सस्पेन्स आणि थ्रिलर कथानकातील नाट्य अनुभवायचे असेल तर मुळात कथा, पटकथा, संवाद, अभिनय आणि दिग्दर्शन यांची योग्य भट्टी जमायला हवी. अस्मय थिएटर्स निर्मित– सस्पेन्स थ्रिलर “मास्टर माईंड” या नाटकात ह्या सगळ्यांचा अचूक मेळ बसविण्यात विजय केंकरे यांची दिग्दर्शकीय कल्पकता कमालीची यशस्वी झालेली दिसून येते. या रहस्यमय दोन अंकी नाटकाच्या कथेमधील सस्पेन्स प्रेक्षकांना कायम संभ्रमात ठेवतो. आपण बांधलेले ठोकताळे इथे निष्प्रभ ठरतात.
नाटकाच्या शेवटातील शेवटचा भाग उलगडेपर्यंत अर्थात अगदी शेवटच्या सेकंदाला मिळालेल्या कलाटणीने खुर्चीला खिळून राहिलेला प्रेक्षक अचंबित होतो. “मास्टर माईंड” कोण? ‘तो’ का ‘ती’ किंवा आणखी कोणी ‘तिसरा’ याचा विचार करत प्रेक्षक कथानकाच्या गुंत्यात नकळत गुरफटत जातात. सदर नाटकातील सस्पेन्स आणि थ्रिल पाहता नाटकाच्या कथेविषयी इथे जास्त उहापोह करणे उचित ठरणार नाही. वास्तविक प्रत्येक क्षणागणिक परिस्थितीमध्ये अनाकलनीय आणि अनपेक्षित बदल घडत जात असल्यामुळे ह्या नाट्यप्रयोगातील थरार प्रेक्षकांनी प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवायला हवा, हेच खरे!
आस्ताद काळे व अदिती सारंगधर या जोडीने ‘प्रपोजल’, आणि ‘चर्चा तर होणारच’ नंतर पुन्हा एकदा एकत्र येऊन रंगभूमीवरील हॅट्रीक साधली आहे. रहस्यमय नाटकातील त्यांची धमाल केमिस्ट्री आणि लक्षवेधक कामगिरी इथे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. व्दिपात्री रहस्यमय नाटकामध्ये टेम्पो कायम राखण्यासाठी कलाकारांच्या अभिनयाचा विशेष कस लागतो, दोन्ही प्रमुख कलाकारांनी या नाटकामध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने हे शिवधनुष्य लीलया पेलवल्याचे प्रकर्षाने दिसून येते. सुरेश जयराम (रंगावृती) आणि लेखक प्रकाश बोर्डवेकर, आपल्या लेखन सामर्थ्याने नाटकाच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांना संभ्रमावस्थेत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. विजय केंकरे यानी आपले दिग्दर्शनकौशल्य पणाला लावून रहस्यमय नाटकातील क्षणाक्षणाला अचंबित करणारे नाट्य गुंफले आहे. दोन तास पंधरा मिनिटाच्या या नाट्यात गुंतलेले प्रेक्षक आपला कसलाच अंदाज बांधू शकत नाही, हेच दिग्दर्शनातले यश आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य, रहस्यमय आणि थ्रिलर नाटकाच्या गूढ वातावरणात अधिकच भर टाकते. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना प्रभावी आणि कथेतील रहस्याला साजेशी ठरली आहे. संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत रहस्यमय, नाटकाला पोषक वातावरण निर्मिती करणारे असेच आहे. शेवटच्या सेकंदाला उलगडणारे रहस्यमय, थ्रिलर आणि सस्पेन्स कोडं सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रेक्षकांना सव्वा दोन तास भारावून सोडणारा नाट्यानुभव सर्व नाट्यवेड्या रसिक प्रेक्षकांनी आवर्जून घ्यावा.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल अथवा कलाकराबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.