न्यूज चॅनेल बघून किंवा वर्तमानपत्रातील ताज्या बातम्या बघून आपण ‘चाय पे चर्चा’ करत कित्येकदा अगदी सहजपणे म्हणून जातो, “तिसरं महायुद्ध अटळ आहे.” पण खरंच जर महायुद्ध झालं तर त्या युद्धाचं स्वरूप, त्याची भीषणता कुठल्या थराची असेल याची अद्याप आपल्याला किंचीतही जाणीव नाही. हाच पहिला विचार आलेला माझ्या डोक्यात जेव्हा मी ‘देवमाणूस‘ नाटक बघून नाट्यगृहातून बाहेर पडले. ताजे चेहरे घेऊन अतिशय वेगळ्या आणि महत्वपूर्ण अशा ज्वलंत विषयाचे नाटक घेऊन आल्याबद्दल सर्वप्रथम भद्रकाली प्रोडक्शनचे आणि प्रामुख्याने प्रसाद कांबळी यांचे अभिनंदन आणि खूप खूप कौतुक! आणि इतकी सुंदर नाट्यकृती स्वतःच्या लेखणीतून अस्तित्वात आणल्याबद्दल शंतनू चंद्रात्रे यांचे हार्दिक अभिनंदन, आणि खूप आभार.
भद्रकालीतर्फे याआधीही नवे चेहरे घेऊन, असे वेगळे विषय हाताळण्यात आले आहेत. ज्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित नाटक ‘संगीत देवबाभळी’! हे नाटक आजपर्यंत ४२ पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित झाले आहे. हे नाटक लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असलं तरी आजही या नाटकासाठी प्रेक्षकांचे प्रेम जराही कमी झालेले नाही.
‘देवमाणूस’ नाटकातील मुख्य नायक नाटकाच्या सुरुवातीलाच, “हे २०२३ वर्ष सुरू आहे आणि मी युक्रेनमधील युद्धभूमीवर उभा आहे”, असे म्हणतो. यावरून तुम्हाला नाटकाच्या विषयाबद्दल थोडा अंदाज आलाच असेल. हे नाटक प्रत्येकाने एक वास्तव म्हणून बघणं खूप गरजेचं आहे.
Devmanus Marathi Natak Synopsis
या नाटकाची कथा सांगायची झाली तर या कथेत आहे एक डॉक्टर, ज्याचं पोस्टिंग झालंय घायाळ लोकांच्या मदतीसाठी. हे लोक म्हणजे युद्धभूमीपासून नजीकच्या परिसरात राहणारे सामान्य रहिवाशी. युद्धभूमीपासून काहीच अंतरावर तंबू ठोकून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवणारा हा डॉक्टर. नाटकाचा मुख्य नायक. हा नायक आपल्याला त्याला युद्धभूमीवर आलेले अनुभव सांगतो. हे अनुभव वेगवेगळ्या देशातले आणि वेगवेगळ्या काळातले आहेत. नायक प्रेक्षकांना वेगवेगळ्या काळात घेऊन जातो आणि आपल्याला त्या त्या ठिकाणची माणसं भेटत जातात. अशी माणसं ज्यांचं कुणीतरी किंवा काहीतरी किंवा सगळंच या युद्धात हरवलंय. विस्कटलंय. अशी माणसं ज्यांना स्वतःच्या घरातच २४ तास घाबरत, लपत राहावं लागतंय. कधी कुठल्या बॉम्बवर आपलं नाव लिहिलं असेल याची त्यांना खात्री नाही. मन एकाच वेळी सुन्न आणि विचलित करून टाकणारे असे प्रसंग ओळीने आपल्यासमोर येत राहतात. आता हे दाखविण्यात आलेले काळ कोणते? माणसं कोणती? त्यांची गोष्ट काय? हे जाणून घेण्यासाठी ‘देवमाणूस’ नाटकाला अवश्य भेट द्या.
नाटकाच्या सुरुवातीला आपल्याला असा अंदाज येतो की जखमींची मदत करणारा डॉक्टर हाच देवमाणूस आहे आणि त्याच्याभोवती हे कथानक गुंफलेलं असेल. पण नाटक जसजसं पुढे जातं तशी आपल्याला इतरांचा जीव वाचवणारी माणसं दिसत राहतात. सगळी पात्रं डॉक्टरच्या सभोवताली फिरत नसून ही पात्रं वेगवेगळया काळात, वेगवेगळया प्रसंगात एकमेकांसाठीही देवासारखी उभी राहताना दिसतात.
