या ४ अंकी लेखातील तिसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा! – भाग ३
असं म्हणतात, तिकीट खिडकीवर नाटक ओळखलं जातं. मी आजपर्यंत जितकी नाटकं पाहिली, त्यांची तिकिटे मी माझा खजिना म्हणून संग्रही ठेवली आहेत. आज प्रत्येक तिकीट पाहताना नाटकाचं नाव, कधी पाहिलेलं, कोणाचं नाटक इत्यादी सगळ्या गोष्टी एकेक आठवण मनात ताजी करतात. इथे कधी लांबच लांब रांगा पाहिल्या, तर कधीकधी शुकशुकाट; कधी तिकिटासाठी लवकर येऊन सुद्धा ‘पुढचं’ तिकिट मिळालं नाही म्हणून झालेली निराशा आठवते तर कधी अचानकपणे पुढच्या रांगेत मध्यभागी सीट मिळाल्याचा आनंद. मध्यंतरात उठून बाहेर जात असताना प्रेक्षागृहात पाहून कायम एक विचार मनात येत असे कि, एवढ्या मागे बसून ह्यांच्यापर्यंत नाटक पोहोचतं तरी कसं? पण मग ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाट्यधारा शेवटून तिसऱ्या रांगेतून पाहिल्यावर किंवा ९८व्या नाट्यसंमेलनातील नाटकं थेट बाल्कनीतून पाहिल्यावर ‘कुठेही बसा; नाटक पोहोचतंच’ हा साक्षात्कारच झाला. होय, नाट्यवेडे रसिक असेच असतात. इतरांना क्षुल्लक वाटाव्या अशा गोष्टी त्यांच्यासाठी मात्र अतिशय महत्त्वाच्या असतात.
मी नाट्यगृहाची इमारत पाहत तिकीट खिडकीवर पोहोचलो. एरवी गजबजलेली तिकीट खिडकी आज मात्र ओस पडली होती. तिकिटांचे गठ्ठे, आसनव्यवस्थेचे पान (ज्यावर तिकिट देणारे काका लाल रंगाने काट मारतात) ते असेच खिडकीच्या आतल्या बाजूस पडलेले होते. रविवार ते शनिवार वारांची नावे लिहून पुढे ‘सकाळ-दुपार-रात्र’ अशा तीन प्रयोगांच्या नोंदी लिहीलेला फळा आज रिकामाच होता. इथे प्रशांत दामलेंचं नाटक पहाटे पाचला जरी लिहीलं तरी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड दिसेल, असे आपले मराठी प्रेक्षक आहेत.
नाटकांची तिकिटे कोणीतरी फाडून फेकलेली मला आढळली. ती उचलताना मला प्रचंड राग आलेला. कचरा केला होता ह्याचा राग होताच पण तिकिट आणि तेही ‘नाटकाचं तिकीट’ फाडलं, ह्याचा राग जास्त होता. ह्या खिडकीकडे पाहिलं कि, मला मीच अनेकदा तिकिट घेण्यासाठी रांगेत उभा असलेला दिसतो. ठाकरेला चष्मावाले एक काका तिकीट खिडकीला बसतात त्यांच्याशी सहज मारलेल्या गप्पा आठवतात, तर कधी संत्या दादा म्हणून आम्हाला तालमीत चहा देणारा दादा आठवतो. कधी एखाद्या नाट्यसंस्थेतील एखादा मित्र तिकिट जपून ठेवतो तर कधी एखादा ‘आपला माणूस’ म्हणून सीट मिळवून देतो. ही अशी सगळी लोकं, हा परीसर मला माझा हक्काचा वाटतो.
ह्या वास्तूत मी मोजून एक-दोनच नाटकाचे प्रयोग केलेत पण तरीही आज का कोणास ठावूक मी अनेक नाटकं इथे जगलोय, असा अनुभव गाठीशी घेऊनच मी वावरतो. मला नाही समजतं इथे आल्यावर काय होतं ? नाटक पाहिल्यावर कलाकारांसोबत एक फोटो, किंवा एका सहीच्या पलिकडे कुठला तरी निराळाच आनंद मिळतो. महिन्याभरात साठवलेले, किंवा घरच्यांनी बजावून दिलेले नेमके ३००-४०० रूपये एकदाच खर्च होतात पण त्यातून मिळणाऱ्या लाखमोलाच्या आठवणी चिरंतन राहतात.
