कोविडच्या पार्श्वभूमीवर रंगभूमी दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळासाठी स्थगित झाली आणि कट्टर नाट्यरसिक नवनवीन नाट्यानुभव अनुभवण्यासाठी आसुसले. पण आज चित्र वेगळं आहे. आज रंगभूमी पुन्हा एकदा नवा श्वास घेऊ लागली आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतीक्षेस न्याय देतील अशा सुखद आणि दर्जेदार नाट्यकलाकृतीही जन्मास येत आहेत.
रंगभूमी.com ची संपूर्ण टीमदेखील सर्व नाटकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तत्पर आहेच! तुम्ही आमच्या या प्रयत्नांना कमालीची साथ देताय हेही तितकंच खरं! पण, हे समीकरण तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्या नाटकाबद्दलची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पुन्हा पोहोचेल आणि आज तेच घडलेलं आहे. ‘सारखं काहीतरी होतंय!’ या ताज्यातवान्या नाटकाबद्दल आपले प्रिय वाचक श्री. विजयकुमार अणावकर यांनी डोंबिवलीहून इमेलद्वारे आमच्यापर्यंत प्रतिक्रिया पाठवली आहे. आज आम्ही ही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत आहोत याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो.
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.
श्री. विजयकुमार अणावकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया
सारखं ‘हाउसफुल्ल’ होतयं!
कोविड १९ च्या निर्बंधामुळे कडोंमपा अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अद्यापही सिने-नाटकाच्या प्रेक्षकांच्या उपस्थितीवर पन्नास टक्के मर्यादा कायम आहे. तरीदेखील अलीकडे सावित्र्रीबाई नाट्यमंदिरात ‘हाउसफुल्ल’चा बोर्ड लागणं कठीणच झालं होत. त्याचवेळी नाटकाच्या रंगमंचावर ‘प्रशांत दामले’ नावाची जादू काय असते याची प्रचिती गेल्या रविवारी आली. संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित नात्यातील गोडव्याची मजेशीर नोकझोक सांगणारं धमाल विनोदी नाटक ‘सारखं काहीतरी होतंय‘ या नाटकाचे एकाच दिवशी लागोपाठ असलेले दोन्ही प्रयोग हाउसफुल्ल झाले होते. गेल्या दोन वर्षात दुर्मिळ झालेला हा अनुभव रंगभूमीने २०२२ मध्ये प्रथमच पहिला असेल. त्यामुळे नाट्यक्षेत्राला नव्याने संजीवनी प्राप्त झालेली आहे. प्रत्येक घरातील दोन पिढ्यांच्या विचारातील विसंगती, करिअर आणि कौटुंबिक जिव्हाळा यांचा सुरेख मिलाफ गुंफण्यात लेखक आणि दिग्दर्शक संकर्षण कऱ्हाडे यशस्वी झाले आहेत. संकर्षण कऱ्हाडेचे लिखाण उत्तम तर आहेच, शिवाय दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी पदार्पणातच बाजी मारली आहे. प्रशांत दामले यांच्या उत्स्फूर्त अभिनयाला प्रेक्षकांची पूर्णपणे दाद मिळते. हाउसफुल्लचा बादशहा हा किताब इथेही योग्य ठरला आहे. वर्षा उसगावकर यांनी तब्बल ३६ वर्षांनी रंगभूमीवर ठेवलेले पाऊल इथे कमालीचे यशस्वी ठरले आहे. त्यांना पूर्णिमा अहिरे-केंडे, सिद्धी घैसास, आणि राजसिंह देशमुख या सहकलाकारांची उत्तम साथ लाभली आहे. नाटक फुल्ल२ धमाल तर आहेच शिवाय ‘सारखं हाउसफुल्ल होतंय’ हा अनुभवही रंगभूमीला सुखावणारा आहे.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.
पुढील प्रयोग