‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक म्हटलं की कथेसोबत कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची उत्सुकता सतत शिगेला असली पाहिजे. उत्कंठावर्धक वळण, अचानक लागलेला चकवा, पात्रांच्या गतिमान हालचालींचा मागोवा ह्या सगळ्यात प्रयोगाचे ‘ते’ दोन तास कसे निघून जातात आणि आपण कसे त्या कथेचा, एक तिर्हाईत म्हणून भाग होऊन जातो ते कळतच नाही. ह्या सगळ्यात ‘शेवट’ असतो तो म्हणजे खऱ्या आरोपीचा चेहरा समोर येणे. पण आपल्याला आरोपी पहिल्या काही मिनिटांतच समजला आणि मग त्याने केलेल्या ‘परफेक्ट’ खेळीचे जर आपण साक्षीदार झालो तर एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते. संपूर्ण कथेत तो कुठे चूक करतोय आणि कुठे चलाखीने, शिताफीने पोलिसांच्या हातावर तुरी देतोय, हे पाहणे म्हणजे खरे ‘थ्रीलर’ अनुभवण्यासारखे असते. अशाच कथानकावर बेतलेले नाटक ‘अ परफेक्ट मर्डर’ पाहण्याचा योग आला आणि वर लिहील्याप्रमाणे ‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटकाचे एक वेगळे रूप अनुभवायला मिळाले.
A Perfect Murder Marathi Natak Review
निरंजन मुझुमदार, एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू,ज्याचे त्याच्या एका चाहती सोबत लग्न होते. क्रिकेटसाठी निरंजनच्या सतत बाहेर असण्याने मीराच्या जीवनात खूप एकटेपणा आलेला असतो. जो ती निरंजन समोर व्यक्त करता त्यांच्यात खटके उडत असे. ह्या सगळ्यात एकटी पडलेली मीरा एक आधार मिळण्याची मनीषा ठेवून जुना लेखक मित्र दिव्यजीत चौधरी ह्याला भेटते आणि त्याच्या प्रेमात पडते. दिव्यजीत हा सस्पेन्स थ्रीलर जॉनरचे लेखन करणारा लेखक असतो जो कामानिमित्त दिल्लीत स्थायिक असतो. इथे निरंजनकडून अपेक्षित सोबत न मिळाल्याने दिल्लीहून दर आठवड्याला येणाऱ्या जीतच्या पत्रांमध्ये मीरा स्वत:चे समाधान मानत असते. सगळी पत्रं वाचून झाल्यावर ती त्याचा मागे कोणताही पुरावा राहणार नाही ह्याची काळजीही घेते. अशातच अचानक निरंजन क्रिकेट विश्व सोडून एक साधी नोकरी करू लागतो आणि स्वत:चा वेळ मीराला देऊ लागतो. त्याच्या वागण्यातील या बदलाबद्दल मीराला संशय येतो आणि मग अचानक एक खून होतो… कोणाचा ? कसा? त्यानंतर खूनाच्या चौकशीसाठी पोलीस इन्स्पेक्टर घारगेची झालेली एंट्री आणि त्याने केलेल्या तपासामधून तो गुन्हेगारापर्यंत पोहोचतो का? निरंजन पुढे नक्की काय करतो? दिव्यजीत आणि मीराचे काय होते? ह्या परफेक्ट प्लानमधला हा सोहोनी नेमका कोण असतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नाटकात वेगवेगळ्या वळणावर मिळत जातात आणि एका ‘परफेक्ट मर्डर’ प्लॅनचे आपणही अप्रत्यक्षरीत्या साक्षीदार होतो. दुसऱ्या अंकात एका मागोमाग एक घडणाऱ्या धक्कादायक घटना नाटकाची नाट्यमयता अधिक उंचावतात. खासकरून इन्स्पेक्टर घारगेची प्रत्येक वेळी घराच्या मुख्यद्वारी होणारी एन्ट्री खास लक्षात राहते. हा ‘परफेक्ट मर्डर’ नेमका कोणी आखला होता? आणि मर्डर झाल्यावर खुनी त्यातून स्वत:ला कसा वाचवतो, सोबतच इन्स्पेक्टर घारगे स्वत:चे बुद्धिचातुर्य वापरून हे गुंतागुंतीचं कोडं सोडवू शकतो का? अशी सगळी मनोरंजक आणि उत्कंठावर्धक खेळी ह्या नाटकात अनुभवायला मिळते.
