले आणि तेव्हापासून त्यांची मैत्री वाढत गेली. एकमेकांकडे आकर्षित करणारा त्यांचा एक समान दुआ होता, तो म्हणजे नाटक. नाटकावर असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि मग पुढे जाऊन लग्न सुद्धा करतात.
डिवोर्स झाल्यानंतर भेटण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असते. कुठलाही राग व द्वेष न बाळगता, अगदी निःसंकोचपणे दोघं गप्पा मारत असतात. त्यांच्या संभाषणातून व त्यांच्या वागण्यातून हे प्रत्येकवेळी स्पष्ट होत असतं की ते किती चांगले मित्र आहेत. एकत्र बसून ते दोघं आपल्या प्रेमाची सुरुवात कशी झाली ह्यावर चर्चा करतात, काही किस्से आठवून हसतात. व बोलता-बोलता त्यांना हाच प्रश्न पडतो की गणित नक्की चुकलं तरी कुठे? एवढी भक्कम मैत्री असून सुद्धा, एकमेकांचा इतक्या वर्षांचा सहवास असून सुद्धा, लग्नाच्या ५ वर्षांनी त्यांना डिवोर्स का घ्यावा लागला? प्रेम संपलं होतं की ते एकमेकांना कंटाळले होते? चूक नक्की कोणाकडून घडली होती? आणि डिवोर्स घ्यायची खरंच गरज होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी एकांकिका म्हणजे ‘गुंता’.
Gunta Natak Actors
विनायक देसाई हा एक अव्यवस्थित पण शांत स्वभावाचा लेखक आहे. लेखनावर त्याचं अफाट प्रेम असतं आणि त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासून हातात घेतलेली लेखणी त्यांनी आजवर सोडली नाहीये. हे पात्र साकारणारा अमेय कुलकर्णी, ‘विनायक देसाई’ हे पात्र जगतोय असं म्हणायला हरकत नाही. त्याची भूमिका त्याला चांगलीच उमजून ती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याच्या कसबीत तो अतिशय कुशल आहे. प्रेम खूप प्रॅक्टिकली करावं असं विनायकचं प्रेमाबद्दल मत असतं. डिवोर्सनंतर तो एकटा पडलाय, पण ते लपवण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत असतो. त्याला बरेच प्रश्न पडलेले असतात, पण स्वभावाने मितभाषी असलेला विनायक सगळं स्वतःच्या मनात ठेवतो. त्याची ती होणारी ओढाताण, राधाबद्दल त्याला काय वाटतं हे तिला सांगण्याची त्याची तगमग आणि ‘मी मजेत आहे’ असा चेहऱ्यावर ओढलेला मुखवटा घेऊन वावरणारा विनायक देसाई, अमेय कुलकर्णीने अगदी चोख निभावला आहे.
राधा देसाई ही मराठीची शिक्षिका आहे पण त्याचबरोबर ती नाटकांमध्ये देखील काम करत असते. व्यवस्थितपणा व नीटनेटकेपणा आवडणारी आणि प्रेम म्हणजे कुठलाही कागदी करार नसून एक भावनिक संबंध आहे हे मानणारी राधा, विनायकाच्या थोडी विरुद्ध आहे. राधा देसाईचे पात्र अभिनेत्री मन्विता जोशीने अगदी चोख साकारले आहे. राधा कशी आहे, तिचे व्यक्तिमत्व काय आहे, व तिचे विचार काय आहेत हे मन्विता जोशीला अगदी अचूक समजले आहे. त्यामुळे राधा देसाईने वक्तवलेला प्रत्येक शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. प्रेमाबद्दल राहिलेली राधाची अर्धवट स्वप्नं मागे टाकून पुढे जाण्याचा तिचा प्रयत्न, विनायकबद्दलची तिच्या डोळ्यातली आणि वागणुकीतली काळजी आणि ओढ, त्याच्या प्रेमात पडताना तिने केलेला अल्लडपणा आठवताना दाटून येणाऱ्या भावनांना दाबून टाकणं आणि शेवटी सगळं असह्य होऊन झालेली तिची घुसमट मन्विता जोशीने अगदी सहज व खूप उत्कृष्टपणे प्रेक्षकांसमोर मांडली आहे.
