बऱ्याच दिवसांपासून कार्यान्वित असलेला आणि नियोजनबद्ध केलेला आनंदयात्री या मोठ्या फेसबुक समूहाचा स्नेहसंमेलन GTG अर्थात गेट टुगेदर सोहळा १९ जून २०२२ रोजी ठाण्यात ब्राह्मण सेवा संघाच्या हॉल मध्ये भरगच्च उपस्थितीत अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला. साधारणपणे गेल्या एक महिना आधीपासून आनंदयात्री ठाणे विभागात असलेल्या आयोजक टीम मधील प्रत्येकानेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खूप धडपड व मेहनत घेतली आहे. लॉकडाऊन मध्ये सुरू झालेल्या आनंदयात्री फेसबुक ग्रुपने महाराष्ट्रांतील तमाम उत्साही, हौशी, हुशार मंडळींना एकत्र आणलं आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर व विदेशातून सुद्धा अनेक मराठी मंडळी या समूहाचा हिस्सा बनली. लॉकडाऊनपासून ते आजपर्यंतच्या या एका मोठ्या कालखंडात आनंदयात्री समूहाने AYPL म्हणजेच आनंदयात्री प्रीमियर लिग क्रिकेट सामन्यांचे आणि आनंदयात्री करंडक या एकांकिका स्पर्धेचे मोठ्या प्रमाणावर यशस्वी आयोजन केले होते. ठाणे विभागातर्फे आनंदयात्रीच्या कोअर टीम तर्फे आयोजित करण्यात आलेला आनंदयात्री स्नेहसंमेलना हा याच शृंखलेतील अतिशय महत्वाचा आणि साचेबद्ध कार्यक्रम होता. १९ जून रोजी बाहेर मधूनच ऊन, मळभ आणि पावसाळी असे संमिश्र हवामान असल्यामुळे ब्राह्मण सेवा संघाच्या हॉल मध्ये प्रवेश केल्या केल्या अतिशय प्रसन्न वाटलं. हॉलच्या बाहेर काढलेल्या सुंदर रांगोळीने सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले आणि आतल्या वातावरणाने आपण एखाद्या लग्नसोहळ्याला आलो आहोत असेच वाटत होते. आत प्रवेश केल्याकेल्या तिथे आपण कोणाला फारसे ओळखत नसताना स्वागत कक्षावर उपस्थित असलेली मंडळी आपल्याला नावाने ओळखतात ही बाब खूप सुखावणारी होती. नोंदणी झाल्यावर चंदनाने विलेपन असलेले गंध लावून सुवासिक अत्तर हातावर लावले जात होते. चहा नाश्ता फराळाच्या कुपन सोबत आठवणीने आनंदयात्री समूहाचा लोगो असलेले कीचेन आणि सिल्वर पेपर ने wrap केलेली दोन होममेड चॉकोलेटस देऊन खूप छान स्वागत केलं. हॉलच्या मागील बाजूस चहा नाश्त्याची उत्तम व्यवस्था केलेली. त्याच ठिकाणी एक व्यक्ती आलेल्या सर्व आनंदयात्तींना फेटे बांधत होती. आयुष्यात फेटा बांधण्याची पहिलीच वेळ असल्याने खूप च मस्त वाटलं. हे सर्व फेटे अजित गायकवाड जी यांच्यातर्फे स्पॉन्सर करण्यात आले होते. आयोजक मीनल दातार यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली, अमित देसाई, स्नेहल काळे, वर्षा गोरे आणि आनंद चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर आनंदयात्रीमधील मानसी पुराणिक आणि तृप्ती म्हसवडे यांनी आपल्या सुमधुर आवाजात तू बुद्धी दे ही प्रार्थना सादर करत वातावरण चैतन्यमय केले. दरम्यान आनंदयात्री समूहाच्या अडमिन्स शुभदा कुलकर्णी मॅडम यांचे आगमन झाले. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या AYPL क्रिकेट लीग बद्दल अमित दिवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. AYPL सामन्यात ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई मधील के डी सुपरकिंग्ज, लेक सिटी लीजंड आणि सोलापूर विभागातून खेळलेल्या ठाणेकर मंडळींना शुभदा कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुष्पगुच्छ स्वीकारत असताना टिम्स मधील सर्व सदस्यांनी काशीबाई,बाबुराव ढँटढँण या घोषवाक्याचा एकच गजर करत सभागृहात पुन्हा AYPL चा माहोल तयार केला. त्यानंतर आनंदयात्री करंडक या एकांकिका स्पर्धेबद्दल मीनल दातार यांनी आपले मनोगत, तालमी दरम्यान केलेली मज्जा किस्से सांगितले. ठाणे विभागाकडून सादर करण्यात आलेल्या चार एकांकिका विशाल राऊत दिग्दर्शित फ्लाईंग क्वीन्स आणि क्युरियस केस, केदार आणि अक्षरा चांदीवले दिग्दर्शित वास्तव, राजा भामरे दिग्दर्शित विश्वास आणि मिनल दातार दिग्दर्शित सून नंबरी सासू दस नंबरी मधील सर्व कलाकारांचे तसेच तंत्रज्ञ श्रेणीतील सर्व कलाकारांना शुभदा कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यानंतर मीनल दातार यांनी कार्यक्रमाची सूत्रे संजय टेंबे यांच्याकडे दिली आणि संजय टेंबे यांनी रंगारंग कार्यक्रमाच सूत्रसंचालन केलं, रंगारंग कार्यक्रमात आनंदयात्री मधील अनेक हौशी कलाकारांनी गायन, काव्यवाचन, नृत्य, एकपात्री तसेच विविध नाट्यछटा या स्वरूपात