आता मात्र निरोपाची वेळ समीप आली होती. मी तिकीट खिडकीकडून मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो आणि पुन्हा एकदा मागे वळून पाहिले. खरंतर पाय निघतच नव्हता. आमच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात दर्शनी भागात नटराजाची एक देखणी मूर्ती आहे. नेहमी कोणत्याही नाटकाच्या प्रयोगाला आलो असता, मी नाट्यगृहात जाताना तिला न चुकता वंदन करतोच. आज नजर तिथे शेवटी गेली इतकंच. पाहतो तर काय ? कलाकाराचे ते अंतर्धान पावलेले ‘हृदय’ नटराजाच्या पायाला घट्ट चिकटून होते. हृदयाची स्पंदने अजूनही ऐकू येत होती. ते नक्कीच वाट पाहत होते पुढचा प्रयोग लागण्याची. नक्कीच वाट पाहत होते नाट्यगृह प्रेक्षकांनी तुडुंब भरून जाण्याची. वाट पाहत होते तिकिट खिडकीवरच्या रांगांची. त्या कलाकाराच्या हृदयाला असह्य वेदना होत असणार, त्या मला जाणवत होत्या. मन तिळतिळ त्यासाठी तुटत होतं. पण मी परिस्थितीसमोर हतबल होतो. जड अंत:करणाने तसाच वळलो. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पडण्यासाठी पाय टाकणार इतक्यात आठवले कि, त्या कपडेपटातील पेट्या माझ्याकडूनही तशाच उघड्या राहिल्या. रंगपटात ती जमिनीवर पडलेली रंगपेटी उचलायलाच मी विसरलो. रंगमंचावर कलाकाराच्या हृदयाला अधोरेखित करणारा तो ‘स्पॉटलाईट’ तसाच चालू राहिलाय. नेपथ्य कोणी ट्रॅकमध्ये भरलंच नाहीये. मध्यांतरात घाईघाईने खाताना उरलेला अर्धा वडा आणि चहाचा कप तसाच राहिलाय. तिसरी घंटा ऐकण्यासाठी सबंध नाट्यगृहाचे कान सजीवपणे व्याकूळ झाले आहेत. नाट्यगृहाची वेळ संपतेय…
प्रश्नांच्या त्या भडीमारासोबत मी नाट्यगृहाबाहेर आलो. एरवी बाहेर लागलेले विविध नाटकांचे बोर्ड पाहताना मी भारावून जायचो. ते बोर्ड पाहता यावे म्हणून स्टेशनपासून जवळचा रस्ता सोडून मी लांबच्या रस्त्याने यायचो. आज तिथे एकही बोर्ड नव्हता. नाट्यगृहाची इमारत, तो परीसर निरोप घेताना जणू माझ्याकडे आशाळभूत नजरेने पाहत होता. त्याला दोनच अपेक्षा असाव्यात. एकतर नाटकांचे प्रयोग पुन्हा सुरू होण्याची आणि त्याहून मोठी अपेक्षा म्हणजे प्रेक्षकांनी नाटकाला गर्दी करण्याची. माणसापासून सोशल डिस्टंसिंग ठेवताठेवता माझं नाटकही दूर गेलं, ह्याची खंत वाटत होती. पण नाटक सुरू झाली कि, एक सच्चा नाट्यरसिक म्हणून मी नक्की येईल. अशी ग्वाही मी त्या वास्तूला त्याक्षणी दिली. आपण सर्वांनीही मनातून रंगभूमीला ते वचन द्या. त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहिल्यावर मनात प्रश्नांचे वादळ घोंघावत होते. पण ह्या सगळ्यातून स्वतःला शांत करत मी स्वतःशी एकच वाक्य बोललो – ‘नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे… नाटक सुरूच आहे !’.
Ep. 4: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग ४
1 Comment
Pingback: माझ्या आठवणीतील नाटक — दशावतारी नाटकं • रंगभूमी.com