आपला समाज हा पूर्वीपासून जात, वर्ग, आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर विभागला गेला आहे. पण या समाजात असाही एक वर्ग आहे जो या सगळ्याच्या तळाशी येतो. सगळ्यात दुर्लक्षित आणि मागे राहिलेला, किंबहुना जाणूनबुजून मागे ठेवलेला समाज. तो म्हणजे मॅनहोल साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वर्ग. आपण एखाद्या नाल्याच्या बाजूने जरी गेलो तरी आपल्याला जो वास असह्य होतो, त्या वासातल्या आणि घाणीतल्या मॅनहोलमध्ये शिरून, हे कर्मचारी साफ सफाई करतात. त्या जीवघेण्या, असह्य वासातल्या मॅनहोलमध्ये उतरून आपण केलेली घाण त्यांना साफ करावी लागते. पण त्या बदल्यात आपल्या समाजात त्यांना साधं मानाचं स्थानदेखील मिळत नाही. एवढंच काय त्यांना पुरेसा पगारसुद्धा दिला जात नाही. त्यांच्या आयुष्याची ही शोकांतिका कधीही आपल्यापर्यंत पोहोचली नाहीये. मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची हीच व्यथा मांडत, ‘उन्मुक्त कलाविष्कार’च्या सहकार्याने ‘अस्तित्व संस्था’ आपल्या समोर घेऊन आली आहे एक नवं कोरं नाटक ज्याचं नाव आहे ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते‘.
हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. या नाटकात मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांच्या घरात, परिवारात व वैवाहिक जीवनात काय अडचणी येतात याचं अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर मांडलं आहे. त्यांना पुरेसा पगार मिळत नाही व जितके पैसे मिळतात ते कधीही वेळेवर मिळत नाहीत. एवढंच काय त्यांना पुरेशी आरोग्यसेवादेखील मिळत नाही. त्यांच्या जातीमुळे व त्यांच्या शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना आयुष्यभर या गरिबीत जगावं लागतं. किंबहुना त्यांना गरिबीत जगवलं जातं, कारण त्यांनी जर हे काम केलं नाही तर मुंबई घाणीने तुंबून जाईल. त्यामुळे त्यांच्या पिढ्यानपिढ्या हीच घाण उपसत आल्या आहेत. मॅनहोलमधून येणाऱ्या त्या असह्य वासाला वैतागून हे कर्मचारी नशेच्या आहारी जातात. मॅनहोलमध्ये उतरताना त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नाही. हे कंत्राटी कामगार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुखसोयीदेखील त्यांना मिळत नाही. सरकार त्यांच्या या परिस्थितीची जबाबदारी कधी घेणार? अजून किती पिढ्या ही माणसं हेच काम करत राहणार? आणि त्यांच्या या समस्येचं निवारण आहे की नाही? असे बरेच प्रश्न विचारणारं हे नाटक आहे.
Natak Synopsis
संकेत, गणपत, संतोष, बेला, सुलोचनाबाई, राजू आणि नामदेव हे एका कॉन्ट्रॅक्टरकडे कॉन्ट्रॅक्टवर कामाला असतात. सरकारी अधिकारी एका कॉन्ट्रॅक्टरला नाले सफाईचं काम सुपूर्त करतात आणि हे कॉन्ट्रॅक्टर मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांना पगार देतात. पण गेले दोन महिने या सगळ्यांना पगार मिळालेला नसतो. त्याबद्दल त्यांनी विचारलं तर मुकादम त्यांच्यावरच डाफरतो. संकेतची बायको त्याच्या पदरात एक मुलगी सोपवून न्यूमोनियामुळे देवाघरी गेलेली असते. संकेताची मुलगी सोनारी, हिला शाळेतल्या अभ्यासासाठी काही पुस्तकं हवी असतात. परंतु पगार न मिळाल्यामुळे संकेत ती पुस्तकं विकत घेऊ शकत नसतो व त्यामुळे सोनारीचं शाळेत जाणं बंद होतं. सोनारीने खूप शिकून एका मोठ्या पदावर खुर्चीत बसून काम करावं अशी संकेतची इच्छा असते. परंतु तिचं शाळेत जाणं बंद झालं तर तिलासुद्धा तिचं आयुष्य या घाणीत काढावं लागेल, या विचाराने संकेत घाबरतो व तो मुकादमला पगाराबद्दल विचारतो. त्याच दिवशी काँट्रॅक्टरला खाडीजवळचा नाला १ दिवसात साफ करायची सक्त ताकीद मिळते. नाल्याकडे उघडणाऱ्या त्या मॅनहोलचे तोंड अतिशय लहान असते व नाल्यातील रस्ता सरळ नसून तिरका असतो. त्यामुळे मुकादम दिनेश नावाच्या एका अल्पवयीन व कृश मुलाला हे काम सोपवतात. खाडीजवळचा नाला साफ करणं अतिशय जोखमीचे काम असते. त्यामुळे संकेतला हे अजिबात पटत नाही, पण हे काम झाल्यावरच पगार मिळेल असं मुकादम त्याला सांगतात. पगार झाल्याशिवाय सोनारीसाठी पुस्तकं विकत येणं शक्य नव्हतं हे संकेतला आठवतं आणि म्हणून संकेतच्या निरीक्षणाखाली हे काम सुरु होतं. आता हे काम पूर्णत्वास पोहोचतं की त्यात व्यत्यय येतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अंधे जहाँ के अंधे रास्ते हे नाटक बघावं लागेल.
Natak Actors
संतोष जाधव, अंकुर घाटगे, प्रथमेश पवार, साहिल मावंलकर, तन्मय धामणे, अभिनय सावंत, आयुष भोसले, संकेत बागल, तपस्वी विभूते, नम्रता कणसे, रुजुता साटम, स्वाती माळी आणि श्रेया व्यवहारे हे कलाकार या नाटकाचा भाग आहेत. या नाटकातले सगळे कलाकार जरी नवखे असले तरी प्रत्येकाने उत्कृष्ट काम केलं आहे. प्रत्येकाला हे नाटक आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याची भूक आहे. या सगळ्या कलाकारांना आपल्या भूमिका अगदी चोख समजल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रत्येक शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. हे सगळे कलाकार या भूमिका जगतायेत असं म्हणायला काही हरकत नाही. संतोष जाधव, अंकुर घाटगे आणि अभिनय सावंत या कलाकारांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्यांच्या भूमिका अवघड आहेत पण प्रेक्षकांपर्यंत ते पात्र आणि त्या पात्राच्या भावना, त्यांचे विचार खूप स्पष्टपणे व मनापासून व्यक्त केल्या आहेत. नशेबाज गणपतचे पात्र पटवून देणं थोडं अवघड आहे. परंतु अंकुर घाटगे यांनी प्रेक्षकांना हे पटवलं आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. त्याचबरोबर इतर कलाकारांनी सुद्धा अतिशय छान काम केलं आहे. पात्र छोटं जरी असलं तरी प्रत्येक कलाकाराने त्यांच्या पात्राला न्याय दिला आहे. ही सगळी पात्र नाटक जोडून ठेवतात आणि त्यामुळे नाटकात पुढे काय होतं हे जाणून घ्यायचे कुतूहल वाढत जाते.
Natak Details
या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन उर्मी ह्यांनी केले आहे व मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की दोन्ही विभागांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नाटकाचं लेखन अतिशय दर्जेदार असून प्रत्येक वाक्याला एक वजन आहे. पात्रांचे आपापसात होणारे संवाद मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातात. त्याचबरोबर प्रत्येक पात्राला त्यांनी त्यांच्या लेखणीतून न्याय दिला आहे.
नाटकाचे दिग्दर्शनदेखील अतिशय वाखाणण्याजोगे आहे. त्या कर्मचाऱ्यांचे दुःख, त्यांच्या वेदना, त्यांना होणारा त्रास या सगळ्या गोष्टींचे खूप हलवणारे चित्रीकरण केले आहे. विशेष म्हणजे मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांना मॅनहोलमध्ये उतरताना जे कष्ट घ्यावे लागतात व आत गेल्यावर तिथे साचलेल्या गॅसमुळे होणाऱ्या त्यांच्या तडफडीच्या संपूर्ण दृश्याचे सादरीकरण रंगमंचावर केले आहे. कलाकारांच्या कंबरेला दोरी बांधून त्यांना त्या मॅनहोलमध्ये प्रत्यक्ष उतरवलं आहे व त्यांच्या अंगावर काळं फासलं आहे. या संपूर्ण दृश्यामुळे आपण खरोखर एखाद्या मॅनहोलमध्ये जाऊन हा अनुभव घेतोय असा भास होतो आणि ते दृश्य पाहून शहारा येतो. ते दृश्य इतक्या कुशलतेने दिग्दर्शित केलं आहे की प्रेक्षकांनीदेखील टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं.
या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी अमित इंदुलकर यांनी सांभाळली असून त्यांनी खूप छान काम केलं आहे. एका रंगमंचावर मॅनहोल बनवणं अतिशय अवघड काम आहे परंतु त्यांनी ते खूप सुटसुटीत पद्धतीने रंगभूमीवर मांडलं आहे. त्याचबरोबर प्रकाशयोजना सौरभ शेठ यांची असून त्यांनी वाखाणण्याजोगं काम केलं आहे. प्रत्येक सीन व भावनेनुसार वेगवेगळ्या लाईट्सचा वापर केला आहे व मॅनहोलवाल्या दृश्यांमध्ये लाईट्सचा वापर खूप कसबीने केला आहे. रंगभूषेची जबाबदारी सुनील मेस्त्री व संगीताची जबाबदारी कौशल म्हात्रे यांनी पार पाडली असून दोघांनीही अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे.
हा अतिशय वेगळा व थोडा गंभीर विषय आहे. पण त्याही पेक्षा जास्त हा अतिशय महत्वाचा विषय आहे. मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांबद्दल व त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काहीही माहित नाही व आपल्या स्वास्थ्यासाठी रोज झिजणाऱ्या या व्यक्तींच्या आयुष्याची कहाणी कधीच आपल्यासमोर आली नाही आहे. हे सत्य घटनेवर आधारित नाटक आपल्याला आतून हादरवून विचार करायला उद्युक्त करतं. हा विषय समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. तेव्हा आपल्या समाजात राहणाऱ्या या उपेक्षित वर्गाच्या आयुष्याची कहाणी आपण आवर्जून ऐकावी व नक्कीच तुमच्या आयुष्यातले काही तास या नाटकाला द्यावे. आणि मी खात्रीने सांगू शकते की तुमचा वेळ सार्थकी लागेल.