मनोरंजन क्षेत्रात कलाकारांची फळी येते आणि जाते. वर्षानुवर्षे चुकत-शिकत कलाकारांच्या फळ्या तयार होतात. एक कलाकार म्हणून अस्तित्व निर्माण करताना वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करणारी शैली कलाकाराच्या वैयक्तिक जीवनातही अंगवळणी पडते. अशीच एक नाट्यसृष्टी, सिनेसृष्टी, मालिका आणि वेब सिरीजमधून उभारी घेणारी तरुणी चंद्रलेखा जोशी. हल्लीच पहिला भाग पूर्णत्वास आलेली ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत पी.एस.आय. जमदाडेची भूमिका साकारणारी तसेच मल्हार आणि दिशा निर्मित ‘काळी राणी’ या व्यावसायिक नाटकात महत्वाचे पात्र साकारणारी चंद्रलेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
चंद्रलेखा मूळची डोंबिवली विभागातील आहे. बाबा (विवेक जोशी) नाट्य क्षेत्रात असल्यामुळे नाटकाची ओढ होती. तसेच लहान वयात अनेक नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात राजाराम राजेंच्या भूमिकेचा अनुभव मिळाला आणि ‘मत्स्यगंधा’ नाटकात आंबेच्या भूमिकेने नवनवीन अनुभव दिले. त्यापुढील काळात आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधून नाट्यविश्व अन्वेषण करणे सुरू केले. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत रंगभूमी, कला जीवनशैलीचा मुख्य भाग झाल्याचेही चंद्रलेखा सांगते. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान विभागातून केले, नंतर बीएससी करण्याचा विचार होता, त्यासोबतच अभिनयाची आवड जपायची होती पण प्राधान्य अभिनय क्षेत्र असल्यामुळे पुण्यातील ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. यामुळे, चुकण्याची आणि चुकून शिकण्याची संधी मिळाली, असे चंद्रलेखाला वाटते. शेवटच्या वर्षी एन अरब वोमेंस स्पीकस् हा लेख उत्तमरित्या सादर केल्याबद्दल ‘सतीश आळेकर ‘ यांची मिळालेली शाबासकीची थाप हा माझ्य आयुष्यातील उत्तम क्षण होता, असे चंद्रलेखाने सांगितले. अभिनयातील क्षमतेची परीक्षा देत २०१५ ला ती उत्तीर्ण झाली.
टेलिव्हिजनवर पदार्पण
टेलिव्हिजनवर काम करण्याची पायरी प्रत्येक उत्तम कलाकाराच्या वाट्याला येते. मराठी सृष्टीत ओळख निर्माण करण्यासाठी, इतरांच्या ओळखीवर काम न मिळवता स्वतः ऑडिशन्स देत स्वतःसाठी संधी मिळवत राहिली. या संधींच्या शोधत असताना रंगीला रायबा या चित्रपटात बहीणीची भूमिका मिळाली. ‘हॉस्टेल डेज’ चित्रपटात मैत्रिणीची भूमिका साकारली. ‘ती फुलराणी’ या मालिकेत नकारात्मक पात्र साकारले. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतही छोटी भूमिका साकारली. अशा अनेक निरनिराळ्या भूमिका करत पी.एस.आय. जमदाडेची भूमिका चंद्रलेखासाठी अभिनय क्षेत्रातील मोठे वळण ठरले. अभिनय क्षेत्रात काम करत २०१६ सालात दिग्दर्शक केदार वैद्य यांच्यासह सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.
एका वेळेची वेशभूषाकार
ललित कला केंद्रात दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार एखादा तांत्रिक विभाग निवडणे अनिवार्य असल्यामुळे चंद्रलेखाने दुसऱ्या वर्षी वेशभूषा विभागात काम केले. वेशभूषेतील उत्तम कामगिरीमुळे व्यावसायिक नाटकांसाठी वेशभूषाकार म्हणून काम करण्याची संधी मिळू लागली. चिन्मय केळकर यांचे ‘मनस्वना भुज’ या नाटकासाठी पहिल्यांदा वेशभूषा विभाग सांभाळण्याची जबाबदारी घेतली. गीता गोडबोले यांच्याकडे काही काळ वेशभूषेत इंटर्न म्हणून काम केले. त्यांच्यामार्गे झी मीडियाचे इव्हेंट आणि ‘ढाबळ’ या मालिकेसाठी वेशभूषा डिझाईन केली. त्या नंतरच्या काळात तीन चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून कामाचा अनुभव मिळाला. हल्लीच प्रदर्शित होत असलेल्या ‘तिचं शहर होण’ या चित्रपटासाठी वेशभूषा करण्याची मोठी संधी मिळाली.
