मराठी माणूस आणी रंगभूमी किंवा नाटक यांचं नातं केवळ अजोड आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही, तसंच मराठी माणूस नाटकाशिवाय जगणं अशक्य! मराठी रंगभूमी आज चौफेर घोडदौड करत आहे. या सर्वामागे कलाकार, तंत्रज्ञ त्याचप्रमाणे बॅकस्टेज कलाकार यांचंही योगदान मोठं आहे.
काही दशकांपूर्वी कै. बालगंधर्व, मा. दिनानाथ, अशा मातब्बर कलाकारांनी संगीत नाटकांच्या रूपाने रंगभूमीला सुवर्णकाळात नेऊन ठेवले. कालांतराने तंत्रज्ञानात प्रगती झाली. मूकपट, बोलपट, चित्रपट आले. पडद्यावर हलणारी, बोलणारी चित्रे पाहून प्रेक्षक हरखून गेला. सिनेमा थियेटरकडे वळलेला प्रेक्षकांचा वाढता ओघ थांबवण्याचे व त्याला पुन्हा रंगभूमीकडे वळवण्याचे मोठे दिव्य नाट्यकर्मींना करावे लागले.
पुढे चीन, पाकिस्तान या पारंपारिक शत्रूंनी लावलेली युद्धे, त्यामुळे निर्माण झालेली ब्लॅकआऊट सदृश्य परिस्थिती, त्यांनीच घडवून आणलेले बॉम्बस्फोट, अधुनमधून उसळलेल्या दंगली, तसेच अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्ती यावर यशस्वीपणे मात करून रंगकर्मी व रसिक प्रेक्षक यांनी रंगभूमी जिवंत ठेवली.
आज जे संकट घोंगावतय ते जागतिक स्वरुपाचं आहे. करोनाने सारं समाजजीवन ढवळून निघालंय. नाट्यव्यवसाय संकटात आहे, बॅकस्टेज कलाकार संकटात आहे. श्री. प्रशांत दामलेंसारखे प्रख्यात कलाकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत.
श्री. दामले यांनी अभिनयाचे धडे ब्लॅक अँड व्हाईट टि. व्हि. च्या काळात महाराष्ट्र शाहीर कै. कृष्णराव साबळे यांच्या “महाराष्ट्राची लोकधारा” या कार्यक्रमातून गिरवायला सुरुवात केली. कै. साबळे यांच्या मार्गदर्शनातून तावून सुलाखून निघालेले दामले नाट्यसृष्टीकडे वळले. ब्रह्मचारी या आचार्य अत्रे लिखित नाटकात वर्षा उसगांवकर बरोबर त्यांचा अभिनय चांगलाच बहरला. विनोदी अभिनयाची उत्तम जाण असलेले दामले चार दिवस प्रेमाचे, गेला माधव कुणीकडे, मोरूची मावशी या नाटकांमधून चांगलेच चमकले.काही मराठी चित्रपटांतूनही त्यांनी उत्तम अभिनय केला पण तेथे ते रमले नाहीत. तेथेही त्यांना अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांची उत्तम साथ लाभली. प्रेक्षकांचा तात्काळ प्रतिसाद मिळणाऱ्या रंगभूमीवर काम करणे त्यांना जास्त भावले असावे. गेले अनेक काळ ते टि.व्हि. वरिल लोकप्रिय “आम्ही सारे खवय्ये” या कार्यक्रमाचं सादरीकरण अगदी चोख बजावतांना दिसतात. त्यांना लाभलेला गोड गळा हि त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक जमेची बाजू. संगीत रंगभूमीवरील प्रख्यात गायक कै. मा. दामले यांचा वारसा त्यांना लाभलाय असंच म्हणावं लागेल. सद्या चालू असलेल्या नाटकांमध्ये संगीतकार अशोक पत्कीनी त्यांच्याकडून छान छोटी छोटी गाणी गाऊन घेतलीत. उदा. “मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?. . . ” अशा चतुरस्त्र अंगाच्या श्री. प्रशांत दामले सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सद्याच्या करोना संकटातून बाहेर येण्यासाठी आपले बॅकस्टेज कलावंत, तंत्रज्ञ यांच्या सहाय्यासाठी प्रत्येकी रु. १०,०००/- देण्याची घोषणा केली आहे. खरोखरीच त्यांचं हे औदार्य वाखाणण्यासारखंच आहे.
मराठी रंगभूमी व सिनेक्षेत्रास सुपरिचीत असलेले तोलामोलाचे नावं म्हणजे श्री. महेश वामन मांजरेकर. महेश मांजरेकरांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम वेगळ्या आशयाचे चित्रपट दिले तसेच टि. व्ही. सिरियल्सच्या माध्यमातून अनेक चांगल्या भूमिका वठवल्या. हल्लीच त्यांनी “बिग बॉस” या मराठी सिरियलचे सादरीकरण उत्तम रीतीने केले. सद्याच्या करोनाच्या उद्भवलेल्या प्रकोपामुळे त्यांनी सद्या घरीच बसुन काम करण्याचा निर्धार केला आहे. काही कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या ऑनलाईन ऑडिशन्स घेण्याचे ठरवले आहे. यापूर्वी त्यांनी हे कधीच केलं नव्हतं. अशा नवोदित, उभरत्या कलाकारांनी त्यांचा आवडता परफॉर्मंन्स डायलॉग्ज इ. मोबाईलवर शुट करून पाठवायचं आहे. त्याचबरोबर फोटो, संपर्क क्र. (मोबा. नं .) ई-मेल आयडी [email protected] वर पाठवल्यावर त्यांची टिम जी त्यांच्याप्रमाणेच घरून काम करत आहे, या माहितीचं संकलन करेल. यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही हे विशेष! सक्तीच्या पण उपयुक्त अशा संचारबंदीच्या या काळात तुमच्यातले टॅलेन्ट हेरून त्याला योग्य दिशा देण्याचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.
आपण सर्वांनीच रंगभूमीच्या पाठीशी उभे राहून आपला खारीचा वाटा उचलून करोनाच्या राक्षसाला शक्ती व युक्तीने एकजूटीने नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे.
3 Comments
Pingback: साहित्य सहवास — विविध विषयांवरील लेख आणि कथांचा संग्रह • रंगभूमी.com
Pingback: अनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास • रंगभूमी.com
Pingback: ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांचा गरजू रंगकर्मींना मदतीचा हात! • रंगभूमी.com