माननीय श्री. दिलीप सर,
प्रयोग मालाड संस्थेद्वारे आयोजित “लेखक एक नाट्यछटा अनेक” या उपक्रमाअंतर्गत मला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि माझे कितीतरी वर्षांचे तुम्हाला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणी मी तुमचं हसवा फसवी हे नाटक पहिलं आणि मी तुमची “फॅन” नाही म्हणता येणार पण शिष्य किंवा भक्तच झाले. मला नाटक, रंगमंच याबद्दलची ओढ आणि आवड निर्माण होण्यामागे तुम्ही एक मोठं कारण आहात असं मी समजते. तुम्हाला भेटण्या अगोदर तुमच्या बद्दल मनात जी छबी रेखाटली होती ती अगदी तंतोतंत खरी ठरली. तुम्ही स्वतःमध्येच अभिनयाची, सकारात्मक व्यक्तिमत्वाची एक चालती-फिरती कार्यशाळा आहात असं मला नेहमीच वाटत आलं आहे आणि तुम्हाला भेटल्यावर त्याचा एक जिवंत अनुभव आला.
तुमचा मनमोकळा आणि मृदुभाषी स्वभाव बघून माझा तुमच्याबद्द्लचा आदर द्विगुणित झाला आहे. सर, माझे बाबा तुमचे अगदी “चिमणराव”पासून खूप मोठे फॅन आहेत, हे मी सांगताच तुम्ही म्हणालात, “पण बाबांना सांग की, ते जसे सर्व भूमिकांमध्ये दिसतात तसे वास्तवात अजिबातच दिसत नाहीत” आणि ह्यावर तुमचं गालातल्या गालात हसणं… तुमच्या बोलण्यातील हा मिश्कीलपणा सतत मनाला भावत होता.
मी आणि आमच्या टीमला सतत जणू काही एखाद्या नातेवाईकालाच भेटल्याचा भास होत होता. त्यामुळेच की काय मी तुमच्याशी अगदी मनमुराद गप्पा मारू शकले. मी माझं माहेर लालबाग असं सांगताच, “अगं मग माझं घर सुद्धा शारदाश्रम विद्यालय… जिथे सचिन तेंडुलकर शिकला त्याच्या समोरच्याच गल्लीमध्ये होतं” हे तुम्ही किती आपुलकीने बोललात.
सर, तुमच्याशी झालेली ही ग्रेट भेट आणि हा दिवस मी ह्या जन्मात विसरणे तर कठीणच! पण तुमच्या विनम्र प्रतिमेचे माझ्या मनात एक अचल स्थान निर्माण झाले आहे. तुमच्याशी गप्पा मारताना तुमच्या येऊ घातलेल्या २ प्रोजेक्ट्स बद्दल माहिती मिळाली आणि तुम्ही पुन्हा आमच्या भेटीला येताय हे ऐकून आनंद झाला. त्यामधील एक प्रोजेक्ट म्हणजे महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट ज्याचं नाव आहे “मी शिवाजी पार्क” आणि दुसरं म्हणजे झी मराठी प्रस्तुत नाटक “आरण्यक”. तुम्हाला या दोन्ही आणि भविष्यातील सर्व प्रोजेक्ट्स साठी खूप खूप शुभेच्छा!
कधी चिमणराव बनून तुम्ही आम्हाला हसवलंय तर कधी तात्या विंचू बनून टरकवलंय सुद्धा! कधी आबा टिपरे बनून आम्हाला हक्काचे आजोबा मिळवून दिलेत तर कधी तुमचीच जुळी बहीण सौ. दीप्ती प्रभावळकर-पटेल-लुबुम्बा यांच्याशी ओळख करून दिलीत. तुम्ही साकारलेला चौकटचा राजा तर अजूनही प्रेक्षकांच्या मनावर गारूढ करून आहे. कधी तुम्ही गुरगुटे बनून कोंबड्यांचा बिझनेस केला आहे तर कधी महात्मा गांधीजी बनून अगदी मुन्नाभाईलासुद्धा गांधीगिरीचे धडे दिले आहेत. तुम्ही जन्माला घातलेल्या या आणि अशा सर्व व्यक्तिरेखांना माझा मनाचा मुजरा!
तुम्ही आम्हाला आणि आमच्या संपूर्ण टीमला जे प्रेम आणि आशिर्वाद दिलेत त्याबद्दल मी संपूर्ण टीमकडून तुमचे खूप खूप आभार मानते आणि प्रयोग मालाडने मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळवून दिली म्हणून मी प्रयोग मालाडचीही खूप ऋणी आहे. सर, आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेद्वारे आणि निरनिराळ्या रूपात सतत भेटत राहाल अशी इच्छा मी व्यक्त करते आणि तुमची रजा घेते.
– तुमची शिष्या,
गायत्री टंकसाळी – देवरुखकर
2 Comments
Pingback: दिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला! - रंगभूमी.com
Pingback: माझ्या आठवणीतील नाटक — सूर्याची पिल्ले • रंगभूमी.com