या ४ अंकी लेखातील दुसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा! – भाग २
काहीतरी खाड्कन पडल्याचा आवाज झाला आणि माझी तंद्री भंगली. मी त्वरेने कपडेपटाच्या खोलीतून बाहेर आलो. बाहेर येताना गडबडीत सर्व उघडलेल्या पेट्या बंद करायला मात्र विसरलो. रंगपटाच्या खोलीजवळ आल्यावर त्या हृदयाची स्पंदने मला अधिक तीव्रतेने जाणवू लागली होती. हळूच पावले टाकीत मी रंगपटाच्या खोलीत प्रवेश केला. डाव्या बाजूला मोठ्ठाले आरसे, टेबल, खुर्च्या ठेवलेल्या होत्या. मेकपचं सगळं सामान तिथेच टेबलवर अस्ताव्यस्त पडलेलं होतं. इकडे तिकडे पाहताना जमिनीवर रंगांची एक पेटी पडलेली दिसली. बहुतेक तिच्याच पडण्याचा आता आवाज झाला. ‘रंग’ म्हणजे कलाकाराचं आभूषण. ज्याच्याशिवाय तो पूर्ण नसतो. पण त्या पेटीतील रंगांनी आता कृष्णधवल रूप धारण केले होते. हृदयाची तीव्र ऐकू येणारी स्पंदने आता पुन्हा धूसर, अस्पष्ट ऐकू येत होती. जमिनीवर पडलेले काही टिशूपेपर उचलायला मी खाली वाकलो तर कोणीतरी डोक्यावर हात ठेवल्याचा भास झाला. मी दचकलो. वर पाहिले तर जवळपास कोणीही नव्हते. तो स्पर्श ओळखीचा वाटला. त्यात मायेची जाणीव होती, जेष्ठांच्या आशीर्वादाचे मोठेपण होते. ‘व्हॅक्युम क्लीनर’ नाटकाच्या प्रयोगानंतर जेष्ठ अभिनेते अशोक सराफ मामांना वाकून केलेला नमस्कार किंवा ‘झुंड’ पाहिल्यावर जेष्ठ नेपथ्यकार-दिग्दर्शक प्रदीप मुळ्ये यांना केलेल्या नमस्काराची आठवण अचानकपणे त्याक्षणी झाली होती. तो आशिर्वाद, आयुष्यातला त्यांच्यासोबतच तो एक क्षण आता ह्या भीषण शांततेत मला लख्खपणे आठवत होता.
उजव्या बाजूला असलेल्या आसनव्यवस्थेकडे लक्ष गेले. तर तिथे त्या खोलीतील माझ्या अनेक आठवणी ओळीने एकाबाजूला बसल्या आहेत, असे भासत होते. नाटकाचा प्रयोग झाला कि, इथेच येऊन अनेकदा भारावलेल्या मनाने, कधीकधी निशब्दपणे मी अनेकदा खूप व्यक्त झालो आहे. मग कलाकाराशी किती जवळची ओळख वगैरे सगळं बाजूला ठेऊन त्याक्षणी आपल्यासमोर एक ‘कलाकार’ उभा आहे, आपण एक नाट्यरसिक आहोत आणि आताच पाहिलेल्या नाटकाबद्दल आपण त्याच्याशी बोलतोय, ही भावना मन आनंदून टाकणारी होती. अनेक जुनिअर-सिनिअर कलाकारांशी अगदी दोन मिनीटे सुद्धा साधलेला संवाद आज मला दीर्घकाळ मिळालेल्या सहवासाचे सुख देत होता. त्या ठिकाणी लाजत बुजत फक्त एक फोटो काढायला येणारा प्रेक्षक त्याला मिळणाऱ्या चार अलौकिक क्षणांचा भुकेला असतो. आपण ज्यांना मालिका-सिनेमांमध्ये पाहतो त्यांचे काम प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांच्याजवळ उभं राहून दोन क्षण बोलता यावं, ही वेडी अभिलाषा बाळगून अनेक जण तिथे येतात. मला वाटतं, नाटक संपल्यावर प्रत्येकाने भेटून आपला थोडक्यात अभिप्राय जरूर द्यावा. ज्यायोगे नाटक प्रेक्षकसापेक्ष होतं, असं मला वाटतं. आजचा प्रेक्षक जाणकार आहे, त्याला रंगभूमीकडून खूप अपेक्षा आहेत. एखादं नाटक पाहिलं कि आजही ज्याच्या मनात बॅकस्टेजला येऊन कलाकारांशी बोलण्याची, एक आठवण म्हणून फोटो काढण्याची इच्छा असते, तोच खरा ‘नाट्यरसिक’ आहे. त्या एका खोलीत कित्येक लोकांना जगावेगळे आनंद मिळाले असतील. कोणी आपल्या आवडत्या कलाकाराच्या हातावर टाळी देत भरपूर हसलं असेल, तर कोणी भावनाविवश होत एखाद्याच्या मिठीत रडलं असेल. कोणी मैत्रीपूर्ण भावनेने एखाद्याला घट्ट मिठी मारली, तर कोणी मायाळू आईवडिलांसारखे आशिर्वाद दिले असतील. तिथला एकेक कोपरा एकेक आठवण साठवून पावन झाला आहे.
पण ह्या आठवणींतल्या गोड रंगांचे रूपांतर आता ह्या बेरंगी दुनियेत झाले होते, ह्याची जाणीव मला चिमटा काढून भानावर आणत होती.
तिथल्या आठवणी, गप्पा, किस्से सगळे काही चिरकाल त्या खोलीतच मी साठवून ठेवले आहे. ज्याचे नाट्यगृह माझ्याकडून कधीच कोणते भाडे घेऊ शकत नाही. माझ्यासारखे असंख्य असतील ह्या जगात, ज्यांना त्या इवल्याश्या वास्तूत लाखमोलाच्या आठवणी मिळाल्या असतील. आता मात्र मी तिथून घाईने निघून बाहेर आलो. कारण भूतकाळात जास्त रमलो तर वर्तमानातील वास्तव मला असह्य होईल, असे वाटले आणि मी तिथून बाहेर पडलो. मागील बाजूनेच नाट्यगृहाबाहेर पडण्यासाठी मी पुढे निघालो तर उजव्या बाजूला स्त्रियांची रंगपटाची खोली होती. तिचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी आजवर कधीच त्या खोलीत प्रवेश केला नव्हता आणि आजही प्रवेश न करताच तिथूनच दरवाजा बंद करून मी पुढे निघालो. शेवटी मुख्य इमारतीमधून बाहेर पडताना डाव्या बाजूला थेट रंगमंचावर जाण्यासाठी एक प्रवेश होता. तिथेच थांबलो. इथूनच प्रयोग संपला कि नेपथ्याची ने आण होत असते. एकीकडे प्रेक्षकांचे लोंढे मेकपरूपकडे जात असताना दुसरीकडे ही आवराआवर सुरू असते. त्यात ०७:०० ला प्रयोग संपवून पुन्हा ०८:३० असेल तर मात्र अधिकची धावपळ पाहायला मिळते. त्या क्षणी मनात घालमेल का होती, कळतच नव्हतं. दार उघडूया कि नको ? अशी शंका मनात येत होती. अखेर दारापाशी बळेबळेच गेलेल्या हातांनी ते दार ओढलं तर आत अजूनही अंधारच होता. नेपथ्यहीन रंगमंच ‘युगान्त’ नाटकामधील भकास धरणगावासारखा वाटत होता. मात्र त्या भयाण अंध:कारातही मंदपणे मला ‘संगीत देवबाभळी’तील जेष्ठ गायक आनंद भाटे यांच्या स्वरांची गुंज ऐकू येत होती. अजूनही माझा रंगमंच जिवंत आहे, संगीताचे स्वर तिथेच घुमत आहेत, त्याला अजूनही पुन्हा उजळण्याची आस आहे, ह्या शाश्वतीने निश्वास टाकत मी दार बंद केले आणि तिथून निघालो…
क्रमशः पुढे…
Ep. 3: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग ३
2 Comments
Pingback: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग २ • रंगभूमी.com
Pingback: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग ४ • रंगभूमी.com