श्री. विजयकुमार अणावकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया
मराठी रंगभूमी, सिनेमा आणि टीव्ही मालिका या तिहेरी प्लॅटफॉर्मवर सराईतपणे वावरणारा नामवंत ज्येष्ठ विनोदी कलाकार प्रदीप पटवर्धन याच्या अचानक जाण्याने कलाजगतात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांच्या अभिनयाच्या उत्स्फूर्त शैलीमुळे रंगमंचावर ऊर्जा सळसळत असलेली पहायला मिळे. ‘मोरूची मावशी’ या लोकप्रिय नाटकाने एकेकाळी रंगमंचावर धुमाकूळ घातला होता, त्यामध्ये प्रदीप पटवर्धन यांनी साकारलेला ‘भैया’ देखील तोडीसतोड भाव खाऊन लोकप्रिय झाला होता.
टूरटूर, दिली सुपारी बायकोची, चल काहीतरीच काय! सारख्या अनेक नाटकातील त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या होत्या. तसेच जमलं हो जमलं, एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि नवरा माझा नवसाचा इत्यादी मराठी चित्रपटात देखील त्यांनी अभिनयाची विशेष चमक दाखवली होती. दूरदर्शनवरील महाराष्ट्राची लोकधारा ह्या लोकप्रिय कार्यक्रमातील ‘आठशे खिडक्या नऊशे दार…’ या गाण्यावरील नृत्यावर प्रदीपने बहार आणली होती. आपला नोकरी व्यवसाय सांभाळून मनोरंजन विश्वात रसिकांनी आवर्जून दखल घ्यावी इतकी दैदीप्यमान कामगिरी करून दाखवणं, ही सामन्य गोष्ट नाही. प्रदीप पटवर्धन यांनी मात्र ते सहज साकार केल होतं, हीच विशेष कौतुकाची बाब आहे.
विनोदी अभिनेता, उत्स्फूर्त अभिनयाचा बादशहा आणि हरहुन्नरी कलाकार प्रदीप पटवर्धन यांनी कलाविश्वाच्या रंगमंचावरून अचानक घेतलेली एक्झिट मनाला चटका लावून गेली.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
हौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल अथवा कलाकराबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.