युद्धभूमीवर युद्ध सुरू असतं तेव्हा स्वतःचा आणि आप्तेष्टांचा जीव वाचवण्यासाठी या सामान्य रहिवाशांचं एक वेगळं युद्ध सुरू असतं, हे या नाटकात खूप प्रकर्षाने दिसून येतं. माणूस देव बनू शकतो अथवा दानव. जर प्रत्येक माणूस देवासारखा इतरांचा विचार करून संयमी वृत्तीने विचार करू शकला तर युद्ध होणारच नाही. पण याच माणसाची दानववृत्ती जागृत झाली तर मात्र युद्ध अटळ आहे! या त्या युद्धात निष्पाप जीवांचं बळी पडणंही अटळ आहे!
Devmanus Marathi Natak Cast
नाटकातील सर्वच चेहरे नवे आहेत. म्हणून हे नाटक नाकारत असाल तर तुम्ही मोठी चूक करताय. या नाटकातील सर्वच पात्रं सुंदर साकारली गेली आहेत. मुख्य नायक वगळता इतर सर्वांनी एकापेक्षा जास्त पात्रं साकारली आहेत. प्रणव प्रभाकर, शर्वरी पेठकर, श्रीपाद देशपांडे, दुर्गेश बुधकर, ऋतुजा पाठक, आशिष चंद्रचूड या सर्वांचाच अभिनय चांगला झाला आहे. शर्वरी पेठकर आणि प्रणव प्रभाकर यांचा अभिनय आणि त्यांनी साकारलेली पात्रं ठळक लक्षात राहतात. ऋतुजा पाठक या अभिनेत्रीने तिला दिलेल्या व्यक्तिरेखांमधले वेगळेपण सहजरीत्या जपले आहे. दुर्गेश बुधकर या कलाकाराने सगळं विस्कटल्यावरही नव्याने सुरुवात करू पाहणारा इसम चांगला साकारला आहे. श्रीपाद देशपांडे याने डॉक्टर साकारला आहे. त्याच्याच नजरेतून आपण हे नाटक पाहत असतो. सगळ्या पात्रांना जोडणारा हा सूत्रधार त्याने उत्तम साकारला आहे. आशिष चंद्रचूड या कलाकाराने त्याला दिलेल्या भूमिकांना अचूक न्याय दिलेला आहे.
Devmanus Marathi Natak Review
प्रत्यक्ष युध्द न दाखवता निव्वळ शब्दांच्या जोरावर शंतनू चंदात्रे या गुणी लेखकाने, युद्धाचे उमटणारे भयंकर पडसाद सुस्पष्टरीत्या दर्शविले आहेत. दिग्दर्शक आणि कलाकार यांनी त्या शब्दांना अचूक न्याय देणारे सादरीकरणही केले आहे. या नाटकात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काहीतरी हरवल्याचे, हातातून निसटल्याचे, विस्कटल्याचे भाव आहेत. ते भावच शब्दांपलीकडचं असं बरंच काही बोलून जातात. यासाठी दिग्दर्शक जयेश आपटे आणि सर्व कलाकारांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. नाटकाचं पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना विषयाला साजेशी आहे. युद्धभूमी आणि त्यात होणाऱ्या आक्रमक चकमकी दाखवताना प्रकाशयोजनाकार अमोघ फडके, पार्शवसंगीतकार शुभम जोशी आणि सायली सावरकर तसेच नेपथ्यकार हर्षद माने, विशाल नवाथे आणि अंकुश कांबळी या संपूर्ण टीमची खूप मदत झाली आहे. नेपथ्याबद्दल एक ठळक आठवण सांगायची तर ती म्हणजे एका दृश्यात स्फोट झाल्यानंतर कोसळून पडलेल्या भग्न वास्तूचे चित्रण अतिशय सुंदर करण्यात आले आहे. तो निव्वळ सेट बघूनच मन बेचैन होतं. विचार करू लागतं. रंगभूषाकार सचिन वारीक यांनीही सगळी पात्रं तंतोतंत उठून दिसण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच, हवाई हल्ला दाखवताना अमोघ फडके यांनी वापरलेले प्रकाशयोजनेचे तंत्र नाट्यगृहात अगदी जिवंत वाटते.
अगदी थोडक्यात सांगायचं तर हे फक्त नाटक नाहीये. तर युद्धभूमीवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्थानिक लोकांच्या आयुष्याचं भीषण स्वरूप दाखवणारं वास्तववादी चित्रण आहे. मी प्रेक्षकांना आवाहन करते की त्यांनी हे नाटक नक्की पाहावं. नाटक कसं वाटलं हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका.