मंडळी, बच्चेकंपनीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेतच. या दिवसांमध्ये पालकांना पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांचे मनोरंजन करायचे तरी कसे? फिकर नॉट! आपल्या लाडक्या नाट्यसृष्टीने याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत बालनाटकांचे अनेक प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रेक्षागृहांमध्ये आपल्याला पाहता येणार आहेत.
बालनाट्ये का पाहावीत?
बाहेर जाऊन मुलांना २-३ तासांचे नाटक दाखवायचा प्रयत्न फारसे पालक नाहीच करत. सध्याच्या पिढीत मनोरंजनाची इतकी माध्यमं आहेत की बालनाटकांसाठी वेगळा वेळ फार कोणी काढत नाही. परंतु बालनाट्य ही खास लहान मुलांच्या कोवळ्या मनांसाठी बनवलेली असतात. त्यातल्या कथा, पात्र, नेपथ्य, त्यांच्या भावविश्वातल्या गोष्टींच्या अवती-भोवती आखलेल्या असतात. त्यांना आवडणारं एखादं कार्टून, किंवा त्यांनी पुस्तकात वाचलेली एखादी कथा घेऊन ही बालनाट्ये तयार होतात. त्यामुळे संपूर्ण बालपण जे पात्र पुस्तकात किंवा टीव्हीवर पाहिलेलं असतं ते प्रत्यक्षात समोर पाहण्याची लहान मुलांना वेगळीच मज्जा वाटते. बऱ्याच वेळेला ही पात्रं प्रेक्षकांच्या मधून चालत मंचावर जातात. आपलं आवडतं पात्र आपल्या बाजूने चालत गेलं, माझ्याकडे बघून हसलं या गोष्टींनेसुद्धा त्यांच्या बालमनाला आनंद होतो.
बऱ्याच बालनाट्यांमध्ये नवीन कथा आणि नवीन पात्रं असतात. लहान मुलांना कहाण्या ऐकायला फार मज्जा येते. त्या कहाण्यांमधली पात्रं जेव्हा रंगमंचावर उतरून वावरतात आणि जेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेली लहान मुलं संपूर्ण कथा फक्त त्यांच्या कानाने न ऐकता डोळ्याने अनुभवतात, तेव्हा त्यांना वेगळाच आनंद होतो. ही सगळी नाटकं, त्यातील कथा, त्यातली भाषा, त्यातले संवाद हे लहान मुलांना समजतील व आवडतील अश्याच भाषेत व अश्याच पद्धतीने बनवलेली असतात. बऱ्याच वेळेला मंचावरील कलाकार प्रेक्षकांना प्रश्न विचारतात, त्यांना संबोधून बोलतात. त्यामुळे आपणही या कथेचा भाग आहोत ही जाणीव बच्चेकंपनीला फार सुखावह असते.
त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून नाटकांची सवय लागेल. नवीन पिढी फारशी नाटकांकडे वळत नाही, कारण कधी नाटकाचा अनुभव त्यांनी घेतलेलाच नसतो. लहान वयापासूनच जर त्यांनी नाटकांचा अनुभव घेतला तर लहानपणापासून नाटकांविषयी एक ओढ त्यांच्या मनात निर्माण होईल. नाटक म्हणजे काय आणि नाटकाचे काय वेगळेपण आहे याची त्यांना लहानपणीच ओळख होईल. त्यांच्या लहान वयातच त्यांच्यावर नाटकांचे सुसंस्कार होतील आणि एकदा नाटकाशी जोडलेली व्यक्ती आयुष्यभरासाठी नाट्यप्रेमी बनते हे काही वेगळे सांगायला नको.
