भाऊ-बहिणीच्या निर्मळ नात्याची ‘गुडन्यूज’! दादा, एक गुडन्यूज आहे
‘भाऊ-बहिण’ हे नातं इतकं स्पेशल असतं कि त्यात असणारे प्रेम नातेसंबंधांच्या पातळीवर खूप निर्मळ असते. मला स्वत:ला दोन मोठ्या बहिणी असल्याने या नात्याविषयी माझ्या मनात कायम जिव्हाळा आहे. पण एखाद्याला ‘दादा’ म्हणणारी एक छोटी बहिण आयुष्यात असली कि त्यात जबाबदारी सोबत बहिणीवर असलेले प्रेम, आयुष्यात एक वेगळीच मजा आणते. तिचे लाड आणि सगळे हट्ट पुरवताना त्या नात्यातील गोडवा द्विगुणित होत असतो.
पण जर त्याच खोडकर बहिणीने आपल्या मोठ्या दादाला एक दिवस येऊन ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ असं सांगितलं तर? तर साध्या भोळ्या दादाची जी काही भंबेरी उडते ती पाहणे म्हणजेच नाटक ‘दादा, एक गुडन्यूज आहे’.
Dada Ek Good News Ahe Marathi Natak Review
विनीत आणि नमिता हे दोघे भाऊ-बहिण. विनीत CA बनण्याची तयारी करत असलेला अतिशय हुशार पण नात्यांच्या बाबतीत आणि खासकरून आपल्या लहान बहिणीसाठी अतिशय संवेदनशील असा मुलगा. आणि नमिता म्हणजे अवघी वीसेक वर्षांची कॉलेजला जाणारी मुलगी. ह्या नाटकातील आणखी दोन व्यक्तीरेखा म्हणजे त्यांच्या शेजारी राहणारी मैत्रीण मिथिला आणि नमिताचा बॉयफ्रेंड बॉबी.
आपल्या कुटुंबापासून वेगळा झालेला, स्वत:च्या पायावर उभा राहण्याची धडपड करणारा आणि CA बनण्याची उत्तम तयारी करत थेट कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी करणारा विनीत सतत उतावळा पण तितकाच हुशार मुलगा आहे. त्याची बहिण मुक्तपणे जगणारी आणि आपल्या दादावर खूप प्रेम करणारी असते. अचानक तिच्यात आणि बॉबीमध्ये वाढलेल्या जवळिकीचे ती प्रेग्नंट होण्यात रुपांतर होते आणि ही गोष्ट विनीतला कळल्यावर तो कावराबावरा होतो. कितीही बोलत असला तरीही आपल्या बहिणीच्या कृत्याची ‘लाज’ वाटण्यापेक्षा त्याला आपल्या बहिणीबद्दल लोकं काय विचार करतील ह्याची ‘काळजीच’ जास्त असते. समोर करीयरचे टेन्शन आणि बहिणीचे हे उपद्याप, त्यामुळे विनितला हे सगळे प्रकरण समजून पचवणे खूप कठीण जाते. संपूर्ण कुटुंबात आपल्या बहिणीशी सगळ्यात जास्त जोडला गेलेला विनीत हे सर्व मान्य करताना भावनिक पातळीवर खूप गोंधळून जातो. बॉबीसारख्या मुलासोबत आपल्या बहिणीची गाठ बांधून द्यावी का? हा विचार त्याला सतत अस्वस्थ करत असतो. ह्या सगळ्यात नमिता अगदीच नेमकेपणाने ‘छोट्या बहिणी’ची भूमिका बजावत असते. बॉबी हा सुद्धा विनीतचे मन जिंकण्याचे प्रयत्न करत असतो.
“ह्या सगळ्यात घरात कोणीही मोठे बाईमाणूस नसल्याने विनीतच नमिताची ‘आई आणि बाबा’ बनून क्षणोक्षणी जी काळजी घेतो ते पाहणे खरच खूप छान अनुभव देते.”
ह्या सगळ्यात कुठेतरी विनीतला सतत आधार द्यायला मिथिला पुढे असते पण तिचे विनीत साठीचे असलेले अव्यक्त प्रेम तिची एक वेगळीच घुसमट संपूर्ण नाटकात दाखवत असते. पुढे आपलीच बहिण म्हणून तिची चूक पदरात घेऊन तिच्या इच्छेखातर मुल जन्माला घालण्याला विनीत पाठिंबा देतो आणि मग सुरु होतो नमिताचे डोहाळे पुरवण्याचा व भाऊ-बहिणीच्या एका गोड नात्याचा सुंदर प्रवास. ह्या सगळ्यात घरात कोणीही मोठे बाईमाणूस नसल्याने विनीतच नमिताची ‘आई आणि बाबा’ बनून क्षणोक्षणी जी काळजी घेतो ते पाहणे खरच खूप छान अनुभव देते.