A Perfect Murder Marathi Natak Details
सर आल्फ्रेड हिचकॉक यांच्या मूळ इंग्रजी कथेचे लेखक नीरज शीरवईकर याने मराठी रुपांतर केले आहे. ह्या कथेचा मूळ गाभा परदेशातील १९७०च्या दशकातील असला तरी त्यातील ‘मराठीपण’ जपण्याचा पुरेपूर प्रयत्न नीरजने केलेला आहे. ‘सस्पेन्स थ्रीलर’मध्ये अपेक्षित प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची, त्यांची उत्कंठा वाढवण्याची, त्यांना सतत विचार करायला भाग पाडण्याची एक जबाबदारी लेखकावर असते आणि इथे तर गुन्हेगार समोर असताना चाललेल्या त्याच्या खेळीत त्याची एखादी चूक पकडण्याची मोठी जबाबदारी प्रेक्षकांवर असते. त्यामुळे समोर घडणारे नाट्य हे प्रेक्षकांच्या मनात देखील वेगवेगळी रूपं घेत राहतं आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक नाटकाशी ‘कनेक्ट’ होतात. लेखकाने कथेचे केलेले अचूक प्लॉटिंग आणि कथानकाची केलेली सुयोग्य मांडणी यामुळे हे नाटक काही मिनिटांतच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते (जे खरतर ‘सस्पेन्स थ्रीलर’मध्ये गरजेचे असते). पात्रांची रचना करताना प्रत्येकाचे वेगळेपण लेखकाने अचूक दर्शविले आहे. उदाहरणार्थ, निरंजनला मिळालेल्या शेल्फवरील ट्रॉफिज त्याच्या क्रिक्रेट पार्श्वभूमीची आठवण करून देत राहते. मनात काहीतरी दडवलेल्या आणि निरंजनकडून असलेल्या आपल्या इच्छा दडपून टाकलेल्या मीराच्या वागण्यातील संसारातून आलेले एक तुटलेपण आणि तिची होणारी घुसमट सतत जाणवत राहते. जीतमधील एका सर्जनशील लेखकाची आणि एका मित्राची प्रतिमा लक्षात राहते. इन्स्पेक्टर घारगे यांच्या तोंडी असलेली ग्रामीण भाषा त्यांच्या व्यक्तीरेखेला एक वेगळेपण प्राप्त करून देते.
A Perfect Murder Marathi Natak Actors
निरंजनच्या भूमिकेतील अनिकेत विश्वासराव यांना या नाटकामुळे एका वेगळ्याच रुपात पाहण्याची संधी मिळाली. सस्पेन्स थ्रिलरला अपेक्षित व्यक्तिरेखेचा बाज त्यांनी पुरेपूर सांभाळला आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेला असलेले विविध पैलू दाखविताना त्यांनी योग्य देहबोलीचा वापर केला आहे. सतीश राजवाडे यांनी साकारलेला इन्स्पेक्टर घागरे अतिशय सुंदर होता. त्याच्या विविध लकबी, त्याच्या बोलण्यातील-भाषेतील वेगळेपण आणि ह्या सगळ्याचा त्याच्या व्यक्तिरेखेवर होणारा परिणाम, यामुळे हे पात्र दुसऱ्या अंकात लक्ष वेधून जाते. सतीश राजवाडे यांनी तब्बल १९ वर्षानी दमदार कमबॅक करून त्यांच्या ह्या व्यक्तिरेखेने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रिया मराठे हिने मीरामधील घुसमट, तिच्या वाट्याला आलेले एकटेपण आणि त्यातून मोकळे होण्यासाठी ‘जीत’च्या रुपात तिला मिळालेला मार्ग हे सर्व सुंदरपणे, कुठेही भावनांचा अतिरेक न होऊ देता साकारले आहे. लेखक दिव्यजीत चौधरी याची भूमिका साकारलेला श्रीकांत प्रभाकर याने लेखकाच्या व्यक्तीरेखेला अपेक्षित संयम आणि एका मित्रामधील असलेला समजूतदारपणा योग्यपणे साकारला. तसेच, सस्पेन्स थ्रीलर लिहिणाऱ्या लेखकाच्या मनोवस्थेचा पदर त्याने दुसऱ्या अंकात अतिशय सुंदर पद्धतीने पकडला. सोहोनीच्या भूमिकेतील सुबोध पंडे यांनी त्यांच्या व्यक्तीरेखेला असलेले एक गूढ वलय अधोरेखित केले. अतिशय शिताफीने वावरणारा पण पकडले गेल्यावर गोंधळलेला सोहोनी त्यांनी योग्य उभा केला.