नाटकांमध्ये वापरलेली भाषा ही शुद्ध मराठी भाषा असते. जागतिकरणामुळे संपूर्ण जग आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा राजरोसपणे इंग्रजीचा वापर होऊ लागला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे, मुले लहानपणापासूनच इंग्रजी शिकतात. आपसूकच मराठी भाषा मागे पडत जाते. त्यामुळे लहान मुलांना मराठी भाषेचे सामर्थ्य, माहात्म्य आणि मराठी भाषेची गोडी कधी पूर्णतः समजतच नाही. ही बालनाट्ये पाहून त्यांची नाळ आपल्या मातीशी जोडून राहते. जितकी जास्त ही भाषा त्यांच्या कानावर पडेल, या भाषेप्रती तेवढीच त्यांची ओढ वाढेल. मराठी भाषेबद्दल त्यांचे कुतूहल वाढेल आणि त्यांच्या मनात मराठी भाषा जिवंत राहील.
मुलांना खुश व्हायला फारसं काही लागत नाही आणि त्यांची कोवळी मनं सगळं खरं मानून घेतात. माझं आवडतं पात्र खरंच रंगमंचावर आलय अशी त्यांना पक्की खात्री पटते. मुलांबरोबरच ही बालनाट्ये पालकांसाठी व सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांसाठीदेखील बालपणात डोकवायचा एक उत्तम मार्ग आहे. लहान वयातली ती निरागसता, तो भाबडेपणा, मनसोक्त आनंद अनुभवण्याची त्यांची वृत्ती आणि आपल्या आजूबाजूला घडत असलेलं सगळं खरं आहे हा पक्का विश्वास… या गोष्टी आपण जसे मोठे होत जातो तश्या कमी होत जातात. आपण वास्तवाशी समरस होत जातो आणि या भाबड्या, स्वप्नातल्या दुनियेत बागडणं विसरून जातो. संपूर्ण नाट्यगृहात लहान मुलांच्या खळखळून हसण्याने गुंजणारा आवाज आणि त्याने मिळणारा निखळ आनंद हा अनुभव फक्त बालनाट्ये देऊ शकतात.
नाट्यशिबिरं
ही नाटकं पाहून बऱ्याच लहानग्यांना स्वतः नाटकाचा भाग व्हावंसं वाटतं. त्यांच्या बाल-मनाला रंगमंचावर घडत असलेल्या कथेचा त्यांनीही एक भाग व्हावं असं वाटतं. आपसूकच, रंगमंचासाठी एक ओढ त्यांच्या मनात निर्माण होते. त्यासाठी मे महिन्याच्या सुट्टीत अनेक नाट्यशिबिरे घडत असतात. अभिनय, कला, मंचावर वावर, शब्दफेक, संवाद, कथालेखन या सगळ्या क्षेत्रांची अगदी उत्तम माहिती ह्या नाट्यशिबिरातून लहान मुलांना प्राप्त करता येते. लहानवयापासूनच नाटकांबद्दल इतकी माहिती मिळाल्यावर, त्यांच्या कलाक्षेत्राकडे वळणाऱ्या वाटा मोकळ्या होतात. या शिबिरांमधून शिकलेल्या अनेक गोष्टींमधून त्यांचा आत्मविश्वास वाढतो, लोकांसमोर उभे राहून बोलण्याची कला शिकता येते व निर्भीड होऊन आपली कला व विचार समोर मांडण्याचे साहस मिळते. त्याचबरोबर बऱ्याच नाट्यशिबिरांमध्ये प्रसिद्ध कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांना आमंत्रण दिले जाते. त्यांच्या अनुभवाचे बोल या मुलांच्या मनावर फार चांगले परिणाम घडवू शकतात.
तेव्हा या नाट्य शिबिरांमध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचे नाव नोंदवू शकता. याने त्यांची उन्हाळ्याची सुट्टी सार्थकी लागेल त्याचबरोबर त्यांना या अनुभवाने नवीन काहीतरी शिकता येईल.
बालनाटकं
(NOTE: लेख लिहिताना जी नाटकं रंगभूमीवर सुरू होती त्याप्रमाणे ही माहिती देण्यात आली आहे. आजच्या तारखेचे वेळापत्रक कृपया BookMyShow वर तपासून बघा!)
