लग्न कि लिव्ह-इन हा वाद जुनी पिढी व सद्याची तरुणाई यांचेमध्ये कायमचं रंगताना दिसतो. या बहुचर्चित विषयाच्या वादाला एका निष्कर्षाप्रत आणणारे आणि कधी भावनिक तर कधी विनोदी पध्दतीने भाष्य करणारे नाटक म्हणजे “आमने सामने“. लग्नसंस्था, लिव्ह-इन रिलेशनशीप आणि जनरेशन गॅप हा विषय प्रेक्षकांपुढे नव्याने मांडण्याची लेखक आणि दिग्दर्शक निरज शिरवईकर यांची पध्दत खूपच वेगळी, आश्चर्यकारक आणि मनाला भावणारी आहे. विशेष म्हणजे हे नाटक फक्त रंगमंचावरील कलाकारांचेच न राहता त्यामध्ये प्रेक्षकांना सुध्दा सामावून घेण्यात लेखक- दिग्दर्शक आणि कलाकार प्रचंड यशस्वी झालेले आहेत. अनेक वर्षे संसार केलेल्या जुन्या पिढीतील जोडप्याला एकमेकांबद्दल माहित असलेल्या गोष्टी आणि नुकतेच रिलेशनशिप मध्ये आलेले व लिव्ह-इन मध्ये राहणारे कपल यांच्या वैचारिक वादाची जुगलबंदी या नाटकामध्ये पहायला मिळते. त्यामुळे दोन्ही पिढ्यांना हे नाटक पाहताना ते आपलच आहे अस वाटत, हि नाटकाची जमेची बाजू. नाटकाचा पहिला अंक संपल्यानंतर देखील, दुसरा अंक पाहताना पहिल्या अंकातील सर्व प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे ठळकपणे उभे राहतात. हि कल्पना प्रेक्षकांना कमालीची भावते. निरज शिरवईकर यांच्या दिग्दर्शकीय कल्पकतेला मनापसून दाद द्यायलाच हवी.
स्वतःच्या विचारांशी ठाम असलेली परखड समीरा हि भूमिका केतकी विलास हिने खूप छान रंगवली आहे, तर काळाबरोबर चालणारा मुलगा आणि व्यावसायिक लेखक साहिल पुरोहितच्या भूमिकेत रोहन गुजर विशेष लक्षणीय बाजी मारून जातो. मंगेश कदम यांनी प्रथम प्रत्यक्ष जीवनातील सदाबहार जोशीकाका आणि नंतर यंग कपल बरोबर विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर वर्तमान परिस्थितीची जाणीव झालेला जुन्या पिढीचा नवरा हि भूमिका विचारपूर्वक आणि समंजसपणे साकारली आहे. जोशी काकुंच्या भूमिकेत लीना भागवत यांची उत्स्फूर्त आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी नाट्यरसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यांचा रंगमंचावरील उत्स्फूर्त वावर प्रेक्षकांना अक्षरशः भारावून तर सोडतोच, शिवाय त्यांनी साधलेल्या संवादामुळे समोर बसलेल प्रेक्षकहि नकळत नाटकाचाच एक भाग होऊन जातात. नाटकाच्या अप्रतिम सादरीकरणामुळे त्यातील घर क्रमांक. २०१-२०२ आणि लिफ्टचा दरवाजाही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. त्याचे श्रेय नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांना आवर्जून द्यायला हवे. त्यांना रवी करमरकर यांच्या प्रकाश योजनेची उत्तम साथ लाभली आहे. वेशभूषाकार अमिता खोपकर आणि संगीतकार विजय गवांडे यांचा सहभाग देखील विशेष उल्लेखनीय आहे. आमने सामने हे नाटक लग्न किंवा लिव्ह-इन यापैकी कोणाचीही बाजू घेत नाही, तर त्याचा निर्णय खेळीमेळीने सर्वस्वी प्रेक्षकांवर सोपवला जातो हे विशेष. जुन्या पिढीचे विचार आणि नवीन पिढीच्या संकल्पना ह्या दोन्ही गोष्टींनी एकत्रितपणे हातात हात घालून वाटचाल केली तर आपल्या आयुष्यात छोटासा तरी बदल घडेल, याची जाणीव या नाटकामुळे होते.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
हौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल अथवा कलाकराबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.