मनोरंजन क्षेत्रात प्रतिभावान कलाकार म्हणून ओळख मिळवण्यासाठी अनेक पैलूंचा अभ्यास करणे गरजेचे असते. अशाच एका अभिनेत्री श्रद्धा हांडेने अलबत्या गलबत्या या नाटकामध्ये कन्याराजेची मुख्य भूमिका साकारत असताना थँक्स डियर नाटकाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
श्रध्दाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती
टीव्हीवरील कलाकारांना पाहून अभिनय क्षेत्रात जाण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु सुरुवातीला श्रद्धाने शिक्षणाला प्राधान्य दिले. उत्तमगुणांनी बारावी पास होऊन बिर्ला कॉलेजमध्ये मॅनेजमेंट क्षेत्रात पदवीधर झाली. श्रद्धा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे अनेक नोकरीच्या संधी चालून येत होत्या परंतु अभिनय क्षेत्रातील आवड कायम ठेवत मंथन नाट्यशाळेतून प्रशिक्षण घेत अभिनयाचा प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या काळात कल्याणला राहत असताना कॉलेज आणि नाटकाच्या प्रशिक्षणात तीन वर्ष प्रवास केला. दरम्यान श्रद्धाला कॉलेजचा पाठिंबा लाभल्यामुळे पथनाट्य, लघुपट या माध्यमांचा अनुभव घेतला.
श्रद्धाने यापूर्वी व्यवसायिक रंगभूमीवर बॉम्बे १७ मध्ये लज्जो तर शोधा अकबर या नाटकात अनारकली ची भूमिका साकारली. फक्त रंगभूमीवर नव्हे तर टेलिव्हिजनवरील मालिकांमधूनही ती झळकली. श्रध्दासाठी अविस्मणीय क्षण म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी सह्याद्रीवरील बंधन या मालिकेत संधी मिळाली. आजपर्यंत वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट मिळाली असं श्रद्धा सांगते. तसेच सचिन पिळगावकर यांच्या प्रसिद्ध तिरुमाला तेलच्या जाहिरातीतून श्रध्दा प्रेक्षकांच्या घराघरात नव्याने दिसू लागली. श्रद्धाने यापुढील काळात प्रसाद ओक आणि सुबोध भावे या कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली आहे.
अभिनेत्री ते निर्माती
अल्बत्या गलबत्या नाटकाने श्रध्दाची वेगळी ओळख निर्माण केली. २०१९ साली झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रेक्षकांची ही पोचपावती श्रध्दासाठी प्रेरणादायी ठरली.
एखाद्या क्षेत्रात कार्यरत असताना त्या क्षेत्राचे सर्व पैलू पडताळून पाहण्याची इच्छा होती यामुळे अभिनेत्री म्हणून काम करत असताना निर्मिती क्षेत्राची आवड निर्माण झाली. सुनील पाणकर यांच्या प्रोत्साहनामुळे निर्माती म्हणून पहिले पाऊल टाकले. निर्मिती क्षेत्र श्रद्धासाठी नवीन असल्यामुळे नाटकाचे भविष्य जाणून घेणे तसेच संगीत, नेपथ्य आणि संहिता या विविध अंगांवर लक्ष देणे आणि आर्थिक व्यवहार सांभाळणे अशा अनेक नवीन कामांचा अनुभव ती घेत आहे. थँक्स डियर या नाटकात निर्मातीसह वेशभूषेची बाजूही श्रद्धा सांभाळत आहे.
निर्माती किंवा कलाकार म्हणून काम करत असताना प्रेक्षकांमार्फत ट्रोल केले जाते परंतु या गोष्टींना प्राधान्य न देता कामावर लक्ष केंद्रित करून प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत श्रध्दा निवडते. तसेच पालकांनी मुलांना प्रोत्साहन देत व योग्य मार्गदर्शन करत स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे अशी आशा श्रद्धाने व्यक्त केली आहे.
अभिनेत्री ते निर्माती या प्रवासाबद्दल सांगताना श्रद्धा म्हणते “नाट्यक्षेत्रातील हा प्रवास मला नवीन ऊर्जा देतो. अलबत्या गलबत्याच्या प्रेक्षक बालमित्रांच्या सदिच्छामुळे मी थँक्स डियर नाटकाची निर्माती होऊ शकले. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे सहज शक्य होत नाही. कुठलेही पाठबळ पाठीशी नसताना सुरु केलेला अभिनेत्री होण्याचा प्रवास आज मला निर्माती म्हणून या नाटकाचा भाग होण्याची संधी देतो. क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आपणच आपल्या स्वप्नांना पंख दिले पाहिजे. कामाची आवड असल्यास स्वतःवर विश्वास ठेवून कष्टाने काम पूर्ण केले पाहिजे. नवीन गोष्टी शिकत त्यात बदल करत योग्य दिशेने केलेली मेहनत कायम उपयोगी ठरते. यशस्वी होण्यासाठी संयम बाळगणे गरजेचे आहे.
श्रध्दा तिच्या सकारात्मक विचारांच्या बळावर आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्वामुळे उत्तम कलाकार आणि निर्माती होऊ शकली. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
श्रध्दा हांडेला रंगभूमी.com कडून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1 Comment
Shraddha, my most favourite student. As I observed, u r very very hardworking person. u hv perseverance and ability to achieve your goals. Your hardwork paid u. ur honesty helped u to reach at the pinnacle and lastly ur sincerity will always put u on the top.
God Bless You Shraddha. May God fulfill all your dreams and desires.
urs loving ❤ teacher.
Pramod Joshi.