तिसरी घंटा वाजते. सचिन खेडेकरजींच्या खणखणीत आवाजात नाटकाची announcement होते… पडदा उघडतो. पुण्यातील एक वाडा आपल्याला दिसतो. त्या वाड्याच्या मधोमध एक कारंजं आणि कारंजाच्या पायथ्याशी बसलेली ईला… ईला कोण? ज्येष्ठ साहित्यकार मानव किर्लोस्करांची धाकली लेक! एवढ्या मोठ्या वाड्यात कुणाची जाग दिसत नाही. ती एकटीच बसलेली असते मान खाली घालून. पुढे काय होतं? तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ‘ग़ालिब‘ नाटकाला भेट द्या. कारण असं नाटक वारंवार घडत नाही. मंडळी, एक अख्खा काळ लोटावा लागतो असं नाटक रंगभूमीवर जन्माला येण्यासाठी. आणि आज ते रंगभूमीवर अवतरलंय. अष्टविनायक प्रकाशित आणि मल्हार व वज्रेश्वरी निर्मित मराठी नाटक ‘ग़ालिब’ च्या स्वरूपात! गालिब — एक अशी शब्दसहल जिथून परतावासं वाटत नाही! चिन्मय मांडलेकर या गुणवंत कलाकाराने पुन्हा एकदा त्याच्या लेखणीला धार देत एक धारदार कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. खरं सांगायचं तर ‘ग़ालिब’ नावाचं एक सुंदर चित्रच त्याने आपल्यासमोर रेखाटलंय.
चिन्मय मांडलेकर यांनी अतिशय फुरसतमध्ये ही नाट्यकृती जन्माला घातली आहे, हे पहिल्या पंधरा मिनिटांत प्रेक्षकांच्या लक्षात येतं. म्हणूनच आज थोडी भीतीदेखील वाटतेय. माझ्याकडून एखाद्या गोष्टीची तारीफ करायची राहून तर जाणार नाही ना? याची भीती! नाही म्हणजे असं कसं सगळंच ‘परफेक्ट’ असू शकतं? खरं तर ‘परफेक्ट’ शब्दाच्याही पलीकडचं काहीतरी आहे हे. अद्वितीय, अद्भुत, अलौकिक! लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना… अगदी सगळंच!
Contents
- Ghalib Marathi Natak Preview Video
- Ghalib Marathi Synopsis
- Ghalib Marathi Natak Review
- Pradeep Mulye’s Beautiful Set Design & Lights
- Virajas Kulkarni as Angad Dehlawi
- Ashwini Joshi as Reva Kirloskar
- Gautami Deshpande as Ila Kirloskar
- Chinmay Mandlekar’s Direction
- Upcoming Shows of Ghalib Natak
Ghalib Marathi Natak Video Preview
Ghalib Marathi Natak Synopsis
ज्येष्ठ साहित्यकार मानव किर्लोस्कर आणि त्यांच्या दोन मुली ईला आणि रेवा. यांच्या भोवताली गुंफलेली ही कथा. मानव कुर्लोस्कर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्टडी रुममध्ये एक कादंबरी मिळते. मृत्यूपूर्वी काही वर्षे मानव किर्लोस्कर यांची मानसिक स्थिती बऱ्याच अंशी खराब झालेली असते. अशा वेळी, त्यांच्या मृत्यूपश्चात मिळालेली ती कादंबरी कोणी लिहिली असा प्रश्न उपस्थित होतो.
Gaalib Marathi Natak Review
या नाटकाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाची भाषा. इतकी सुंदर मराठी भाषा आणि अर्थात, अधूनमधून गालिबचे शेर, आपल्या मनाचा ठाव घेत राहतात. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याप्रमाणे भासणारी या नाटकातील भाषा… माझ्यासोबत असं पहिल्यांदाच झालंय की सुंदर शब्दांमुळे मला अश्रू अनावर झाले. मला गहिवरून आलं. म्हणूनच, व्हिडीओच्या सुरुवातीला मी असं म्हटलं की ही एक अशी शब्दसहल आहे ज्या सहलीवरून परतावसांचं वाटत नाही. आपण हरवून जातो. बाहेरचं जग विसरून जातो. अजून एक नमूद करावंसं वाटतंय. सुंदर भाषा वापरली आहे याचा अर्थ असा नाही की नाटकाची भाषा जड आहे. तुम्हाआम्हाला माहीत असलेलेच शब्द आहेत. पण ‘आपून को तपूनको’च्या काळात आपण विसरून गेलेले काही शब्द बऱ्याच काळानंतर कानावर पडतात आणि एक आपसूक समाधान देऊन जातात.
आणि हो! नाटकाची कथा ऐकताना तुम्हाला साधीसोपी वाटली असेल. पण हे नाटक शब्दात कुणीच बांधू शकत नाही. हे नाटक अथांग आहे. या नाटकाचा जिवंत अनुभव घेण्यावाचून तुमच्याजवळ पर्याय नाही.
