नाटकात मुरलेला एखादा दर्दी रंगकर्मी असो वा नाटकाचा कट्टर प्रेक्षक, त्याला उभ्या आयुष्यात पुढीलपैकी एखाद्या तरी वर्गात मोडणारी सोंगं भेटतातच! पहिला वर्ग अशा लोकांचा ज्यांना नाट्यगृहात जाऊन नाटक बघायला लाज वाटते, पण तीच लोकं सिनेमागृहात तद्दन टुक्कार सिनेमे अगदी अभिमानाने बघून येतात. दुसरा वर्ग अशा लोकांचा जे भाषेचं दुखणं पुढे करतात. इतकं ‘High Level’ मराठी कोणाला येतं… मला ‘Bounce’ जाणार रे! धाडस नाही होत नाटक बघायचं, असं फुशारक्या मारत सांगणारे हे लोक घरी बसून अगदी श्रीलंकन गाण्यांनाही लाखो-करोडो ‘Views’ देतात YouTube वर! जणू काही मराठी नाही तर कुठली तरी परप्रांतीय भाषाच वापरतात नाटकात आणि तिसरी व सगळ्यात महत्वाची श्रेणी… ‘तू नाटकं केलीस, तुझ्या पोरांना नाटकामध्ये नको ढकलू रे बाबा’ असं सांगणारे महारथी! स्वतः नाटक न जगलेल्या एखाद्या इसमाने नाट्यदर्दीसमोर नाटकांना बोल लावणं किंवा नाटकांना कमी लेखणं म्हणजे त्या नाट्यप्रेमीच्या काळजाला हात घालणं… मुळात असा संवाद होणंच निषिद्ध! पण अशीच एक चर्चा… असंच एक गोड द्वंद्व जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर सध्या रंगमंचावर गाजत असलेल्या ‘स्विस कॉन्सुलेट जेनरल इन मुंबई’ आणि ‘ग्योथं-इन्स्टिट्युट मॅक्स म्युलर भवन पुणे’ यांच्या सहयोगाने ‘नाटक कंपनी’ प्रस्तुत ‘अडलंय का…?‘ या नाटकाला तुम्हाला भेट द्यावीच लागेल!
Adlay Ka…? Marathi Natak Script
अल्ब्रेक्ट हा एका जुन्या नाट्यगृहाशी सहयोगी असलेल्या कलाकारांच्या नाट्यमंडळाचा भाग असतो व त्याला मंडळाचे बजेट कापण्याचा विचार चालू असल्याची बातमी समजते. अल्ब्रेक्ट हा हाडाचा नाट्य कलाकार… त्यामुळे मंडळाचं बजेट कापलं जाणार हे कळताच हा रिपोर्ट ज्या व्यवस्थापन कंपनीने बनवला आहे त्या कंपनीच्या एका व्यक्तीला बिजनेस डीलची आशा दाखवावी आणि त्याच्याशी संवाद साधून त्याची मतं बदलावीत असा विचार तो करतो. त्यासाठी इत्यंभूत तयारीदेखील करतो. पण समोर येते एक २० वर्षांची तरुणी, जिला नाटकात काडीमात्र रस नसतो. त्याला जाणवतं की आकड्यांवर प्रेम असलेल्या व्यक्तीला त्याला साहित्याचं सौंदर्य समजवावं लागणार आहे. अर्थातच, हे काम त्याला वाटत तितकं सोपं असणार नसतं. एका कट्टर रंगकर्मीने, ‘प्रॅक्टिकल’ जगात वावरणाऱ्या आणि ९९% रोबोट बनलेल्या हाडामासाच्या मनुष्यप्राण्याच्या मनाला घातलेली सार्त हाक म्हणजे चार्ल्स लेविन्स्की लिखित शौनक चांदोरकर अनुवादित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अडलंय का…?’ हे नाटक!
वरकरणी बघता हे एक दोनपात्री संवादप्रधान नाटक असलं तरी या नाटकामध्ये सतत काहीतरी घडत राहतं. हे नाटक प्रेक्षकांशी बोलत राहतं. त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडतं. नाटक म्हणजे काय? ते का बघावं? ते कसं बघावं? नाटकावाचून एखाद्याचं काही अडतं की नाही? अडायला हवं की नको? ज्याचं अडतं तो घटक कोणता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून देणारं हुशार लेखन आणि त्याला मिळालेली दिग्दर्शनाची खुमासदार फोडणी, असं हे परिपूर्ण समीकरण तुम्ही अनुभवायलाच हवं.
Adlay Ka…? Marathi Natak Details
या नाटकाचं नेपथ्य ही या नाटकाची एक भक्कम बाजू आहे. पडदा उघडताच कुठल्याच प्रकारचं क्रिएटिव्ह सेट डिझाईन आपल्याला दिसत नाही. रंगमंचावर अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकंच नेपथ्य दिसतं. पण हळूहळू कथेच्या प्रवाहात नाटकातील पात्रच नेपथ्य सेट करताना दिसतात आणि ती प्रक्रिया बघणं ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. याचं सर्व श्रेय दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या कल्पकतेला जातं. त्यांनी अतिशय कुशलतेने हे सहजरीत्या घडवून आणलं आहे. प्रकाशयोजनेचीही नेपथ्याला सुंदर साथ मिळाली आहे.
Adlay Ka…? Marathi Natak Actors
अतुल पेठे आणि पर्ण पेठे ही बापलेकीची जोडी रंगमंचावर जी काही एकच धमाल उडवून देते त्याचा तुम्ही विचारदेखील नाही करू शकत. पर्ण पेठे या अभिनेत्रीचं विशेष कौतुक! तिने या भूमिकेच्या माध्यमातून स्वत:ला एका नवीन स्तरावर सिद्ध करून दाखवलं आहे. अतुल पेठे या नाटकांमध्ये गेली अनेक वर्षे मुरलेल्या अतिशय परिपूर्ण आणि अर्थपूर्ण कलाकारासमोर टिकावही धरणं सोपं नाही. पण, पर्णने हे आव्हान लीलया पेललं आहे. आता या नाटकाची जान आणि शान! द ग्रेट अतुल पेठे! एकच शब्द! कमाल कमाल आणि कमाल!!! स्वत:ला ‘नाटकवेडा’ म्हणवून घेणाऱ्या अतुल पेठे यांनी त्यांची नाटकांबद्दलची तळमळ आणि आस्था सर्वतोपरी मांडली आहे. अल्ब्रेक्ट हे फक्त एक निमित्त आहे. नाटकाबद्दलची ओढ व्यक्त करणारा आणि नाटकांची व्याख्या कृतीतून समजावून देणारा या ताकदीचा अभिनेता अजून कोणीच असू शकला नसता असं माझं प्रांजळ मत आहे. त्यांची संवादफेक आणि देहबोली नैसर्गिक आहेच पण त्याहीपलीकडे ज्या ऊर्जेने ते रंगमंचावर वावरतात ते नाट्यगृहात जाऊनच अनुभवण्यासारखं आहे. निपुण यांनी दोन्ही कलाकारांमधील अभिनयक्षमतेला पुरेपूर वाव मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष दिलं आहे.
नाटकवेड्या मंडळींनी नाटक पुन्हा एकदा मनसोक्त जगण्यासाठी ‘अडलंय का…?‘ या नाटकाला भेट द्यायलाच हवी आणि होय! सोबत नाटकातला ‘न’ही कळत नसलेल्या एखाद्या पामराला घेऊन जायला विसरू नका.