आधी वाचा → वाड्यात जोडलेली माणसे — प्रस्तावना
वहिनी… म्हणजे घरात आईनंतर महत्त्वाची जबाबदारी पेलणारी स्त्री. धरणगावकर देशपांडे यांच्या घरातही अशीच एक वहिनी आहे. थोरला मुलगा भास्कर याची पत्नी. घरातील कर्ते म्हणजेच भास्करचे वडील तात्याजी यांच्या निधनानंतर घराची मुख्य जबाबदारी ह्या दोघांवरच आली. घरातील वडील मंडळीं बनून सर्व कार्ये यांच्याच माथ्यावर आली. ‘वाडा चिरेबंदी’ मध्ये जेव्हा प्रथम मी वहिनीला पाहिलं तेव्हा असं वाटलं कि ह्या बाईच्या हातात आता सत्ता आली आहे आणि त्यामुळे ही आता वाड्यावर हुकुमत सांगेल, आता आपणच इथे मोठे आहोत असा तोरा मिरवेल वगैरे वगैरे. किंबहुना जेव्हा सुधीर तात्याजीच्या मृत्यूपश्चात पाचव्या दिवशी वाड्यात आला तेव्हा त्यांची बहिण प्रभा हिच्या बोलण्यातून वहिनी विषयी तोच सूर जाणवला. आधी ओसरीपर्यंत जिची मजल नव्हती तिचे हुकुम आता वाड्याबाहेर ऐकू येतात, तात्याजी गेल्यावर काहीच दिवसांत वहिनीच्या कमरेला घराच्या चाव्या आल्या इत्यादी अनेक गोष्टी प्रभा सुधीरला ज्या पद्धतीने सांगते; त्यातून मात्र हेच प्रकर्षाने जाणवले कि वहिनीला मोठेपणा वगैरे मिरवायचा असावा. कारण तिच्या चंदुकाकाशी होणाऱ्या संवादातून किंवा अंजलीला स्वयंपाकात येण्यासाठी टाळाटाळ केल्याचे पाहून तिच्या मनात वाड्यात आपले वर्चस्व प्रस्थापित व्हावे, ही भावना दिसत होती.
पण जसजसा अधिकचा काळ माझा वाड्याशी संबंध आला त्यातून ह्या वहिनीच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये उलगडत गेली. ही वहिनी बोलते पण तिच्या मनात काही वाईट नसते. अंजली काकु कोब्रा म्हणून देशस्थाचा कारभार तिला जमणार नाही, जे जरी ती थोड्या कुत्सित स्वरात बोलत असली; किंवा चंदुकाकाला हक्काने कामाला लावत असली तरी ती दुष्ट नाहीये. तात्याजी नंतर आता आम्ही मोठे आहोत, आम्हाला मान द्या, एवढीच तिची माफक अपेक्षा आहे. इतकी वर्ष ज्या बाईची आपली मुले, आपला नवरा ह्या पलीकडे मजल गेलेली नसते; त्या स्त्रीला आयुष्यात एखाद्या वळणावर आलेल्या जबाबदारीचे अप्रूपच वाटणार, नाही का ? मग मोठ्यासारखे ती सुद्धा त्या जबाबदारीला महत्त्व देउन तिची वागणूक तसूभर तरी बदलेलच. अंजलीला कोकणस्थाची मुलगी म्हणून कुत्सितपणे हिणवले जाताना हीच वहिनी सारवासारव करून परिस्थिती निभावून नेत असे. ‘वाडा चिरेबंदी’ मध्ये वहिनीची अंजली सोबत वैचारिक सोबत नसली तरी ‘मग्न तळ्याकाठी’ मध्ये मात्र दोघी जावा जावा मनाने काहीश्या एकत्र आल्या. कारण मधे बराच काळ निघून गेला. तात्याजीच्या मृत्यू नंतर १० वर्षानी रंजू आणि परागचे एकाच मांडवात लग्न होणार असते, ह्याचा आनंद तिला होत असतो.