सर्वांनीच सुंदर सादरीकरण केलं आणि कार्यक्रमाला रंगत आणली. रंगारंग कार्यक्रमाची सूत्रे पुन्हा एकदा मीनल दातार यांनी हाती घेत. नितीन अदवंत जी यांची ओळख करून दिली आणि त्यांना आयोजकांतर्फे भेट देऊन त्यांच कौतुक केलं. त्यानंतर नितीन अदवंत यांनी पुढची काही मिनिटं स्टेजचा ताबा घेतला आणि टवाळक्या हा आपला कथाकथनाचा कार्यक्रम सादर करून जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांची करमणूक केली. नितीन अदवंत यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांत सर्वत्र एकच हशा पिकला आणि सर्वांना पोट धरून खळखळून हसायला त्यांनी भाग पाडलं. यानंतर GTG ची मध्ये सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि आल्यापासून सातत्याने जे करण्याच्या पवित्र्यात होते तो आनंदयात्रीचा सेल्फी पॉईंट या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण आणि केंद्रबिंदू ठरला. जमलेल्या सर्व आनंदयात्रींनी भरपूर सेल्फी आणि फोटोज घेतले आणि सुंदर साग्रसंगीत नवरसयुक्त भोजनाचा आस्वाद सर्वांनीच घेतला आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम ठरल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत कार्यक्रमाची संपूर्ण धुरा मीनल दातार आणि वैदेही चिल्का, अदिती भातखंडे यांनी यशस्वीपणे हाताळली. अर्चना आंगणे यांनी कार्यक्रमाचे जास्तीत जास्त प्रमोशन आणि जाहिरात करून त्यांना उत्तमपणे साथ दिली. गौरांग दामले, अमित देसाई, शिल्पा सातपुते, शैलेंद्र ढगे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण केले. रंगारंग कार्यक्रम तसेच एकूण संपूर्ण कार्यक्रमात तंत्रज्ञ विभाग हा आनंद केळकर यांनी खूप सुंदर सांभाळला. स्वागत कक्षावर अर्चना आंगणे, राजेंद्र कुलकर्णी, शँतनू दातार, अदिती भातखंडे यांनी उपस्थित सर्वच आनंदयात्तींचे उत्तम स्वागत केले. राजेश रानडे यांनी सहभागी मंडळींची यादी वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली. मीनल दातार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केलें. कार्यक्रम सुरू असताना सहभागी, आयोजक तसेच प्रेक्षक या सर्वांनाच हँडल करणे खूप कठीण असते पण ते त्यांनी निवेदक म्हणून अतिशय उत्तमपणे हाताळले. याचसोबत अमित दिवेकर, अंशुमन म्हसकर, वर्षा गोरे, आनंद केळकर, संजय टेंबे, शशांक परब, राजेंद्र कुलकर्णी, शिल्पा कुलकर्णी, शंतनू दातार, राजा भामरे, वैशाली तेली, आनंद चव्हाण, शिल्पा दीक्षित, राजेश रानडे यांचा ही हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अत्यंत मोलाचा वाटा आहे. कार्यक्रमासाठी सदस्य संख्या वाढत असल्याने स्थळ बदलून सर्वांना मध्यवर्ती आणि जवळ पडेल असे ठिकाण ठरवणे. अनेक जणांच्या सतत संपर्कात राहणे, फोन कॉल्स प्रश्नांची उत्तरे देणे, १२३ जण येण्यासाठी सर्वांचे बुकिंग करणे, सर्व गोष्टी लक्षात ठेवून सर्वांचा कार्यक्रमात उल्लेख करणे, कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा कार्यक्रमाबद्दल केली गेलेली प्रशंसा व निंदा दोन्ही हाताळणे, काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या का राहिल्या याचे स्पष्टीकरण देऊन प्रेक्षकांचे परखड भाष्य निमूटपणे ऐकून घेणे. कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा जास्तीत जास्त सुलभतेने सर्वच सहभागी आनंदयात्रींची व्यवस्था कशी करता येईल याचे क्षणोक्षणी व्यवधान डोक्यात ठेवणे या गोष्टी व्यवस्थितपणे करण्यासाठी खूप संयम लागतो आणि तो या संपूर्ण आयोजक टीमने दाखवून दिला आहे आणि कार्यक्रम यशस्वी केला आहे. इतकेच नव्हे तर कार्यक्रमाच्या एकूण बजेट मधून नंतर शिल्लक राहिलेली रक्कम सर्व सहभागी आनंदयात्रींना परत करणे हा या कार्यक्रमाने आणि आयोजकांनी घालून दिलेला स्तुत्य परिपाठच म्हणावा लागेल यासाठी वैदेही चिल्का मॅडम यांचे विशेष कौतुक.. ज्यांच्या स्तुत्य संकल्पनेतून आनंदयात्री समूह सुरू झाला आणि आज इतक्या प्रचंड मोठ्या संख्येत आपल्याला आज पाहायला मिळतो आहे. ते आनंदयात्रीचे अडमिन्स राम चिंचलीकर आणि शुभदा कुलकर्णी यांच्या प्रेरणेने आणि पाठबळानेच हा कार्यकम यशस्वी होऊ शकला.
आनंद लेले
कल्याण
आशय लेखक व गायक अशा आनंद लेले यांनी आनंदयात्री २०२२ या दिमाखदार सोहळ्याबद्दल शब्दांकन करून त्यांचा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचविला.