‘स्वरा’ ही एक सुशिक्षित, स्वतःवर पूर्णपणे विश्वास असलेली, आत्मनिर्भर आणि छानश्या कुटुंबात पण वडिलांच्या छत्रछायेशिवाय वाढलेली मुलगी, मात्र प्रेमाच्या बाबतीत कायम अपयशीच. तिची आई मंजुषा पतीच्या निधनानंतर आयुष्याकडे नव्याने बघण्याचा प्रयत्न करतेय. अनपेक्षितपणे तिची कॉलेजचा मित्र यशवंत पाटील बरोबर झालेली भेट. स्वराच्या आयुष्यात नव्याने आलेला तिच्या ऑफिसमधला सहकारी मित्र कपिल. या चौघांच्या आयुष्यात एकत्रितपणे घडणार्या गोष्टी अगदी अलगदपणे उलगडून आणि हसत खेळत मांडणी करणाऱ्या या नाटकात सहजीवनाचा खरा अर्थ उलगडलेला पहायला मिळतो. लेखक आदित्य मोडक आणि दिग्दर्शक नितीश पाटणकर यांच हे पहिलच व्यावसायिक नाटक, त्यांनी दोन पिढ्यांच्या नातेसंबंधाचा आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन मांडण्याचा केलेला प्रयत्न प्रचंड यशस्वी झालेला आहे.
कपिलच्या टिपिकल पुणेरी दिलखुलास भूमिकेत सुयश टिळक बाजी मारून जातो. त्याच्या आजवरच्या रोमॅंटीक भूमिकेची चौकड मोडून तो रंगभूमीवर सहजतेने वावरताना दिसतो. रश्मी अनपट हिने कोषात गेलेल्या आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वराच्या भूमिकेला यथोचित न्याय दिला आहे. एक गृहिणी, मनाने खंबीर असलेली आणि आपल्या मुलीच्या काळजीने व्यथित झालेली परंतु त्याचवेळी आपल्या कौशल्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारी आई निवेदिता सराफ यांनी मंजुषाच्या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिलेला आहे. त्यांची ही भूमिका नाट्यरसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. विजय पटवर्धन यांची भूमिका असलेला यशवंत पाटील देखील लक्षवेधी ठरला आहे. अलीकडे ही भूमिका श्रीरंग देशमुख करतात.
लेखक आणि दिग्दर्शक यांच्या पहिल्याच व्यवसायिक प्रयत्नाला पाठबळ देणारे निर्माता चंद्रकांत लोकरे निश्चितच कौतुकास पात्र आहेत. लेखक आदित्य मोडक आणि दिग्दर्शक नितीश पाटणकर यांनी देखील निर्मात्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि शीतल तळपदे यांचची प्रकाश योजना आणि संगीतकार सारंग कुलकर्णी यांनी त्याना परिपूर्ण साथ दिलेली आहे. मराठी रंगभूमीला नवनवीन विषय साकार करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे नाटक म्हणून ‘मी स्वरा आणि ते दोघं!’ याचा आवर्जून उल्लेख करता येईल.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल अथवा कलाकराबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.