A Perfect Murder Marathi Natak Technical Details
ह्या नाटकाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नेपथ्य-प्रकाश-संगीत ह्या त्रयीवर केलेली मेहनत. नेपथ्यमांडणी स्वत: लेखकाची असल्यामुळे प्रत्येक कोपऱ्याचा अतिशय सुयोग्य पद्धतीने विचार केला आहे. पात्रांच्या हालचालींसाठी अपेक्षित अवकाश त्यामुळे प्राप्त झाला आहे. फोटोफ्रेम, भिंतीवरील बॅट, ड्रिंक सेक्शन, शिसवी लाकूडकाम, जुन्या काळातील लाईट स्विचेस, दरवाज्यांची आणि फ्रेंच विंडोजची कल्पना सगळं काही कथेला आणि एकंदर प्रसंगाना अनुरूप होते; जे स्थळ-काळाचे चित्रण करत होते. शीतल तळपदे यांनीकेलेली प्रकाशयोजनाप्रसंगांचे महत्त्व वाढवत होती. फ्रेंच विंडोजवळचा निळा-जांभळा रंग, रात्रीच्या अंधारात कोनाड्यातून दिसणारा उजेड त्यांनी प्रसंगाना अधोरेखित करण्यासाठी उत्तम वापरला. मला खास आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो ह्या नाटकाच्या पार्श्वसंगीताचा. नाटकात उत्तम लेखन आणि अभिनयासोबत ‘पार्श्वसंगीत’ हे सुद्धा खूप महत्त्वाचा भाग असते आणि त्यामुळेच नाटकाच्या प्रयोगाची उंची खूप वाढते. अजित परब यांनी दिलेले हे संगीत नाटकातील ‘नाट्य’ जपताना खूप महत्त्वाचे ठरते. खासकरून क्षितीज पटवर्धन लिखित आणि मुग्धा कर्हाडे हिने गायलेले ‘सावल्या’ हे गाणे मनात घर करून राहते. लास्ट बट नॉट द लिस्ट… दिग्दर्शक विजय केंकरे. त्यांनी आजवर तब्बल ८४-८५ पेक्षा जास्त नाटकं दिग्दर्शित केली आहेत त्यामुळे त्यांचा दिग्दर्शनातील हातखंडा आणि त्यांची नाटक उभं करण्याची हातोटी ह्याबद्दल काहीच शंका नाही. ह्या नाटकात त्यांनी कथा-अभिनय-नेपथ्य-प्रकाश-संगीत-वेशभूषा ह्या सगळ्याचा एका सुरेख वस्तुपाठ घातला आहे, जो नक्कीच दर्शनीय आहे. बदामराजा निर्मिती संस्थेतर्फे हे नाटक सादर करणाऱ्या निर्मात्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
खूप कमी सस्पेन्स नाटकं मनाचा ठाव घेतात, खूप कमी नाटकं आपल्याला स्वत:मध्ये ओढून घेतात आणि त्याबद्दल विचार करायला भाग पाडतात, अनेकदा आपणही नकळत त्या नाट्यातील ‘सस्पेन्स’ शोधण्यात हरवून जातो. तसेच काहीसे हे नाटक पाहताना, त्याचा अप्रतिम दृक-श्राव्य अनुभव घेताना वाटत होते. ‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटकाच्या पठडीत स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यात हे नाटक यशस्वी होते आणि म्हणूनच ते ‘परफेक्ट’ वाटते. त्यामुळे ह्या परफेक्ट नाटकाचा प्रयोग आवर्जून बघण्यासारखा आहे. संपूर्ण टीमला पुढील सर्व प्रयोगांसाठी खूप शुभेच्छा!
A Perfect Murder Upcoming Shows
नाटक: अ परफेक्ट मर्डर
लेखक/नेपथ्य: नीरज शिरवईकर
दिग्दर्शक: विजय केंकरे
प्रकाशयोजना: शीतल तळपदे
संगीत: अजित परब
निर्मिती संस्था: बदामराजा प्रोडक्शन
सहनिर्माते: BookMyShow
कलाकार: अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, श्रीकांत प्रभाकर, सुबोध पंडे आणि सतीश राजवाडे.
3 Comments
Pingback: गिरीश ओक यांचं नवीन नाटक — 38, कृष्ण विला • रंगभूमी.com
Pingback: खरं खरं सांग! नाटकाचा खरा खुरा शुभारंभ • रंगभूमी.com
प्रयोग खूप छान होता. रूपांतर, संवाद व सर्वांचा अभिनय अत्यंत समर्पक व नेटका होता. त्यातला सस्पेन्स शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा व उत्कंठा वाढवत नेणारा आहे. तशी पिरीयड कथा असूनही कुठेही काहीही खटकले नाही. विशेष उल्लेख म्हणजे पुष्कर श्रोत्री इंस्पेक्टरचे बेअरिंग फारच उत्तम जमले आहे. एका चांगल्या अनुभवाबद्दल आभारी आहे.