मी नुकतंच वामन तावडे लिखित आणि अभय पैर दिग्दर्शित ‘छिन्न’ हे नाटक बघून आले. नाट्यगृहात प्रवेश करताना पोस्टर बघितलं तर त्यावर लिहिलेली एक ओळ मनात घर करून राहिली. ‘४४ वर्षांपूर्वीचे वादळ पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने’… अशी ती ओळ होती. ती ओळ वाचून बरेच प्रश्न पडले. पुढील काहीच वेळात मी नाटकाच्या संपूर्ण टीमची मुलाखत घेण्यासाठी भेट घेणारच होते. त्यामुळे म्हटलं Google कडे न वळता टीमकडूनच या ओळीमागची हकीगत जाणून घ्यावी. मी बॅकस्टेज गेले. व्ही. आय. पी. रुममध्ये नाटकातील कलाकारांच्या मुलाखती घेत होते आणि मध्येच ती समोर येऊन बसली. मी बाकीच्यांप्रमाणे तिलाही विचारलं की तुम्ही कोणती भूमिका साकारताय? तर ती हसली. म्हणाली… छे छे! मी वामन तावडे यांची कन्या ईशा वामन तावडे…!!! अर्थात या नाटकाचे लेखक वामन तावडे यांची ती कन्या होती. मला लक्षात आलं होतं की आता मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार होती. ४४ वर्षांपूर्वीचं कोणतं वादळ तेही समजणार होतं आणि मला ते समजलंही.
Chhinna Marathi Natak
वामन तावडे यांना १९७८ साली ‘छिन्न’ नाटकासाठी भरपूर पारितोषिके मिळाली होती. त्यावेळी या नाटकात सदाशिव अमरावपूरकर, आशालता वाबगावकर, स्मिता पाटील, दिलीप कुलकर्णी अशी दिग्गज कलाकार मंडळी अभिनय करत होती. स्मिता पाटील यांचे बरेच चित्रपट त्याकाळी गाजत होते. पण तरीही त्यांनी या नाटकासाठी आवर्जून होकार दिला होता. वामन तावडे यांच्या कन्या ईशाकडून मला असंही कळलं की याच नाटकासाठी वामन तावडे यांना त्यांच्या वयाच्या २८ व्या वर्षी… हो! इतक्या अल्पवयात त्यांना या नाटकाच्या लेखनासाठी वाड्मय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
नाटकातील कलाकारांकडून ‘छिन्न’ बद्दल जाणून घेताना सगळे कलाकार नाटकाबद्दल इतकंच सांगत होते की हे नाटक सुन्न करुन टाकतं. मी गंमतीत एकाला असंही म्हटलं की नाटकाचं नाव ‘छिन्न’ न ठेवता ‘सुन्न’ ठेवायला हवं होतं! मनातल्या मनात माझी नाटकाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कधी एकदा नाटक सुरू होतंय असं झालं.
…आणि नाटक सुरू झालं. पडदा उघडताच चाळीतलं एक घर दिसलं. माई म्हणजेच सिंधू, तिचा नवरा (अप्पा), त्यांची दोन मुलं, मुलगा अरुण आणि मुलगी शालू, अगदी तुमच्या आमच्या घरातलंच वातावरण दिसतं आणि पहिल्याच दृश्याच्या शेवटी एक बॉम्बस्फोट व्हावा तसं काहीतरी घडतं आणि नाटक थोडंसं बोल्ड आहे असं लगेच ध्यानात येतं. ते काय घडतं? नाटकाचा नेमका विषय काय? हे सगळं तुम्हाला सांगितलं तर कदाचित नाटकातलं खरंखुरं आणि रोखठोक नाट्य तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे राहू देत. इतकंच सांगेन की स्त्री संबंधित एक मुलभूत गरजेचा विषय इतक्या हटके आणि स्पष्ट शब्दांत मांडलेला मी आजवर बघितला नाही. जे मला सगळ्यांनी आधीच सांगितलं होतं तसंच झालं. नाटक संपल्यावर प्रेक्षक सुन्न झाले होते. टाळ्या वाजवाव्या की नाही अशा दुविधेत होते. माणूस स्वतःच्या भावनांसमोर, शारीरिक गरजांसमोर किती हतबल होऊ शकतो याचं चित्रण या नाटकातून घडतं. नातीगोती, मुलं, संसार यापलीकडे जाऊन प्रत्येकाचं स्वतःचं असं प्रत्येकाचं एक विश्व असतं. कितीही त्याग आणि संयम करायचं म्हटलं तरी ‘त्या’ स्वतःच्या विश्वात प्रत्येकाला रमावंसं वाटूच शकतं. हीच आहे ‘छिन्न’ची कहाणी!
अभय पैर — ‘छिन्न’ नाटकाचे दिग्दर्शक
अभय सर! सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही हे नाटक रंगभूमीवर पुन्हा जन्माला आणलंत. नुसतंच नाटक रंगभूमीवर आणणारे बरेच जण असतात. पण तुम्ही या नाटकाला खऱ्या अर्थाने आकार ऊकार देऊन चांगले वळण लावले आहे. आमच्या पिढीला हे नाटक बघायला मिळणं म्हणजे एक पर्वणीच आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या संधीचा लाभ घेणं अनिवार्य आहे. इतकी आगळीवेगळी कलाकृती जन्माला येण्यासाठी जो एक काळ लोटावा लागतो तो लोटून गेलेला आहे. ४४ वर्षांचा काळ…
अभय पैर यांचं दिग्दर्शन चोख आहे. नाटकाचा विषय बोल्ड असला तरी नाटक कुठेही अश्लील अथवा आक्षेपार्ह वळण घेत नाही. लेखनाचा दर्जा शेवटपर्यंत अबाधित राहतो. विशेष उल्लेख कारावासा वाटतो त्यांच्या कलाकार निवडीचा! सगळेच कलाकार सुंदर सादरीकरण करत आहेत. त्याचं संपूर्ण श्रेय जाईल अभय पैर यांना! प्रत्येक कलाकाराला त्याची अशी व्यक्तिरेखा सापडलेली आहे. उत्तरोत्तर ती खुलतही जाईल याबद्दल मला शंका नाही.
