नुकताच २७ मार्च रोजी पार पडलेला जागतिक रंगभूमी दिन यंदा सर्व रंगकर्मींनी जोशात साजरा केला. कोविडच्या संकटामुळे काही काळ स्थगित झालेली नाट्यसृष्टी नव्याने उजळू लागल्यामुळे रंगकर्मींमध्ये दिसणारा हा उत्साह स्वाभाविकही होता. अशा या दिवशी पीटर सेलर्स या पिटस्बर्ग, पेनसिल्वानिया, यूएसए येथील संगीतिका, नाटक आणि महोत्सव दिग्दर्शक यांनी सर्व नाट्यदर्दींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत एक महत्वाचा संदेशही दिला आहे. ज्येष्ठ लेखक, नाट्य प्रशिक्षक व दिग्दर्शक संभाजी सावंत यांनी हा संदेश अनुवादित करून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. हा संदेश तमाम नाट्यप्रेमींसाठी अतिशय महत्वाचा आहे.
प्रस्तुत संदेश नक्की वाचा!
मूळ लेखक: पीटर सेलर्स
अनुवाद: संभाजी सावंत
मित्रहो, काळ विलक्षण उद्भवला आहे! आज अवघं जग सतत कोसळणार्या विविध बातम्या आणि अहवालांच्या भडिमारात अडकून पडलं आहे. म्हणून मी आपणा सर्व सर्जनशील कलाकारांना साद घालतो आहे.
नाटकांत का होईना, विलक्षण काळभान, विलक्षण परिवर्तन, विलक्षण सजगता, विलक्षण प्रतिमान आणि विलक्षण दृष्टी ह्या आयुधांसह अशा विलक्षण काळाला सामोरे जाण्याची एक दिव्य कुवत, आवाका आणि दृष्टिकोन आपणा कलाकारांकडे आहे.
आज आपण मानवी इतिहासातील भयंकर संघर्षाच्या कालखंडात जगतो आहोत. परिणामी आज आपण भयंकर कठोर बदल अनुभवीत आहोत. माणसाचं स्वतःशी नातं, एकमेकाशी नातं आणि मानवेतर जगाशी नातं; हे आपल्याला अनाकलनीय झालं आहे, त्यावर बोलणं आणि व्यक्त होणं कठीण झालं आहे. आपण केवळ २४ तास बातम्यांच्या चक्रात नाही आहोत; तर काळाच्या धारेवर आहोत. ह्या सखोल बदलांचं, ह्या उद्रेकांचं आकलन व्हायला मदत करील अशी एखादी भाषा भाषा हवी आहे, परंतु ती नाही, तशी धोरणं नाहीत आणि समोर तशा थोर आदर्श प्रतिमाही नाहीत.
मित्रहो, आपलं आजचं जगणं अहवालस्वरूपात नव्हे, तर अनुभव म्हणून कसं सांगायचं आपण? तर ‘नाटक’ हाच तो अनुभवांचा खरा कलाविष्कार!
प्रचंड वृत्तपत्रमोहिमा, आव आणून मांडलेले अनुभव आणि भीषण भविष्यकथनात आकंठ बुडालेल्या जगात, आकड्यांच्या न संपणार्या पुनरावृत्तीच्या पलिकडे, उत्तम आयुष्य, उत्तम पर्यावरण, उत्तम मैत्र, यासाठी एका नव्या प्रकाशा-कडे, त्याच्या अनंततेकडे आपण कसे पोहोचणार?
कोविड 19 च्या दोन वर्षांनी माणसाच्या भावना बोथट केल्या, आयुष्ये तोकडी केली, माणसामाणसातले संबंध तोडले, आणि आपल्याला पार आदीम अवस्थेत नेऊन ठेवलं. त्या आदीम अवस्थेत माणसाला, कोणत्या नव्या बिया रुजवाव्यात आणि त्याची रोपणी करावी, आणि कोणतं घातक तण समूळ निपटून टाकावं; हे कळंत नव्हतं, तशीच अवस्था आज विचारांबाबत झाली आहे.
