भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, इथली नातीगोती, भाषाशैली इतकी समृद्ध आहेत की त्याचे जितके गोडवे आपण गाऊ तितके कमीच आहेत. पण आपण हे गोडवे गाऊ शकतो कारण आपल्याला आपली भारतीय संस्कृती जन्मत:च ज्ञात झाली होती. आपण ‘भारतीय’ मातीत जन्मलो. म्हणून आपण विविधतेत एकता जाणतो. विविध जातीच्या, स्वभावाच्या लोकांना आपलंसं करू शकतो. पण, भारतात जन्मलेले बरेच तरुण आज परदेशात जाऊन स्थायिक होताना दिसत आहेत. हे तरुण भारतात सहसा परतत नाहीत. अगदी वयोवृद्ध आई वडील गंभीर आजारी असतील तरीही मुलांना परदेशातून भारतात सहज परतता येत नाही. या परदेशी स्थायिक झालेल्या तरुणांना मुलं होतात तेव्हा त्या मुलांना लहानपणीपासूनच पाश्चात्य संस्कृतीची ओळख होते. भारतीय संस्कृतीचा मागमूसही त्यांना लागत नाही. अशावेळी, या परदेशी जन्मलेल्या भारतीय मुलांच्या आयुष्यात कुठली वळणं येऊ शकतात त्या वळणांचा अभ्यास म्हणजे रसिकमोहिनी निर्मित राजन मोहाडीकर लिखित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित दोन अंकी मराठी नाटक ‘अमेरिकन अल्बम’!
American Album Writer Rajan Mohadikar
राजन मोहाडीकर यांनी भारतीय संस्कृतीचा आढावा घेणारं एक अभूतपूर्व शब्दचित्र नाटकाच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडलं आहे. पाश्चात्य संस्कृती वरकरणी कितीही पुढारलेली वाटत असली तरी भारतीय संस्कृतीत पिढ्यानपिढ्या जोपासलेला ऊबदारपणा सामान्य जीवन जगण्यासाठी किती महत्वाचा आहे, हे राजन मोहाडीकर यांनी त्यांच्या लिखाणातून नुसतं पटवूनच दिलेलं नाहीये तर त्याचं प्रात्यक्षिकही नाटकात दाखवलंय. हे नाटक बघून नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांचं मन एका विचाराने नक्की दाटून येतं. तो विचार म्हणजे, ‘आपण किती श्रीमंत आहोत. संस्कृतीची श्रीमंती, माणसांची श्रीमंती!’ आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कितीतरी गोष्टी किती गृहीत धरत होतो याची जाणीव आपल्याला ‘अमेरिकन अल्बम’ हे नाटक बघितल्यावर होते. अशा विषयाचं नाटक मी आजवर रंगभूमीवर बघितलेलं नाही.
American Album Director Purushottam Berde
प्रेक्षकांची अचूक नस पकडणारे दिग्गज दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन तर केलंच आहे. पण त्यासोबत नेपथ्य, संगीत, वेशभूषा आणि प्रकाशयोजनाही त्यांनीच केले आहे. सर्वप्रथम, सगळ्याच व्यक्तिरेखांसाठी त्यांनी केल्या कलाकारांच्या निवडीबद्दल बोलावंच लागेल. कलाकारांची निवड अतिशय समर्पक आहे. भारतातून विदेशात स्थायिक झालेला हरी कानेटकर , त्याची मूळची कोकणस्थित बायको नीलिमा, त्यांना झालेली मुलगी हनी, बायकोचा भाऊ निशिगंध आपटे आणि अस्सल पुणेकरी ठसक्यासोबत मेघा फडणवीस अशा सगळ्याच व्यक्तिरेखा अप्रतिम रंगल्या आहेत.
अमेरिकेतलं घर, अमेरिकन जीवनशैली, नाटकातील पात्रांच्या अमेरिकन वेशभूषा आणि रंगभूषा असं सगळंच पुरुषोत्तम बेर्डेनी रंगमंचावर छान उभं केलं आहे. आई, वडील, मुलगी, मामा-भाची नातं अशी सगळी नाती नाटकात ठळक जाणवत राहतात.
American Album Marathi Natak Info
हरी कानेटकर हा मूळचा भारतीय अमेरिकेत स्थायिक होतो. खूप कष्ट करुन स्वत:चं साम्राज्य उभं करतो. काही काळाने कोकणातील नीलिमा आपटे या कोकणातील स्त्रीशी त्यांचं लग्न होतं. त्याही विवाहपश्चात परदेशी स्थायिक होतात. नीलिमाचा भाऊ निशीगंध अमेरिकेत हरीसोबत पार्टनरशिपमध्ये बिजनेस सुरू करतो. कालांतराने हरी आणि नीलिमा यांना मुलगी होते जिचं नाव ते ‘हनी’ ठेवतात. हनी ही या नाटकातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. हनी विदेशात जन्मून पूर्णपणे विदेशातच लहानाची मोठी झालेली. तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आई वडिलांपेक्षा अतिशय वेगळा असतो. त्यामुळे मुख्यत्वेकरून, हरीशी, अर्थात तिच्या वडिलांशी तिचे सतत खटके उडत असतात. निशिगंध आपटे म्हणजेच निशी मामा तिला जवळचा वाटत असतो. तो तिला समजून घेत असतो. हरी आणि हनी मधील खटके नेमके कशावरून उडतात? त्यांचं प्रमाण कमी होतं का? होतं तर कसं होतं? निशी मामाची तिला काही मदत होते का? हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘अमेरिकन अल्बम’ नाटकाला नक्की भेट द्या.
American Album Natak Cast
सर्वप्रथम, दीपक करंजीकर आणि अमृता पटवर्धन या दोन कलाकारांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि कौतुक! वडील आणि लेक हे नातं इतकं उत्कटपणे या दोघांनी मांडलंय की प्रेक्षक अगदी सहज या व्यक्तिरेखांशी जोडले जातात. हसता हसता कधी डोळ्यातून अश्रू तरळू लागतात हे आपल्या लक्षातदेखील येत नाही. अमेरिकेत स्थायिक भारतीय रहिवाशी दीपक करंजीकर यांनी सुंदर रेखाटला आहे. परदेशात जन्मलेली ‘हनी’ अमृता पटवर्धन या अभिनेत्रीने अप्रतिम सादर केली आहे. आधी आधी उगीच उथळ आणि बंडखोर वाटणारी हनी नाटकाच्या शेवटापर्यंत मन जिंकून टाकते. आशुतोष नेर्लेकर यांनी निशिगंध आपटे ही व्यक्तिरेखा नीटनेटकी साकारली आहे. या व्यक्तिरेखेला नाटकात विविध छटा आहेत. आनंदी, संवेदनशील, मदतशील असा निशी साकारताना गंभीर आणि दुखावलेला निशीही आशुतोष यांनी व्यवस्थित दर्शविला आहे. या नाटकाच्या निर्मात्या आणि नाटकात नलिनीची भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री देसाई व मेघा फडणवीस हे पात्र साकारणाऱ्या मोनिका जोशी यांनीही त्यांना दिलेल्या व्यक्तिरेखा नेटाने सादर केल्या आहेत.
असंख्य भावभावनांनी मन दाटून टाकणारा हा ‘अमेरिकन अल्बम’ अजिबात चुकवू नका. सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, त्यालाच साजेसं दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीची महती संपूर्ण ताकदीने नव्याने पटवून देणारं राजन मोहाडीकर यांचं या नाटकाचं उत्कृष्ट लेखन! या सगळ्या गोष्टींसाठी हे नाटक नक्की बघा!