१. अलबत्या गलबत्या
रत्नाकर मतकरींच्या पुस्तकावर आधारित ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य ‘झी मराठी’ची प्रस्तुती आहे. २०१८ पासून रंगभमीवर बहुचर्चित असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. नाटकात चेटकिणीची मुख्य भूमिका आपल्याला वैभव मांगले साकारताना दिसतात.
२. ‘फुग्यातला राक्षस’, ‘टेडी आणि डोरेमॉन’ आणि ‘जोकर आणि जादुगार’
चिल्ड्रेन्स थिएटर निर्मित व बालमंच प्रकाशित ‘फुग्यातला राक्षस’, ‘टेडी आणि डोरेमॉन’ आणि ‘जोकर आणि जादुगार’ ही तीन नाटकं एकाच तिकिटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. राजू तुलालवार लिखित व दिग्दर्शित या नाटकात २० बालकलाकार आहेत.
३. कापूस कोंड्याची गोष्ट
कापूस कोंड्याची गोष्ट एक संगीतयुक्त विनोदी नाटक आहे. एक राजा, त्याची राजकन्या आणि सर्कस बद्दलची ही मजेशीर कहाणी आहे. या धमाल विनोदी नाटकात अतुल परचुरे आणि मैथिली पटवर्धन मुख्य भूमिका साकारतायेत.
४. जंगली बाणा, हॅपी बर्थ डे आणि डोरेमॉन-भीम-निंज्या-टॉम
माता अनसया निर्मित व परी प्रकाशित ‘जंगली बाणा’, ‘हॅपी बर्थ डे’ आणि ‘डोरेमॉन-भीम-निंज्या-टॉम’ ही तीन नाटकं एकाच तिकिटात बघण्याची सुवर्ण संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रवीणकुमार भारदे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन प्रवीणकुमार भारदे आणि प्रणित भारदे यांनी केले आहे. या नाटकात नयना आपटे आणि प्रवीणकुमार भारदे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतात.
५. चमत्कार
साईराज निर्मित चमत्कार हे बालनाट्य रत्नाकर मतकरींचे लेखन असून याचे दिग्दर्शन ऋषिकेश घोसाळकर यांनी केले आहे. या नाटकात अनेक बालकलाकारांबरोबर विनोदाचे सम्राट- संजय नार्वेकर मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत असून नाटकातल्या नृत्याची बाजू स्नेहल अमृते- आंब्रे यांनी सांभाळली आहे.
६. फनी राजकन्या, ब्रह्मराक्षस आणि ९ सम्राट
एका तिकिटात ३ नाटकं बघायची अजून एक सुवर्ण संधी राजू तुलालवार खास बालमित्रांसाठी घेऊन येत आहेत. चिल्ड्रेन्स थिएटर निर्मित व बालमंच प्रकाशित फनी राजकन्या, ब्रह्मराक्षस आणि ९ सम्राट ही ३ धमाल नाटकं अगदी पालकांनासुद्धा पोटधरून हसायला भाग पाडतील.
७. चक्रमांचे विक्रम, अजब अद्भुत दोस्त आणि डॉ. फुसफुसची खुसखूस
चिल्ड्रेन्स थिएटर आणि बालमंच पुन्हा एकदा चक्रमांचे विक्रम, अजब अद्भुत दोस्त आणि डॉ. फुसफुसची खुसखूस या ३ धमाल बालनाटिका घेऊन येत आहेत फक्त एका तिकिटात. ही नाटके राजू तुलालवारांचे सादरीकरण आहेत.
आपली नाट्यसृष्टी लहान मुलांना एक प्रत्यक्ष, निखळ आणि लक्षात राहील असा अनुभव देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तेव्हा तुम्ही सर्वांनी तुमच्या बच्चेकंपनीला एक वेगळा अनुभव उपभोगायला नक्की घेऊन जा! व इतर रसिक प्रेक्षकांनी ही बालनाट्य नाट्यगृहात पाहायला जाऊन, आपल्या मनातल्या लहान मुलाला पुन्हा एकदा जागं करा!