खूप लोक आज संकटात आहेत. अनेक ठिकाणी प्रचंड हिंसा उफाळली आहे, कारण सामंजस्याचा अभाव! परिणामी अनेक प्रस्थापित व्यवस्था क्रौर्याचे आखाडे असल्याचं उघड झालं आहे.
आपले ते संस्कृती नावाचे स्मृतिसंचिताचे सण राहिले कुठे? मुळात आपल्याला कोणत्या स्मृतिसंचिताची गरज आहे? ते कोणते धर्मविधी आहेत, जे आज आपल्याला, पूर्वी कधीही न उचलेलं पाऊल उचलायची तयारी करायला भाग पाडताहेत?
मित्रहो, नाट्यभूमीला एक दिव्य दृष्टी आहे, एक हेतू आहे, तिथे भुतकाळाचं पुनरावलेकन शक्य आहे आणि त्यात दुरुस्तीही शक्य आहे. तरीही नाट्यभूमीला आज गरज आहे ती नव्या विधींची. आपल्याला आज केवळ करमणुकीची गरज नाही; गरज आहे आपण सारे एकत्र येण्याची. आपल्याला तो अवकाश व्यापायचा आहे, जिथे अनेक प्रेक्षकांचं एक मन होऊन ते आस्वाद घेतं; परिणामी त्या कालावधीत त्या प्रेक्षकांत समानता असते. असा अवकाश व्यापून तिथे मशागत करायची आहे. असे एकाग्र होण्याचे आणि समानतेचे अनेक सुरक्षित अवकाश हवेत आपल्याला!
नाट्यभूमी ही भूतलावरील अशी निर्मिती आहे, जिथे माणसांत, देवांत, वृक्षांत, पावसाच्या थेंबात, अश्रुच्या थेंबात आणि पुनरुत्पत्तीतही असा एक समान अवकाश आहे. तो समानतेचा अवकाश आणि एकाग्र होणं, हे सुप्त सौंदर्याने प्रकाशित असतं. अनेक भावभावना, संवाद, कृती यांच्या सखोल पण संयमित आदानप्रदानाने ते जिवंत राखलेलं असतं. बुद्धाने पुष्पालंकार-सूत्रात मानवी जीवनातील सोशिकपणाचे दहा प्रकार सांगितले आहेत. त्यातला श्रेष्ठ प्रकार म्हणजे, ‘सारेच मृगजळ आहे’, असं समजणं! नाटकाने तर जीवन नेहमीच मृगजळसदृश दर्शविलं आहे. रोखठोकपणा आणि आत्मबळ अबाधित ठेवून, मानवी मोहजाल, गैरसमज, अंधविश्वास आणि नकार पाहायला उद्युक्त केलं आहे.
मित्रहो, आपण जे पाहत आहोत तेच आणि तसंच पाहावं लागतं आहे. पर्यायी वास्तव, नवीन शक्यता, भिन्न दृष्टिकोन, अदृश्य नाती आणि कालातीत संबंध आपण पाहू शकत नाही वा अनुभवू शकत नाही.
हीच वेळ आहे, मित्रानो, आपली मनं, आपल्या भावना, आपली कल्पनाशक्ती, आपले इतिहास आणि आपली भविष्यंही आता नव्याने तपासून पाहायला हवीत! हे काम एकांडे लोक नाही करू शकत; आपण हे एकत्रितपणे करायचे आहे! आणि ते करण्यासाठी नाट्यभूमी हे आमंत्रण आहे!
तुम्हा सर्वांना तुमच्या कार्यासाठी धन्यवाद!
जागतिक रंगभूमी दिवस चिरायु व्होवो!
पीटर सेलर्स
संगीतिका, नाटक आणि महोत्सव दिग्दर्शक
पिटस्बर्ग, पेनसिल्वानिया, यूएसए
अनुवाद – संभाजी सावंत, अवतरण अकादमी, 9869453700