गौतमी आणि विराजस या आपल्या लाडक्या जोडीचं एकत्र हे पहिलवाहिलं नाटक. या दोघांनी राग, प्रेम, दुःख, द्वेष अशा विविध भावनांचं असं काही भन्नाट रसायन घडवलं आहे की ते अतिशय नैसर्गिक आणि वास्तवदर्शी वाटतं.
या नाटकात जितकी ईलाची व्यक्तिरेखा महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची आहे तिच्या मोठ्या बहिणीची, अर्थात रेवाची भूमिका… जी अत्यंत चोख साकारलीय अश्विनी जोशी या अभिनेत्रीने.
आता सगळ्यात महत्त्वाची आणि या नाटकातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा. नाटकातील सगळी पात्रं या एका व्यक्तिरेखेच्या अस्तित्वाभोवती फिरतात. ज्येष्ठ साहित्यकार मानव किर्लोस्कर आपल्यासमोर साक्षात उभे केले आहेत ज्येष्ठ अभिनेते गुरुराज अवधानी यांनी. त्यांनी दाखवलेल्या अभिनयाच्या छटा, संवादांमधील ठेहराव आकर्षक वाटतात.
Ghalib’s Beautiful Set Design & Lights by Pradeep Mulye
हे नाटक सगळ्याच भागात उजवं ठरतं. विशेष उल्लेख कारावासा वाटतो ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांचा. त्यांनी उभारलेला पुणेरी वाडा आणि वाड्यामध्ये उभारलेलं कारंजं निव्वळ अप्रतिम! हे कारंजही या नाटकात साइलेंट भूमिका बजावतं. जितकं नेपथ्य सुंदर आहे तितकीच या नाटकाची प्रकाशयोजनाही सर्रस आहे आणि ती सुद्धा प्रदीप मूल्ये यानीच केली आहे. कधी romantic गुलाबी रंग, तर कधी गालिबचं अस्तित्व भासवणारा शायराना हिरवा रंग, मधूनच गतकाळाची आठवण करुन देणारा निळा रंग आणि अधूनमधून वास्तवाची जाणीव करुन देणारा पिवळा रंग, सगळेच रंग मन मोहून टाकतात. पुन्हा एकदा हॅट्स ऑफ टू यू प्रदीप सर!
Virajas Kulkarni as Angad Dehlawi
विराजस कुलकर्णी अंगद देहलवी नावाच्या लेखकाच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. अंगद देहलवी हा मानव किर्लोस्कर यांचा विद्यार्थी दाखवण्यात आलेला आहे. एक मित्र, विद्यार्थी, हितचिंतक आणि हलकीशी ग्रे शेड असलेलं हे करैक्टर मन जिंकून टाकतं.
Ashwini Joshi as Reva Kirloskar
कठीण काळात खंबीरपणे अख्ख्या घराची जबाबदारी उचलणारी रेवा अश्विनी जोशी या गुणी अभिनेत्रीने सुंदर रेखाटली आहे. ती स्वतंत्र आहे. प्रॅक्टिकल विचारांची आहे. पण धाकट्या बहिणीसाठी ती तितकीच संवेदनशील आणि हळवी आहे.
Gautami Deshpande as Ila Kirloskar
आणि आता गौतमी देशपांडे! मी एवढंच म्हणेन की गौतमी तू तर छुपी रुस्तम निघालीस! कमाल केलीस. खूप नशीब लागतं अशी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आणि गौतमीने मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे. तिची व्यक्तिरेखा शब्दात मांडणं कठीण. पण तिने इतकी गुंतागुंतीची भूमिका ज्या शिताफीनं साकारलीय त्यासाठी तिचं खूप खूप अभिनंदन! गौतमीचा गोड गळा हा या नाटकाला लाभलेला अजून एक प्लस पॉइंट! मी बैकस्टेज भेटून गौतमीला सांगितलंय पण आज पुन्हा सांगते, तू जिंकलयंस!
Chinmay Mandlekar’s Direction
या नाटकाचं दिग्दर्शन चिन्मय दादांनी सहज आणि नीटनेटकं केलं आहे. कलाकारांचा वावर आणि दोन संवादामधील ठेहरावावर सुंदर काम करण्यात आलेलं आहे. वाड्याचा प्रशस्तपणा नाटकभर जाणवत राहतो. वरची स्टडी रूम न दिसत असतानाही नकळत आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. सगळं श्रेय लेखक दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांना. चिन्मय दादा प्लीज पुन्हा लवकरात लवकर लिहिता हो. आजच्या काळात अशा लेखनाची खूप गरज आहे. भाषा लोप पावत चालली आहे. तू लिही. तोपर्यंत मी हे नाटक पोटभर बघणार आहेच. आणि मंडळी तुम्हीही नक्की बघा.
नाटकातील काही क्लिप्स, प्रेक्षक प्रतिक्रिया आणि कलाकारांच्या मुलाखती दाखविणारा व्हिडिओ या लेखसोबत जोडत आहोत. तुम्हाला नाटक कसं वाटलं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा.
मी पुन्हा पुन्हा सांगेन. असं नाटक घडण्यासाठी एक काळ लोटावा लागतो. ही नाट्यकृती अजिबात चुकवू नका. कारण, दिल के खुश रखनेको ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है…!!!