‘वाडा चिरेबंदी’ मध्ये एका प्रसंगात देशपांडे घराचे पिढीजात दागिने ह्या वहिनीने अंगावर परिधान केले आहेत. हा प्रसंग खरच अप्रतिम होता. कारण त्यावेळी वहिनीचे रूप पाहून असे वाटले कि धरणगावकर देशपांडेंच्या घरातील सगळ्या बायका तिच्या आजूबाजूला वावरत आहेत. वहिनीच्या बाबतीत काही गोष्टी मला प्रामुख्याने जाणवल्या, त्या म्हणजे तिला एवढी वर्षे वाड्यासाठी झिजल्यानंतर आता किमान तात्याजीच्या पश्चात तरी घरातील मोठी म्हणून मान हवाय; घराची जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य तिला जिद्दीने लोकांना दाखवायचे आहे, घरात दुखवटा असतानाही ती आपल्या सासूबाईकडे नेमाने लक्ष देते आहे, आपल्या मुलीच्या म्हणजेच रंजुच्या भविष्याची तिला चिंता आहे, परागच्या आततायी वागण्याचे तिला दडपण आहे, इत्यादी अनेक गोष्टी तिच्या डोक्यात आहेत. आणि तरीही ती आनंदाने वाड्यात आपल्या माणसात राहतेय, अगदी मिळून मिसळून वागतेय. घरात जबाबदारीने वावरतेय. तिच्या बोलण्यातील गंमत म्हणजे तिचे काही इंग्रजी शब्द, जसे कि – ‘इतका कसला नर्वसनेसपणा’, ‘हॅन्डीकॅप ऐवजी हॅन्डीक्राफ्ट’, ‘गावात मेकॅनिकल तरी आहे का ?’, ‘आमचा आपला बॅकवर्डनेसपणा’ इत्यादी. सुधीर आणि अंजलीच्या शहरी जीवनाशी मिळतीजुळती आपलीही राहणी असावी, असेच असावे बहुधा तिच्या मनात. वाडा भाग १ मध्ये खंबीरपणे कुटुंबाची जबाबदारी उचलणारी वहिनी मग्न मध्ये मात्र काळाच्या फरकाने काहीशी थकलेली वाटली. तिच्या उठण्या-बसण्यात एक प्रकारचा फरक जाणवला; जो वयोमानाप्रमाणे येणे स्वाभाविकच होते. वाडा ते मग्नचा प्रवास पाहताना मी तिच्याकडून ‘जबाबदारीने कसे वागायचे’ हे शिकत गेलो.
आपल्या कुटुंबाला आधार कसा द्यायचा, कठीण प्रसंगी आपल्या घरातील एखाद्याला साथ कशी द्यायची, कुटुंबाचा डोलारा कसा सांभाळायचा हे सर्व काही तिच्याचकडून शिकत गेलो. भास्कर आणि सुधीर ह्या दोन भावांच्या भांडणात फक्त ‘जाऊ द्या ना भावजी’ एवढे वहिनीने म्हणताच सुधीर का वरमतो ? हे त्या वहिनीला पाहिल्यावरच आणि तिची व्यक्तीरेखा जवळून अनुभवल्यावरच समजते. वरवर आधी कुचकी वाटणारी ही बाई हळूहळू आपली होते, आपल्या घरातली भासू लागते आणि म्हणूनच वाडा ते मग्न ह्या फक्त ५-६ तासांच्या नाटकाच्या पण खरतर ८-१० वर्षांच्या प्रवासात ही ‘वहिनी’ मला माझी वाटू लागली. युगान्तमध्ये कळते कि भास्करच्या आणि आजीच्या मृत्यूनंतर वहिनी रंजूकडे राहायला गेलेली असते त्यामुळे ती आजही तिथेच असेल, असे मला वाटते. धरणगावकर देशपांडे यांच्या वाड्यात अनेक संकटाना तोंड देउन, सुख-दु:खाचे प्रसंग पाहून तरीही आपल्या कुटुंबाला बांधून ठेवणारी ही वहिनी एक वेगळीच बाई आहे. जिला वाडा चिरेबंदीमध्ये प्रथमदर्शनी पाहताच ती जशी वाटते; तशी ती शेवटी वाटत नाही. कारण तिचा स्वभाव समजून घ्यायला आपल्याला वाड्यात रुळावे लागते, तिच्यासोबत ओसरीवर बसावे लागते, माजघरात तिच्या बाजूला बसून भाजी निवडताना चार गोष्टी ऐकाव्या लागतात. आजीच्या किंवा दादीबाईच्या वयाची झाली असावी वहिनी आता; रंजूकडे राहतेय पण नक्कीच आजही तिच्या मनात वाड्याविषयी एक कृतज्ञता असेल. आणि आजही तिचा जीव वाड्यात गुंतला असेल… मरेस्तोवर असेल…नक्कीच!
पुढे वाचा → वाड्यात जोडलेली माणसे भाग २ – भावना पोहचत नसल्या तरी मनात प्रेम राहतेच ना!
1 Comment
“वहिनी” फारच अभ्यासपूर्ण लेखन!