Chhinna Marathi Natak — Cast
अभय पैर जे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत त्यांनीच अप्पाची भूमिका या नाटकात साकारली आहे. गरिबीने त्रस्त आणि लाचार परिस्थितीपुढे हात टेकलेला आप्पा त्यांनी सुंदर वठवला आहे.
पूजा नायक या गुणी अभिनेत्रीने नाटकातील मध्यवर्ती भूमिका अर्थात सिंधू(माई)ची भूमिका साकारली आहे. एकाच भूमिकेत अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा साकारायला मिळाल्याबद्दल पूजा नायक यांचं खूप खूप अभिनंदन! आणि या सगळ्या छटा सर्रस साकारल्याबद्दल कौतुकही! नाटकभर ग्रे शेड वाटणारी ही व्यक्तिरेखा नाटकाच्या शेवटाकडे अंतर्मुख करुन सोडते. “खरंच मी चूक केलं का?”, असं विचारणारी सिंधू नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांच्या मनात न चुकता डोकावते.
कांचन प्रकाश या अभिनेत्रीने शालूची भूमिका साकारली आहे. अल्लड वयातली शालू ते प्रौढपण असा प्रवास या अभिनेत्रीने सुंदर दर्शविला आहे.
विशाख म्हामणकर या कलाकाराने श्रीकांतची भूमिका साकारली आहे. श्रीकांत कोण? हे तुम्ही नाटक बघितल्यावरच तुम्हाला कळेल. राहू दे की जरा गुलदस्त्यात! पण विशाखने ही भूमिका अतिशय समर्पकरीत्या वठवली आहे. त्याचा रंगमंचावरील सहज वावर कथानकातील काही कठीण वळणं उलगडण्यास मदत करतो. बरेचदा सिंधूबद्दल आपल्या मनात प्रश्नांचं वादळही उभं करतो.
अरुणची भूमिका नवसारी कुडव याने चांगली साकारली आहे. शाळेत जाणारा, थोडासा खोडकर पण घरची परिस्थिती जाणून अभ्यास करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचं सगळं ऐकणारा अरुण त्याने छान साकारला आहे.
अरुणचा मित्र शांताराम चैतन्य म्हात्रे या कलाकाराने अगदी सहज साकारला आहे. बालिश असूनही समंजस आणि मस्तीखोर असूनही साधासरळ असा शांताराम आपल्याला शेजारच्या एखाद्या खोडकर लहानग्याची आठवण करुन देतो.
निकिता सावंत या अभिनेत्रीने भाजीवाली आणि सिंधूची शेजारीण अशा दोन्ही भूमिका चोख साकारल्या आहेत.
याव्यतिरिक्त अप्पांचा शेजारचा बेवडा मित्रही सुगत उथळे यांनी छान वठवला आहे.
या नाटकातील सगळीच पात्रं खूप विचार करुन लिहिली गेलेली आहेत. ती आपल्याशी बोलतात. रंगमंचावर थैमान घालतात.
Chhinna Marathi Natak — Technically Strong As Well
नाटकाची तांत्रिक बाजू भक्कम आहे. विशेष उल्लेख कारावास वाटतो तो या नाटकाचे नेपथ्यकार प्रदिप पाटील यांचा. चाळीतील घर, त्याबाहेरील जिना, वरच्या मजल्यावर जायचा रस्ता सुंदर दाखविला आहे.
श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजनाही अप्रतिम! नाटकातील वेगवेगळ्या दृश्यात बरेचदा प्रकाशयोजनेच्या वापरानमुळे प्रसंगाच्या खोलीची जाण होते.
नाटकाचं संगीत बिपीन वर्तक आणि नंदलाल रेळे यांनी चांगलं केलं आहे. पण त्यावर अधिक काम करता येईल किंवा केलं गेलं पाहिजे जेणेकरून प्रसंग अधिक अंगावर येतील. रोमांच उभा करतील.
अनिकेत वंजारे यांनी दिलेल्या वेशभूषा तसंच उदयराज तांगडी यांनी केलेल्या रंगभूषा सुंदर आणि समर्पक! प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील कंगोरे समोर येण्यास या दोन्ही पैलूंमुळे नाटकभर मदत झाली आहे.
तर असं हे इतिहास घडवलेलं अजरामर नाटक ‘छिन्न’! खरंतर OTT वर ढीग ढीगभर वेब सिरीज बघणाऱ्या आजच्या पिढीसाठी हे नाटक तितकं बोल्ड ठरणार नाही. पण काही प्रेक्षकांना हे नाटक बोल्ड वाटू शकतं. मात्र, या नाटकाचं लेखन, त्यातील कलाकार तुमच्या मनाचा ठाव घेतील हा माझा दावा आहे. अजून अगदी पुढच्या ४४ वर्षांनंतरही हे नाटक प्रेक्षकांना तितकंच भावेल. पण आजची ही संधी तुम्ही दवडू नये. नजीकच्या नाट्यगृहात लवकरात लवकर जा आणि या नाटकाला अवश्य भेट द्या.