रंगभूमी म्हटलं की नाटक हे त्याचं हृदय आणि नाटकांची समीक्षणे ही त्याची स्पंदने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. होय! बरोब्बर ओळखलंत. आम्ही तुमच्यासाठी नाटकाची समीक्षणे घेऊन हजर झालो आहोत.
नाटक बघून त्या नाटकाचा भाव समजून स्वत:ला उमगेलला अर्थ, जाणवलेल्या त्रुटी तरुण पिढीच्या माध्यमातून नाट्यसृष्टीपर्यंत पोहोचवायचा आमचा मानस होता आणि आज आम्ही असाच एक युवा लेखक तुमच्या समोर सादर करत आहोत! या लेखकाचं नाव आहे अभिषेक अरविंद महाडिक. अभिषेक, तुझं रंगभूमीच्या टीममध्ये मन:पूर्वक स्वागत!
अभिषेकने श्री. भगुभाई मफतलाल पॉलीटेकनिक मध्ये Civil Engineering चा डिप्लोमा केल्यानंतर St. John College of Engineering and Technology मधून Graduation केले. साधारण अडीच वर्षांच्या Work Experience मिळवल्यानंतर सध्या तो VJTI मधून मास्टर्सचा अभ्यास करत आहे.
पण मग इतका दमदार शैक्षणिक व व्यावसायिक पोर्टफोलिओ आणि नाट्यक्षेत्र हे समीकरण कसं जुळलं?
ते असं कि २०१५ मध्ये श्री. सुहास कामत यांच्या कार्यशाळांमधून अभिषेकने रंगभूमीच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. याच प्रवासात पुढे त्याची गाठ पडली ती थेट मराठी रंगभूमीशी! हळूहळू नाट्यजगताशी समरस होत त्याने मराठी नाटकं आणि इतर साहित्याबद्दल लिहायला सुरुवात केली. अशा या नाट्यवेड्याला त्याच्या नाट्यवेडाबद्दल विचारताच तो सांगतो…
मी कधीच व्यावसायिक/प्रायोगिक नाटकात काम केलं नाही,
कधीच कोणतही नाटक आजवर लिहून पूर्ण केलं नाही,
कधीच कोणत्या लेखकाला नाटक लिहीताना प्रत्यक्ष पाहिलं नाही,
कधीच नाटकाचं नेपथ्य रंगवलं नाही,
कधीच प्रकाशयोजनेची सूत्र हाताळली नाहीत,
कधीच पार्श्वसंगीत रेकॉर्ड होताना पाहिलं नाही,
कधीच पार्श्वसंगीत वापरताना जवळ बसलो नाही,
कधीच रंगभूषाकार नटाची रंगभूषा करताना पाहिलं नाही,
कधीच वेशभूषाकार म्हणून नाटकासाठी खरेदी केली नाही,
कधीच पहिल्या अंकाआधी येऊन पडद्याला नमस्कार केला नाही,
कधीच रंगमंचावर नारळ फोडताना पाहिला नाही,
कधीच नेपथ्य लावताना पाहिले नाही,
कधीच दिग्दर्शकाला नाटक घडवताना पाहिले नाही,
कधीच ब्लॅकआऊटमध्ये अंधारात मंचावरून विंगेत आलो नाही,
कधीच त्या अंधारात नेपथ्यबदल केला नाही,
कधीच प्रयोग संपल्यावर कपडेपटात राहून कपडे लावले नाहीत,
कधीच दोन अंकामध्ये बॅकस्टेजला बसून चहा प्यायलो नाही,
कधीच तिकीट बारीवर बसून रांगच्या रांग पाहत तिकीटे फाडली नाहीत,
कधीच नाटक सुरू होण्यापूर्वी पडद्याआडून प्रेक्षक पाहिले नाहीत,
कधीच प्रयोग झाल्यावर नुसतं उभं राहून प्रतिक्रिया ऐकल्या नाहीत,
कधीच लोकांच्या घोळक्यात सेल्फी दिले नाहीत,
कधीच तिकिटामागे आपुलकीची स्वाक्षरी दिली नाही,
कधीच तिकिट फाडायला गेटवर उभा राहिलो नाही,
होय मात्र मी
‘साखर खालेल्ला माणूस’ पाहताना तुफान हसलोय,
‘युगान्त’च्या शेवटच्या प्रयोगाला भावनिक होऊन रडलोय,
‘हॅम्लेट’ पाहताना भारावून गेलोय,
‘तीन पायांची शर्यत’ला उत्साहाने जागीच थिजलोय,
‘अ परफेक्ट मर्डर’ पाहताना क्षणोक्षणी गुंतलोय,
‘झुंड’ पाहताना उफाळून आलोय,
‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ पाहताना आई आठवली आहे,
‘कोडमंत्र’ पाहताना अभिमान वाटलाय,
‘वाडा चिरेबंदी’ पाहताना नाटकात कुटुंब शोधलय,
लाल्याच्या वाक्याला ‘अश्रूंची झाली फुले’मध्ये टाळ्या वाजवल्या आहेत,
‘अनन्या’ला बघून स्वतःमध्ये धीर एकवटलाय,
‘सोयरे सकळ’ बघून धन्य झालोय,
‘देवबाभळी’ने काळजात हात घातलाय,
कधीकधी
हळूच बॅकस्टेजला जाताना नेपथ्याला स्पर्श केलाय,
नाटक संपल्यावर घाईने बॅकस्टेजला येऊन कलाकारांना भेटलोय,
त्यांच्याशी हसत खेळत तर कधी भारावून भावनिक होऊन बोललोय,
लाजत बुजत त्यांची सही घेतली आहे,
उत्साहाने पुढे येऊन एक सेल्फी काढला आहे,
नाटकाबद्दल एखादा मित्रमैत्रीण भेटल्यावर मनमोकळेपणे बोललोय….
किती सांगू ? काय काय सांगू ?
नाटक न करताच अनेक वर्ष नाटक जगत आलोय.
कालही, आजही आणि ह्यापुढेही नाटकच जगणार आहे.
— अभिषेक महाडिक
तर अशा या नाट्यप्रेमी युवा लेखकाने लिहिलेली वेगवेगळ्या जुन्या-नव्या नाटकांची समीक्षणे तुम्हाला लवकरच वाचायला मिळणार आहेत. आम्ही आशा व्यक्त करतो की तुम्ही आमच्या या नव्या सदराला आणि नव्या सदस्याला भरभरून प्रेम देत राहाल.
तुम्हालाही जर रंगभूमी.com वर रंगभूमीशी निगडित असे काही लेख आमच्याद्वारे प्रसिद्ध करायचे असतील तर कृपया आमच्याशी [email protected] या ई-मेल ID वर संपर्क साधा.
1 Comment
Pingback: माझ्या आठवणीतील नाटक — वाडा चिरेबंदी • रंगभूमी.com