Dada Ek Good News Ahe Marathi Natak Script
लेखिका कल्याणी पाठारे ह्यांचे हे नाटक त्यांनी कोणत्याही क्षणी ‘उपदेश’ देण्यासाठी लिहिलेले आहे, असे वाटत नाही. मुळात हा विषय गमतीदार पद्धतीने, वातावरण हसत-खेळत ठेवत मांडला गेलाय ह्याबद्दल विशेष कौतुक. कारण उगाचच त्याला मेलोड्रामा केला गेला असता तर त्याची मजा घेत त्यातून लोकांना बोध घेता आला नसता. अर्थात लेखिकेने संहिता लिहिताना त्याला विनोदाच्या पातळीवर सक्षम करत असताना त्यातील नात्यांचा गोडवा आणि घडलेल्या घटनेचे महत्त्व अबाधित ठेवले आहे.
“दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी संहितेच्या जातकुळीला साजेसे दिग्दर्शन करत त्यातील कलाकारांना योग्य तो अवकाश प्राप्त करून दिला आहे.”
दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी संहितेच्या जातकुळीला साजेसे दिग्दर्शन करत त्यातील कलाकारांना योग्य तो अवकाश प्राप्त करून दिला आहे. मिथिला हिला अगदी मोजक्या संवादांत सुद्धा तिची-तिची अशी भावनिक घुसमट दाखवायला मिळाली आणि तसेच विनीत आणि नमिता यांचं क्षणोक्षणी दिसणारं निर्मळ नातं अखंड नाटकात तसंच राहिलं, याचं सगळं क्रेडीट कलाकारांसोबत दिग्दर्शकालाही जातं. नाट्यावकाश उपलब्ध करून देताना नेपथ्यात बेडरूम एका विशिष्ट उंचीवर मांडण्याची कल्पना अतिशय आवडली. त्यामुळे त्या जागेचा आणि तिथे जाण्यासाठीच्या पायऱ्यांचा योग्य वापर प्रयोगात केला गेला.
Dada Ek Good News Ahe Marathi Natak Actors
उमेश कामत ह्याने विनीतची भूमिका खूप समजून-उमजून केलेली आहे. त्या व्यक्तीरेखेला अपेक्षित देहबोली त्याने सबंध नाटकात जपली, त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक. कारण सततचा उतावीळपणा कुठेही भोळसटपणा किंवा विक्षिप्त वाटत नव्हता. आपल्या बहिणीसाठी सतत तत्पर असलेला हा मोठा दादा किती संवेदनशील आहे, याची परिणीती नाटकात उमेशला पाहताना सतत येत होती. नमिता बॉबीच्या घरी जाताना त्याच्या संयमाचा फुटलेला बांध, चिंतेत असताना सतत चॉकलेट खाण्याची सवय, नमिताचे डोहाळे पुरवताना आणि तिला खुश ठेवतानाही अभ्यासासाठी व करीयरसाठी सजग असलेला हा विनीत खूप दमदारपणे उमेशने साकारला. ‘मुलाला जन्म देणं आणि त्याला योग्य आयुष्य देणं वेगळे असते’ अशा विचारसरणीचा हा विनीत लक्षात राहतो.
ऋता दुर्गुळेला पहिल्यांदा रंगभूमीवर पाहताना तिच्या देहबोलीतील सहजतेला दाद द्यावीशी वाटते. कारण प्रेग्नन्सीच्या काळात तिच्यात होणारे स्वभाव बदल (mood swings) आणि खासकरून अंतिम टप्प्यातील प्रेग्नन्सीत तिच्या देहबोलीत तिने केलेला बदल वाखाणण्याजोगा आहे. तिचा संपूर्ण नाटकातील वावर प्रसन्न करणारा होता. काहीशी बालिश, पण गोड वाटणारी ही नमिता कुठेही अती लाडावलेली वाटली नाही, हे नोंद घेण्याजोगे आहे.
आरती मोरे हिने मिथिला हे पात्र अतिशय नेमक्या पण तितक्याच ताकदीने साकारले. मिथिलाची सगळ्या प्रकरणात असलेली एक तटस्थ भूमिका आणि विनीतवरचे ‘निरपेक्ष’ प्रेम, हे तिच्या व्यक्तीरेखेला खुलवत होते. तिच्या वाट्याला सगळ्यात कमी संवाद होते पण तरीही तिचं त्या सगळ्यांमध्ये असणं आरतीने वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियांमधून दिसत होतं.
“कोणत्याही क्षणी नाटक गंभीर वळणावर जाऊ न देण्याचे श्रेय जसे दिग्दर्शक अद्वैतला जाते तसेच ते ‘बॉबी’ या पात्राला आणि त्या व्यक्तिरेखेला परिपूर्ण न्याय देणाऱ्या आशुतोष गोखलेलाही जाते.”
