तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.
श्री. विजयकुमार अणावकर यांनी पाठवलेली प्रतिक्रिया
‘कुर्रर्रर्रर्र’कुरीत विनोदी नाटक
अलीकडच्या काळात रंगभूमीवर विनोदी नाटकांची लाट नव्याने उभारी घेत असतानाच प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाने गंभीर विषयाला हलक्याफुलक्या विनोदाची झालर लावून प्रेक्षकाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. बाळंतपण आणि मातृत्व यामधील सुंदर क्षण या नाटकात हळुवार विनोदाने साकारले आहेत. अक्षर आणि पूजा यांच्या लग्नाला पाच वर्षे झालेली असून देखील त्यांना बाळ होत नाही. पूजाला लागलेली बाळाची हुरहूर आणि बाळासाठी तिच्यामागे लागलेला आईचा तगादा यामधून गोड हास्य देऊन प्रसंगी प्रेक्षकाना इमोशनल करून देखील एक सुंदर कौटुंबिक संदेश देणारी गोष्ट गुंफण्यात लेखक-दिग्दर्शक पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. प्रसाद खांडेकर हे नाटकातही लेखकाच्या भूमिकेत बाजी मारून जातात. लग्नानंतर बरीच वर्षे बाळ न होणाऱ्या विवाहित स्त्रीची आई होण्याची तळमळ, नम्रता संभेराव हिने अभिनयातून तंतोतंत मांडली आहे. विशाखा सुभेदार आणि पॅडी कांबळे यांनी आपल्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय दिलेला आहे. चारही धुरंदर विनोदवीरांच्या अप्रतिम कॉमेडीची जुगलबंदी या नाटकात प्रेक्षकाना खिळवून तर ठेवतेच, शिवाय कॉमेडीच अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हळवही करते. उत्कृष्ट अभिनय, दर्जेदार विनोद, सुंदर नृत्य, उत्तम गाणी, संगीत, नेपथ्य आणि प्रकाश योजना यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या मनात घर करून जातं. विषयाच गांभिर्य आणि विनोद यांचा अचूक समतोल साधणारं ‘कुर्रर्रर्रर्र’कुरीत विनोदी नाटक पाहिल्याचे समाधानही प्रेक्षकांना मिळते.
विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
तुम्हालाही एखाद्या नाट्यानुभवाबद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवायची असेल तर ती [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवू शकता.
1 Comment
मला नाटक खूप आवडते