व्हिजन निर्मित आणि पु. ल. देशपांडे लिखित ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकाचा २४ वा प्रयोग अलिकडेच पाहिला. ‘द लास्ट अपॉइंटमेंट’ या रशियन नाटकाचे, प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे यांनी केलेले, हे मराठी रूपांतरण आहे. एक सामान्य माणूस स्वतःवर नव्हे, तर दुसऱ्या कोणातरी व्यक्तींवर झालेल्या अन्यायासाठी सबळ पुराव्यांशी लढा देतो, एवढंच नव्हे तर आरोग्य उपमंत्री महोदयांच्या कार्यालयात जाऊन राजीनामा देण्याची सतत मागणी करतो. अशा घटनेवर आधारलेले संस्मरणीय नाट्य या नाटकामध्ये घडते.
या नाटकातील सामान्य माणसाने न्यायासाठी केलेला संघर्ष प्रेक्षकांच्या मनाला नकळत भिडत जातो, शिवाय प्रेक्षकांना विचार करायला देखील भाग पाडतो. पूर्वीच्या काळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अगदी वर्तमान काळात देखील बदललेली नाही. सामान्य माणसाची तडफड आणि परिस्थितीशी संघर्ष करताना झालेली होरपळ आजही अनुभवायला मिळते. राजकारणात अशा विदारक घटना सतत घडत असतात, परंतु आजच्या २४-तास न्यूज चॅनलच्या जगात त्या घटना सामान्य जनतेपर्यंत पोहोचतही नाहीत. राजकारण पूर्वीचे असो किंवा आजचे, राजकारण्यांसाठी समाजाप्रती असलेली संवेदना बदललेली नाही, याची जाणीव या नाटकातून सतत होत राहते. क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या गोष्टीत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर कमालीचे यशस्वी झालेले आहेत.
सुगत उथळे यांनी उपमंत्री देशमुख यांची भूमिका समंजसपणे साकारली आहे. उपमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ. चौधरी यांच्या भूमिकेत आशुतोष घोरपडे आपल्या सहज अभिनयाने विशेष लक्षणीय बाजी मारून जातात. मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाची भूमिका बजावताना प्रसंगी येणारे चढउतार दाखवताना त्यांचे अभिनय कौशल्य प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून जाते.
श्रीनिवास नार्वेकर यांची सामान्य माणसाची व्यक्तिरेखा नाट्यरसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यांचा अविस्मरणीय अभिनय आणि संवादफेक कौशल्य प्रेक्षकांना भारावून सोडते. शोभना मयेकर यांनी पीडित महिलेची व्यथा आपल्या अभिनयातून तंतोतंत मांडून भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. समाज आणि राजकारण यामधील विदारक परिस्थिती मांडणारी एक वास्तववादी कलाकृती प्रत्येकाने आवर्जून पहायलाच हवी.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल अथवा कलाकराबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.