Gunta Natak Details
‘गुंता’चे लेखन व दिग्दर्शन अमित जाधव यांनी केले आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की दोन्ही विभागातल्या भूमिका अमित जाधव यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडल्या आहेत. प्रेक्षकांपर्यंत जे आणि जेवढं त्यांना पोहोचवायचं होतं ते अगदी सहजतेने त्यांनी मांडले आहे व ते हमखास प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. बऱ्याच ठिकाणी नाटक वाहवत जाण्याची संधी असून सुद्धा, आपल्या लेखणीने त्यांनी प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे. शब्दांची निवड, अगदी मोजून मापून आणि अचूकपणे केली आहे. त्याचबरोबर त्यांचे दिग्दर्शनही अगदी वाखाणण्याजोगे आहे. कलाकारांच्या पात्रांच्या भावनेनुसार हालचाली, त्यांचा वावर व त्यांच्या भावना प्रेक्षकांसमोर आणण्यात त्यांनी अगदी चोख कामगिरी बजावली आहे. नाटकात काही ठिकाणी गाण्यांचाही वापर केला आहे व परिस्थितीनुसार त्या गाण्यांची निवड सुद्धा अगदी योग्य आहे.
परंतु, या संपूर्ण एकांकिकेचे भार मन्विता जोशी आणि अमेय कुलकर्णी या दोन कलाकारांनी उचलून धरला आहे. लेखन व दिग्दर्शन कितीही दर्जेदार असलं तरी सुद्धा ते प्रेक्षकांपर्यंत तेवढ्याच तीव्रतेने पोहचवण्याचे काम कलाकारांचे असते. या एकांकिकेतल्या कलाकारांना त्यांच्या भूमिका अगदी चोख समजल्या आहेत. एकांकिकेमधून जे मांडायचे आहे ते प्रेक्षकांच्या हृदयात पोहचवण्याचे काम हे दोन कलाकार अगदी सुंदररित्या पार पाडतात.
‘घरो-घरी नाटक’ या उपक्रमातून ही एकांकिका अमूर्त प्रोडक्शन्स तुमच्या घरात घेऊन येतात. तुमच्या घरात किंवा तुमच्या घराच्या परिसरात ४५ मिनिटांची ही एकांकिका ते सादर करतात. त्यामुळे तुमच्या घरातच एखादा प्रसंग चालू आहे असा तुम्हाला भास होतो. मुळात विषय असा आहे ज्यामध्ये सगळ्यांना बरच कुतूहल असतं. आजकाल वेगळे झाल्यानंतरसुद्धा बरीच जोडपी आपल्याला परस्पर चांगले संबंध ठेऊन जगताना आढळतात. त्याचा अर्थ असा नसतो की त्या नात्यात कधीच प्रेम नव्हतं. एक नातं तुटायला बरीच कारणं असतात आणि ही कारणं अगदी सरळ, स्पष्टपणे, कुठेही त्याला मीठ-मसाला न चोळता थेट प्रेक्षकांसमोर मांडली आहेत.
‘गुंता’ ही प्रेमाच्या आणि नातेसंबंधांमधल्या गुंत्याचं एक वेगळं, कधीही न पाहिलेलं रूप आहे. त्याचबरोबर ही एकांकिका तुमच्याच घरी पाहण्याचा एक वेगळा अनुभव तुम्हाला घेता येईल. त्यामुळे राधा आणि विनायक देसाईंच्या कहाणीत पुढे काय घडेल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही ‘गुंता’ च्या प्रयोगासाठी ‘अमूर्त प्रोडक्शन्स’ आणि टीम ला आवर्जून घरी बोलवा आणि मी खात्रीने सांगू शकते- तुमची संध्याकाळ अगदी सार्थकी लागेल.