अपघातातून वेगळे अनुभव
कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना मानसिक आणि आर्थिक तणाव निर्माण होत असताना संयम बाळगणेगरजेचे असते. छोट्यामोठया वळणांना सामोरे जाताना काही वर्षांपूर्वी चंद्रलेखाचा मोठा अपघात झाला. अपघातातील शारीरिक इजांमुळे सहा महिन्याच्या काळात चंद्रलेखाने पडद्यावर काम न करता पडद्यामागे काम करण्याचे ठरवले. वेशभूषा आणि सहायक दिग्दर्शक म्हणून मालिकेत काम केले. घडलेल्या घटनेतून एक दिग्दर्शक म्हणून कामाचा अनुभव अभिनय क्षेत्रात उपयोगी ठरतो असा सकारात्मक विचाराने चंद्रलेखा पडद्यावर झळकत आहे.
काळीराणी नाटकातील संधी
व्यावसायिक रंगभूीवरील दिग्दर्शक विजय केंकरे यांचे सुरू असणारे नाटक काळीराणी. या नाटकात चंद्रलेखा एक महत्वाचे पात्र साकारत आहे. या नाटकासंदर्भातील अनुभव सांगताना चंद्रलेखा म्हणते, ” या नाटकाच्या निमित्ताने विजय सरांसोबत काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. विजय केंकरे यांनी प्रत्येकांची मते समजून घेत सर्वांना आपलंसं केले आहे. गिरीश ओक यांच्यासोबत पहिल्यांदा रंगभूमीवर काम करण्याचा उत्तम अनुभव मिळतोय. गिरीश सरही कामातील बारकावे समजावून सांगतात. मनवा नाईकसोबत सहअभिनेत्री म्हणून पहिल्यांदा काम करताना तिचं मार्गदर्शन खुप मोलाचं आहे. हरीश दुधाडे सोबत मालिकेत काम करत आहे परंतु रंगभूमीवर काम करताना भरपूर आनंद होतो. काळीराणी नाटकाची टीम हे माझं कुटुंब आहे. काळीराणी हे नाटक सिनेमॅटिक, सस्पेन्स-थ्रिलर असल्यामुळे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनचं या नाटकाचे ५० प्रयोग खुप कमी दिवसात पूर्ण होत आहेत. अनेक प्रेक्षकांनी काळीराणी नाटक पुन्हा नव्याने पाहण्याची इच्छा दर्शवली तसेच सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनीही प्रेक्षक म्हणून नाटकाचे भरभरून कौतुक केले. नाटकातील ट्विस्ट अँड टर्न प्रेक्षकांना उलगडत असताना त्यांचे मनोरंजन करत होते अशा प्रेक्षक प्रतिक्रिया मिळाल्या. असेच प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा माझ्या पाठीशी राहो हिच इच्छा आहे.”
चंद्रलेखा पुढील काळात ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. तसेच, वेब सिरीजमधून झळकणार आहे. आपल्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाबद्दल चंद्रलेखा म्हणते, “एक अभिनेत्री म्हणून आयुष्यात कधीच शिकण्याची स्थिरता मिळणारी नाही अशी लहानणापासूनच शिकवण देण्यात आली. अभिनय कधीच संपूर्ण शिकता येत नाही, सतत शिकत राहण्याची तयारी ठेवावी लागते आणि मुख्यतः संयम बाळगणे गरजेचे असते या विचारावर माझी वाटचाल सुरू आहे.”
चंद्रलेखा जोशीला पुढील वाटचालीसाठी रंगभूमी.com कडून मनःपूर्वक शुभेच्छा.