विशेष कौतुक करावसं वाटतं ते म्हणजे आशुतोष गोखले या कलाकाराने साकारलेल्या बॉबी या व्यक्तिरेखेचं! यापूर्वी ही व्यक्तिरेखा ऋषी मनोहर हा कलाकार साकारत होता. आशुतोषने इतर सर्व पात्रांना नकळतपणे एकमेकांशी जोडून ठेवले आहे. तसेच कोणत्याही क्षणी नाटक गंभीर वळणावर जाऊ न देण्याचे श्रेय जसे दिग्दर्शक अद्वैतला जाते तसेच ते ‘बॉबी’ या पात्राला आणि त्या व्यक्तिरेखेला परिपूर्ण न्याय देणाऱ्या आशुतोष गोखलेलाही जाते. आशुतोष गोखले याने सुरुवातीला काहीसा लाजरा-बुजरा बॉबी आणि नंतर विनीतच्या सहवासात व विनीत-नमिताचे गोड नाते पाहत खुलत गेलेला बॉबी उत्तमपणे साकारला. काही प्रसंगात घडलेल्या घटनेला प्रतिसाद म्हणून विनीतला जाऊन त्याने मारलेली मिठी मजेशीर वाटत होती. वीस वर्षांचा असूनही आपण केलेल्या कृत्याची त्याला जाण होती किंबहुना त्याचे महत्त्व त्याला पटत होते, ही गोष्ट खरोखर महत्त्वाची होती.
Dada Ek Good News Ahe Marathi Natak Details
प्रदीप मुळ्ये यांनी नेमक्या गोष्टींचा वापर करत एक सर्वसाधारण घराचे नेपथ्य अतिशय कल्पकतेने उभारले आहे. बेडरूम एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा आणि तिथे जाण्यासाठी केलेला पायऱ्यांचा वापर तसेच बेडरूम आणि हॉलमध्ये कोणतीही भिंत न ठेवल्याने नाट्यावकाशात येणारा अडथळा त्यांनी दूर केला. अमोघ फडके यांनी प्रकाशाच्या माध्यमातून प्रसंगातील महत्त्वपूर्ण जागा भरून काढल्या. खासकरून खिडकीतून रात्रीच्या प्रहरी येणारा निळाशार प्रकाश त्या प्रसंगात एक वेगळा फील आणत होता. मात्र काही ठिकाणी उमेश-नमिताच्या महत्त्वच्या प्रसंगात त्यांच्यावर दिलेला स्पॉट अर्धवट प्रकाश देत होता, ज्यामुळे प्रसंगात प्रकाशाचे महत्त्व उरत नव्हते.
समीर सप्तीस्कर याने पार्श्वसंगीताने नाटकाला हलकं-फुलकं करण्यात योग्य ती साथ दिली. महत्त्वाच्या भावनिक जागा संगीताच्या योग्य तीव्रतेने अधोरेखित केल्या. श्वेता बापट यांनी वेशभूषेतून पात्रांच्या लाइफस्टाइलला उत्तम अधोरेखित केले. नमिताच्या कॉलेज लाईफला साजेसे तर मिथिलाच्या प्रोफेशनल लाईफला चपखल बसणारी वेशभूषा होती. निर्माती प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शनच्या नंदू कदम यांचे हे असे अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्व नाटक रंगभूमीला आणि प्रेक्षकांना दिल्याबद्दल खूप आभार.
भावाने बहिणीसाठी, बहिणीने भावासाठी, ज्यांना बहिण-भाऊ नाहीत अशांनी हे ‘नातं’ समजून घेण्यासाठी हे नाटक जरूर पाहावे. दोन घटका ह्या विनीत-नमिताच्या सहवासात राहिल्यावर आयुष्यात उगाचच फक्त टेन्शन न घेता आलेल्या परिस्थितीला कसे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सामोरे जायचे, याचे भान आपल्याला येते. ही ‘गुडन्यूज’ पाहिल्यावर आपल्याही चेहऱ्यावर हळूच आनंद आणि मनात आपल्याला बहिण-भाऊ असल्याची हवीहवीशी वाटणारी सुखावह जाणीव होते.
— अभिषेक महाडिक आणि गायत्री देवरुखकर
Dada Ek Good News Ahe Marathi Natak Cast
नाटक : दादा, एक गुडन्यूज आहे.
लेखक : कल्याणी पाठारे
दिग्दर्शक : अद्वैत दादरकर
नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
प्रकाशयोजना : अमोघ फडके
संगीत : समीर सप्तीस्कर
कलाकार : ऋता दुर्गुळे, आरती मोरे, आशुतोष गोखले आणि उमेश कामत
Dada, Ek Good News Aahe Upcoming Shows
इतर मराठी नाटकांचे रिव्ह्यूज / समीक्षणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा → Marathi Natak Reviews
1 Comment
Pingback: 'दादा एक गूड न्यूज आहे' नाटकाची गूड न्यूज — पुण्यात सादर होणार २०० वा प्रयोग • रंगभूमी.com